..त्यानं दरवाजा उघडला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 10:26 AM2018-05-31T10:26:06+5:302018-05-31T10:26:06+5:30
का तो असा? सर्दी झालीये म्हणत कोंडून घेतलंय त्यानं स्वत:ला खोलीत ? कुणालाच भेटत नाही, काही सांगतही नाही.. का ?
- श्रुती मधुदीप
1.
शलाका : काय झालं केवू ?
कैवल्य : नाही गं काही.
शलाका : बरं आज संध्याकाळी भेटतोयस ना ?
कैवल्य : अं...
शलाका : अरे मी इंटर्नशिपवरून येऊन दोन दिवस झालेत. किती दिवस भेटणार नाहीयेस तू मला ?
कैवल्य : सांगितलं ना तुला मी.. मला बरं वाटत नाहीये.
शलाका : काय झालंय रे तुला असं ?
कैवल्य : मला सर्दी झालीय. त्रास होतोय मला.
शलाका : सर्दी ? किती दिवस सर्दी असणारे तुला सांगून ठेव म्हणजे तसं भेटायला..
कैवल्य : मला त्रास होतोय शला.
शलाका : कसला त्रास ? तुझा आवाजातून मला काही भयंकर सर्दी जाणवत नाहीये. कसला त्रास होतोय तुला ? सांग ना. भेटायचं नाहीये तुला, हे सरळ सांग ना. किती दिवस मी हे सर्दीचं पुराण ऐकून घेणार आहे ! अरे, पंधरा दिवस बाहेर होते मी. आता येऊन दोन दिवस झाले. मला तर शंका यायला लागलीये की..
कैवल्य : शलाका ! शट अप ! मला त्रास होतोय ! बाय !
२.
शलाका :ङ्क्त हॅलो विशाल, मी शलाका बोलतेय.
विशाल : हो गं बोल ना. तुझा नंबर सेव्ह आहे माझ्याकडे.
शलाका : अरे हं, मला हे विचारायचं होतं की, अरे कैवल्य, कसाय रे ? त्याला फार बरं नाहीये का ?
विशाल : अं.. सर्दी झालीये आणि डोकं दुखतंय असं म्हणत होता. झोपूनच राहतोय बहुतेक दिवसभर. म्हणजे आमची भेटच होत नाहीये खरंतर. ही इज स्लीपिंग अ लॉट! काही करताना दिसत नाही. अर्थात मी दिवसातला बराच वेळ जॉबवर असतो. नक्की माहीत नाही त्यामुळे; पण काय झालं गं ? असं अचानक का विचारलंस ? तुम्ही भेटला नाही काय एवढ्यात ?
शलाका : हो अरे मी मुंबईत होते ना इंटर्नशिपसाठी पंधरा दिवस. आत्ताच आलेय, दोन-तीन दिवस झाले. पण तेव्हापासून आजारी वाटतंय. रूमच्या बाहेर पडायला नको वाटतंय असं करतोय तो. काही कळत नाहीय. तुमच्या रूमवर यावं तर परमिशन नाहीय ना. हा काही येत नाहीय भेटायला.
विशाल : ओह ! इतकं बरं नाहीय का त्याला ? मी विचारलंच नाही गं. मला वाटलं नॉर्मल सर्दीच तर झालीय. ठीक आहे, होईल बरी. बघतो मी विचारून.
शलाका : होय, मलाही कळत नाहीय. तो माझ्याशी काहीच नीटपणे बोलत नाहीय. मला काही पत्ता लागत नाहीय हा आहे कुठं, काय करतोय, कुणासोबत आहे, त्याची तब्येत नक्की कशी आहे ? बरं दवाखान्यात चल म्हटलं तरी नको नको करतोय.
विशाल: अरे बापरे ! बरं. मी बोलतो आज त्याच्याशी. डोंट वरी. कळवतो तुला. टेक केअर.
शलाका : थॅन्क्स ! बाय.
३.
विशाल : अरे वैभ्या, आहेस कुठं ?
वैभव : रूमवर भाई.
विशाल : अच्छा. कैवल्य आहे का ?
वैभव : आहे की.
विशाल : काय करतोय ? बरंय का त्याला ?
वैभव : त्याला बरं नसायला काय झालं ?
विशाल : आबे विचार ना तू त्याला.
वैभव : थांब विचारतो.
केव्या, ए केव्या. अरे दार उघड बे. केव्या, ए केव्या, आबे वैभ्या, हा झोपलाय वाटतं. त्याचा दरवाजा सकाळपासून बंदच आहे. आलाच नाही तो बाहेर. काय माहीत. रात्री उशिरा झोपला असेल. झोपू दे की साल्या.
विशाल : बरं. तो उठला की कळव लगेच.
वैभव : येस ! भाऊ !
४.
Shala is calling…
Shala is calling…
30 missed calls and 17 messages received.
५.
कैवल्यचा शलाकाला मेसेज
Shala,
I am sorry ! mala samajat nahiye mala kay hotay te. Mala khup udas watatay. Bhiti watatey ga khup. Kahich suchat nahiy. Sagale jawalache loka mala sodun janaret as watatay. Majh kunich nahiye as watatay. mala bhiti watate tu mala tya tumachya psychology chya disorders madhe basavun majhyashi break up karashil. Shala!
Mala majhya kholicha darawaja ughayalahi bhiti watatey. Aai aani babancha divorce jhala tas sagale maajhyashi pan divorce karanaret. Malaa mahitey! Tupan nighun janares.
Tya shejarachya kakanvar aani aaivar kiti sanshay ghetala babane. Tula pan shanka yetat na majhyavar ? Ka jagatoy me mala kalat nahi. Kashasathi ani kunasathi ? mala mahit nahi.
शलाकाचा रिप्लाय
प्लीज मला एकदा भेटायला खाली ये. मला कसल्याच शंका नाहीयेत रे तुझ्यावर. आपण सगळं नीट करू शकतो. एकदा दार उघड आणि खाली ये, आय अॅम जस्ट देअर फॉर यू !
६.
आणि कैवल्यने मोठ्या हिमतीनं त्याच्या खोलीचा अंधारलेला दरवाजा उघडला..