नोकरीचे आमिष दाखवणारा गजाआड
By admin | Published: July 16, 2017 02:34 AM2017-07-16T02:34:14+5:302017-07-16T02:34:14+5:30
परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या मोहम्मद तारीक खान (२२, रा. मानखुर्द) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : परदेशातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणाऱ्या मोहम्मद तारीक खान (२२, रा. मानखुर्द) याला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे.
तोे मूळचा बिहारमधील नवादा जिल्ह्याचा रहिवासी आहे. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मोहम्मदकडून पोलिसांनी आतापर्यंत २६ पासपोर्ट, वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची नियुक्तीपत्रे, व्हिजिटिंगकार्ड आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख २९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, मोहम्मद कंपन्यांच्या नावाने पॅम्पलेट छापून ते वितरित करून गरजू लोकांची फसवणूक करायचा, असे पोलिसांनी सांगितले. त्याला पोलिसांनी अटक केली, तेव्हा त्याने एकावर एक असे सात शर्ट, पॅण्ट घातल्याचे दिसून आल्याने पोलीस हैराण झाले. याबाबत, त्याला विचारले असता आपल्याला थंडीताप आल्याचे त्याने सांगितले.
काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्यात प्रेरणा कन्सल्टन्सी कंपनीचे मालक प्रकाश बोडके यांनी खानभाई नावाच्या इसमाने आपल्या कंपनीचा लोगो वापरून परदेशात नोकरीचे आमिष दाखवत पाच जणांना लाखोंचा गंडा घातल्याची तक्र ार नोंदवली होती. पोलिसांनी खानभाई नावाच्या इसमाविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला. या आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहीत नसल्याने पोलिसांसमोर आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान होते. या आरोपीला जेरबंद करण्यासाठी अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर, पोलीस उपायुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त अमित काळे, सहायक पोलीस आयुक्त दत्तात्रेय कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांनी पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस नाईक विलास मोरे, सुरेश पाटील यांचे पथक नेमून शोध सुरू केला. पोलिसांना खानभाईचा मोबाइल नंबर मिळाल्यावर त्या नंबरआधारे पोलिसांनी तपास सुरू केला. अखेर, या खानभाईच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.
मुंबई, नवी मुंबई, कल्याण येथील बेरोजगार तरुणांना दुबई, सौदी, कुवेत येथे नोकरीचे आमिष दाखवून तेथील व्हिसाकरिता किमान ५ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत रक्कम तो उकळत होता. आतापर्यंत त्याने २६ जणांना गंडा घातल्याचे दिघावकर यांनी सांगितले. कल्याण न्यायालयात मोहम्मदला हजर केले असता त्याला न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मित्राच्या नोकरीतून सुचली फसवणुकीची शक्कल
मोहम्मद हा दहावी शिकलेला असून त्याच्या एका मित्राला एका क न्सल्टन्सीतून पैसे भरू न नोकरी लागली आणि तो परदेशात गेला. त्यामुळे आपण बनावट कन्सल्टन्सी काढून बेरोजगार तरुणांकडून पैसे उकळू आणि नंतर शहरातून पळून जाऊ, अशी शक्कल सुचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.