खूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:54 PM2018-10-19T17:54:59+5:302018-10-19T17:55:18+5:30

आपल्याच वाटय़ाला असे भोग का येतात, का आपल्याला छळतं आयुष्य, असं वाटतं ना? मग या माणसांना भेटा, त्यांची भंजाळलेली दुर्‍ख पाहून सांगा, काय वाटतं?

Have you seen this short film - khup lok aahet? | खूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का?

खूप लोक आहेत ही शॉर्ट फिल्म पाहिली का?

Next
ठळक मुद्दे42 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये लोकं अशी तुकडय़ा तुकडय़ात भेटतात. एक विशिष्ट मुद्दा मांडून निघून जातात.

-माधुरी पेठकर

माणसाचं जगणं सरळ-साधं नसतंच कधी. खूप प्रश्न, थोडी उत्तरं, खूप तगमग, थोडा दिलासा, ढीगभर दुर्‍ख आणि टीचभर सुख. कमी-अधिक प्रमाणात सगळ्यांचं जगणं असंच. विरोधाभासानं भरलेलं. माणसाला हवं असतं एक पण त्याला मिळतं वेगळंच. करायचं एक असतं आणि होतं काहीतरी भलतंच. आइस्क्रिम खायला आवडतं पण डॉक्टर नेमकं पथ्य म्हणून आइस्क्रिम वज्र्य करून टाकतात. पैसा असतो थोडाच असतो पण गरजा मात्र पाय पसरतात. या विरोधाभासाचं कधी हसू येतं, तर कधी असे विरोधाभास माणसाला निराश, हताश करतात. जगणं नकोसं करतात. स्वतर्‍ सकट अख्ख्या जगावर, व्यवस्थेवर मग माणसं राग काढत राहातात. फुल्या मारत जातात.
असं अनेकदा आपलंही होतं. वाटतं आपल्यापेक्षा जास्त भोग कुणाच्या वाटय़ाला नाहीत. पण दुसरा कोणी तरी दुर्‍खी, प्रश्नांनी भंजाळलेला भेटतो, त्रासलेली अनेक माणसं जेव्हा आजूबाजूला दिसू लागतात तेव्हा थोडं हायसंही वाटायला लागतं.
हे हायसंपण अनुभवायचं असेल तर प्रत्यक्ष आवतीभोवती पाहताच येईल, जगी सर्व सुखी असा कोण आहे हे कळेलच; पण त्यासोबत स्वप्निल शेटे लिखित दिग्दर्शित ‘खूप लोकं आहेत’ ही शॉर्ट फिल्मही पाहा. ती आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवते.
ही फिल्म एकटय़ा माणसाचा स्वतर्‍शी चाललेला ‘जला दो दुनियावाला’ संवाद ऐकवते. शहरात वाढलेल्या आणि ग्रामीण भागातून शहरात स्थायिक झालेल्या तरुणांचं बोलणं, कारमधून पिकनिकला चाललेल्या मुलांच्या गप्पा, आई आणि मुलीमधले बदलेल्या जगण्याविषयीचे विचार, लोकलमध्ये उभ्या उभ्या मित्रांच्या चाललेल्या काही चावट तर काही गंभीर गप्पा, वडील आणि मुलाचा आयुष्यात गमावल्याच्या आणि कमावल्याच्या गोष्टींचा हिशेब आणि नवरा आणि बायकोनं नात्यात केलेली तडजोड हे सारं ही फिल्म दाखवते. आणि तरीही एकाच वेळी एवढय़ा माणसांना भेटवूनही आणखी खूप लोकं असण्याची जाणीव ही फिल्म करून देते. 
  ‘खूप लोक आहेत’ ही फिल्म सात मुद्दे मांडते. या मुद्दय़ांवर स्वतर्‍शी, एकमेकांशी बोलणारी लोकं या फिल्ममध्ये भेटतात.
जगात खूप लोकं असले तरी तुम्ही एकटे असता मरेर्पयत हे  जगण्यातलं वास्तव आहे. पण या सत्याचा सामना करणारा ‘तो’ आपल्याला फिल्मच्या सुरुवातीलाच  भेटतो. जात, पैसा हे त्याला जगणं बरबाद करणारे, माणसांना एकटे पाडणारे शत्रू वाटतात. पैशाशिवाय माणसं एकमेकांना ओळख दाखवत नाही. किंमत देत नाही. या आयुष्यात आपल्या मनासारखं काहीच होत नाही असं म्हणत तो तडफडत राहातो. आयुष्य इतकं जाचक आहे किमान मरण तरी शांतपणे यावं एवढीच त्याची अपेक्षा असते.
या फिल्ममध्ये नंतर दोघेजणं भेटतात. दोघेही मित्र फक्त दोघांची पाश्र्वभूमी वेगळी. एक शहरात वाढलेला, तर दुसरा गावातून येऊन शहरात स्थायिक झालेला. शहरात राहण्याचे प्रश्न वेगळे असतात हे गावातल्यांना कसं समजून सांगावं या विचारानं एकजण कावलेला, तर दुसरा लग्नासाठी शिकलेली आणि नोकरी करू शकणारी मुलगी हवी म्हणून अडून बसलेला. दोघांच्याही जीवनात पैशानं वेगवेगळे प्रश्न निर्माण केलेत. एक लग्नासाठी मुलगी शोधतानाही पैशाचाच विचार डोक्यात ठेवतो, तर एकाला आपल्याकडून पैशाची अपेक्षा करणारी गावाकडंची माणसं नकोशी होतात. 
उदारीकरणानंतर माणसाच्या जगण्याच्या चौकटी बदलल्या. पैसा सर्व काही बनू लागला. पैशामुळे घर, बंगला, गाडी यासारखी चालून आलेली सुखं मोठी वाटू लागली. हे मिळवणारे स्वतर्‍ला ग्रेट समजू लागले. हे ज्यांना मिळवता आलं नाही त्या लोकांवर या लोकांनी पराभूततेचा शिक्का मारून टाकला. 


