गावोगावच्या तरुणांना वास्तव छळतं तेव्हा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:34 PM2018-12-20T12:34:34+5:302018-12-20T12:34:45+5:30

रोज अंधारात हरवणारी गावं, त्या गावातली तरणी पोरं, काळोखात उभ्या बाभळीची सळसळ हे सारं गावोगाव काय सांगत असतं?

harsh reality in villages & youth | गावोगावच्या तरुणांना वास्तव छळतं तेव्हा.

गावोगावच्या तरुणांना वास्तव छळतं तेव्हा.

Next
ठळक मुद्देआमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..

- अरुण तीनगोटे 

गावाकडे प्रचंड लोडशेडिंग. उजळलेले दिवे दिसणं ही दुर्मीळ गोष्ट होती. उन्हाळ्यात लोडशेडिंग आणखी वाढायचं. मग उन्हाळ्याचे दिवस अधिक असह्य होऊन जायचे. दुपारी रणरणत्या उन्हाने जिवाची लाही लाही व्हायची. घरासमोरच्या खळ्यातला चारा आपोआप पेटून जाईल असं वाटायचं. संध्याकाळ होईर्पयत तिथली गाय चारापाण्यासाठी हंबरायची. विजेच्या तारेवर कधीतरी एखादं चुकार पाखरू दिसायचं. दुपार सहन करून संध्याकाळ होण्याची वाट पाहणं मुश्कील व्हायचं. नदीकाठच्या बाभळीवर संध्याकाळी बगळे येऊन बसायचे, हे त्यातल्या त्यात बरं होतं.
या अशा अंधारून येणार्‍या संध्याकाळी पुलावर बसून घरी जाणार्‍या बैलगाडय़ांचे आवाज ऐकणं कानाला चांगले वाटायचे. रात्नी जेवण झाल्यानंतर बायाबापडे घरासमोरच्या ओटय़ावर गप्पा मारत बसायचे. कधी कधी थंड हवेची झुळूक यायची, ते शरीराला मस्त वाटायचं. समाजमंदिराजवळ देवीचं एक छोटंसं देऊळ होतं. तिथं रोज रात्नी आदिवासी मुलं गाणी म्हणायची. त्या शांततेत ती गाणी कानाला फार श्रवणीय वाटायची. त्या गाणार्‍या मुलांमध्ये एक सावळ्या रंगाचा दणकट पोरगा होता. तो सावळा होता आणि सर्व त्याला प्रेमाने भोर्‍या म्हणायचे. त्याचा आवाज जाडाभरडा तरीही गोड होता.
‘तुझ्याविना मला कुणी नाय, अंबाबाय..’  हे गाणं ते नेहमी म्हणायचे. गावची आठवण आली की, मला नेमकं  हेच गाणं आठवतं. मग मिट्ट काळोखात हरवलेल्या बाभळी आठवतात. मिणमिणता दिवा लागलेलं आमचं घर आठवतं. ओटय़ावर आराम करणारे वडील आठवतात. त्यांचे घट्टे पडलेले हात आठवतात. त्यांच्या पायातली कुरूपं आठवतात. सतत काहीतरी मोजणारी त्यांची बोटं आठवतात. त्यांचं दचकून झोपेतून उठणं आठवतं. मनाशी बोलत राहणं आठवतं..
आयुष्यभर संघर्ष करून, अनेक पराभव सहन करून पुन्हा पुन्हा जिंकण्यासाठी त्यांचं लढणं  आठवत. सतत आनंदी दिसणारी माणसं आतून दुर्‍खानं पोखरलेली असतात. छोटय़ा छोटय़ा गोष्टीत आनंद शोधू पाहणारं त्यांचं मन नैराश्य टाळू शकत नाही. काही माणसांच्या लढाया त्यांच्या मरणार्पयत संपत नाहीत. कदाचित मरणानंतरही. कधीतरी सकाळी सकाळीच ‘अच्छो को बुरा साबित करना, दुनिया की पुरानी आदत है..’ या ओळी गाणारे वडील आठवतात. आपण वडिलांचा आवाज विसरत जातो, ही किती वाईट गोष्ट आहे.
या विस्मरणाचं काय करायचं असतं? जेवायला बसल्यानंतर सर्वात प्रथम ज्वारीच्या भाकरीचा एक कोरडा तुकडा मोडून खाणार्‍या वडिलांचे हात अचानक आठवायला लागतात, तेव्हा नेमकं काय करायचं असतं?
कधी कधी वाटतं की, हे आठवणीचं मोहळ कुणीतरी उठवलं पाहिजे. आपली स्मरणशक्ती कुणीतरी हिरावून घेतली पाहिजे. हे मन आणि मेंदू रात्नीच्या काळोखात मिटून का जात नाही? जुन्या दिवसांची पाटी कोरी करकरीत का होत नाही? 
पण आमच्यातला रु जलेला अंधार असा उपटून फेकता येणार नाही. हे स्मरणदिवे आमच्या अस्तित्वाची राख होईर्पयत विझणार नाहीत..

 

Web Title: harsh reality in villages & youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.