अजब हार्मोन्स की गजब कहानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:40 AM2018-03-15T08:40:36+5:302018-03-15T08:40:36+5:30

केस गळणं, विसराळूपणा, वजनवाढ, नैराश्य हे सारं एकदम ग्रासतं तेव्हा.. ही कसली लक्षणं?

harmonal imbalace | अजब हार्मोन्स की गजब कहानी

अजब हार्मोन्स की गजब कहानी

Next

- डॉ. यशपाल गोगटे

हायपोथायरॉइडिझम. हा शब्द ऐकला तरी अनेकांना फार धास्ती वाटते. तरुणपणात जर थायरॉइड असेल तर त्या आजाराबद्दल एक अवास्तव भीती निर्माण होते. पण खरं तर धास्तावून जाण्यापेक्षा, साशंक होण्यापेक्षा सजग होण्याची गरज आहे.
थायरॉइड हार्मोन्स म्हणजेच टी-३ व टी-४ यांची कमतरता झाल्यास शरीर एकूणच स्लो मोशनमध्ये जातं. सुरुवातीला थकवा, सुस्ती, आळस यासारखी लक्षणं दिसतात. त्यामुळे कामाची गती मंदावते. शरीराची हालचाल कमी होते. विसराळूपणा, विस्मरणदेखील होऊ शकतं. शरीरात अपेक्षित ऊर्जा निर्माण न झाल्यामुळे थंडी सहन होत नाही. सूज चढल्यामुळे शरीराला एकूण जडत्व येतं, फोफसेपणा येतो. पण वजन वाढण्याकरिता हायपोथायरॉइडिझम जबाबदार नसतो. स्वरयंत्रावर सूज आल्यामुळे आवाजात एक प्रकारचा घोगरेपणा येऊ शकतो.

उंची न वाढणे, बौद्धिक विकास खुंटणे व फोफसेपणा येणं ही लक्षणं तर लहान मुलांतही दिसू शकतात. हे हायपोथायरॉइडिझमचे प्राथमिक लक्षण आहे. किशोरवयीन मुलां-मुलींमध्ये यौनावस्थेत होणारे अपेक्षित बदल या आजारात होत नाहीत. मुलींमध्ये १२-१४ वयापर्यंत स्तनांची वाढ न झाल्यास, पाळी न आल्यास डॉक्टरांना भेटणं गरजेचं ठरतं. स्त्रियांमध्ये अनियमित पाळी किंवा पाळीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होऊ शकतो. या तक्रारी वंध्यत्वासाठी कारणीभूत ठरतात. खास करून स्त्रियांमध्ये हायपोथायरॉइडिझममुळे केस गळू शकतात. त्वचा कोरडी पडू शकते.

हायपोथायरॉइडिझमचा दुष्परिणाम पचनक्रियेवर होऊन बद्धकोष्ठता होते. हृदयावर परिणाम होऊन पेरिकार्डियल एफ्युजनसारखे गंभीर आजारही होऊ शकतात. कोलेस्टेरॉलचे आजार व अ‍ॅनेमिया (रक्तात हिमोग्लोबिन कमी होणं) होऊ शकतो. मानसिक संतुलन टिकवण्याकरता थायरॉइडचे हार्मोन जबाबदार असतात. हायपोथायरॉइडिझमच्या आजारात हे संतुलन बिघडल्यामुळे नैराश्य येतं.
यापैकी काही लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता योग्य तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार वेळीच उपचार केले तर हा आजार नियंत्रणात राहतो. ते कसं, त्याविषयी पुढच्या आठवड्यात..

थायरॉइड आणि त्याचे दोस्त
शरीरातील इतर आजारांच्या उपचाराकरता केलेल्या तपासण्या, औषध योजनांच्या दरम्यान थायरॉइडचे निदान होऊ शकते. काही वेळेस इतर आजारांच्या लक्षणांमुळे हायपोथायरॉइडिझमची लक्षणे झाकली जातात. यासाठी काही वेळेस डॉक्टर लक्षणं नसतानाही थायरॉइडची तपासणी करण्याचा सल्ला देतात.

हायपोथायरॉइडिझमचा आजार असलेल्या लोकांना इतर काही विशिष्ट आजार जसं की व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता, गव्हाची अ‍ॅलर्जी (सिलियाक डिसिझ) व संधिवात आदीचा धोका असतो. हृदयरोगात वापरले जाणारे अमिओड्रॉन किंवा काही कॅन्सर विरोधी औषधांमुळेही थायरॉइडचे आजार होऊ शकतात.

( लेखक हार्मोन तज्ज्ञ आहेत.)
dryashpal@findrightdoctor.com
 

Web Title: harmonal imbalace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.