उदारीकरणानं लोकांच्या हातात जसा पैसा खुळखुळला तसे डोक्यात विचारांचे नवे दिवेही लखलखले. विशेषतर्‍  तरुण मुलींना मोकळ्या विचारांच आकर्षण वाटू लागलं. चौकट नसलेल्या लिव्ह इनचं त्यांना कौतुक वाटू लागलं. पण पालकांच्या दृष्टीनं मुलींनी आकर्षणापाठीमागे न धावता माणसांना ओळखणं महत्त्वाचं वाटू लागलं. या फिल्ममध्ये डोक्यात प्रतिष्ठेचे, यशाचे वारे गेलेले तरुण भेटतात आणि बदललेल्या जगण्यावर उत्साहानं बोलणारी मुलगी आणि तिच्या उत्साहाला दबकत प्रतिसाद देणारी आईही भेटते.
तरुण आणि म्हातारी पिढी मुलगा आणि वडिलांच्या रूपात या फिल्ममध्ये समोर येते. जुन्या पिढीला आपण काय कमावलं याचा आनंद वाटत असतो, तर तरुण पिढी मात्र गमावल्याचंच शल्य करताना दिसते. तरुण पिढीला आजची पिढी खूप मोकळी वाटते, तर जुन्या पिढीला आजची माणसं विश्वासाची वाटत नाही. 
लोकलमध्ये लटकून कामाच्या ठिकाणी जबाबदारीनं जाणार्‍या तरुण पिढीला आयुष्यात महत्त्वाची भूमिका असलेला   ‘काम’विषय मात्र चावटपणे चघळण्याचा विषय वाटतो; पण सगळ्यांनाच नाही ही जाणीवही ही फिल्म करून देते. काम या विषयाकडे संवेदनशीलतेनं, हळुवारपणे तरुण पिढी बघू शकते याचा पुरावाही याच फिल्ममधली काही तरुण मुलं देतात. 
काळ बदलला तशी माणसं बदलली. नात्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रेमविवाह करूनही नात्यातले अर्थ हरवलेले नवरा-बायको केवळ मुलांसाठी म्हणून एकत्र राहात असल्याचं हतबल वास्तवही ही फिल्म संपता संपता दाखवते.
42 मिनिटांच्या या शॉर्ट फिल्ममध्ये लोकं अशी तुकडय़ा तुकडय़ात भेटतात. एक विशिष्ट मुद्दा मांडून निघून जातात. पैशापासून नात्यार्पयत प्रत्येक विषयावर लोकं भरपूर आणि  मनमोकळं बोलतात. आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावरचा विरोधाभास जोरकसपणे मांडत राहातात.
स्वप्निल शेटे यानं 2008 मध्ये या फिल्मची स्क्रिप्ट लिहायला घेतली. घरात राहताना, बाहेर समाजात वावरताना, मित्रांशी गप्पा मारताना इतकंच नाही तर स्वतर्‍शी बोलताना स्वप्निलला  पावलोपावली जगण्यातले विरोधाभास भेटत होते. उदारीकरणानंतर माणसाच्या आयुष्यात वेगानं आलेला निराशावाद, एकटेपणा स्वप्निललाही अस्वस्थ करत होता. हा विषय मग त्यानं  ‘खूप लोकं आहेत’ या फिल्ममधून मांडायचा ठरवला. लोकांवर आपण बोलण्यापेक्षा त्यानं लोकांनाच बोलू द्यायचं ठरवलं. 
कल्याणमध्ये लहानाचा मोठा झालेला स्वप्निल तसा इंजिनिअर; पण आपण पुस्तकं वाचून, रट्टा मारून पास झालेलो इंजिनिअर आहोत. आपण काही चांगले इंजिनिअर नाही हे स्वप्निलला जाणवलं आणि त्यानं आपल्या करिअरचा प्रवाह आपल्या आवडीकडे म्हणजे फोटोग्राफी, सिनेमटोग्राफी याकडे वळवला. त्यानं कर्ज काढून सिनेमटोग्राफीचा कोर्स केला. मग दूरदर्शनमध्ये काही र्वष काम केलं. इथे काम करताना जागतिक सिनेमाचा प्रभावही स्वप्निलवर पडत गेला. 2012 मध्ये मग त्यानं  ‘खूप लोक आहेत’ ही शॉर्ट फिल्म केली.
 

ही फिल्म पाहण्यासाठी लिंक
https://youtu.be/xX3PXIaQYm0

Web Title: Have you seen this short film - khup lok aahet?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.