हिल युवर लाइफ- हे पुस्तक वाचलंय का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:34 PM2018-07-19T17:34:55+5:302018-07-19T17:35:20+5:30
मनाची सकारात्मक ताकद शोधायला मदत करणारं एक पुस्तक.
- प्रज्ञा शिदोरे
‘अगर तूम किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उस चीज से मिलाने मे जूट जाती हैं.’
हे वाक्य म्हणजे काय भारी डायलॉग आहे असं वाटेलही. पण हा फक्त बॉलिवूडमधला रोमॅण्टिकपणा नाहीये बरका! म्हणजे वाटत असलं फिल्मी तरी ते फिल्मी नाहीये.
पण लुईस हे यांचं यू कॅन हिल युवर लाइफ हे पुस्तक मात्र तसं म्हणत नाही. आपलं मन ही खरंच खूप कमाल गोष्ट आहे. शास्त्नज्ञही मेंदूचा काही टक्केच भाग समजू शकले आहेत. पण, आपल्या मनाची खोली त्याची शक्ती, क्षमता नक्की किती आहे, हे आपल्याला माहितीच नाहीये अजून. आपलं कॉन्शस आणि सबकॉन्शस मन मिळून आपल्याकडून काहीही गोष्टी करवून घेऊन शकतं! हेच लुईस हे यांच्या पुस्तकांचं सार आहे. खरं तर या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली; पण लुईस हे जगभर लोकप्रिय आहे. ‘यू कॅन हिल युवर लाइफ’ या पुस्तकानंतर ती जगातल्या बेस्टसेलर ऑथर्सच्या यादीत अग्रेसर ठरली.
आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे आपले शारीरिक आजार बरेचदा आपल्या मनाशी निगडित असतात. आपण जर आपल्या मनावर काम केलं तर आपण आपल्या शारीरिक व्याधींवर विजय मिळवू शकतो. हे या पुस्तकाचं साधारण मर्म आहे. अर्थात हे कसं करायचं, आपल्या या अथांग मनावर ताबा कसा मिळवायचा? त्याला वळण कसं लावायचं? या सार्या गोष्टी लुईस या पुस्तकात सांगते. यात मनाचे काही व्यायामही तिनं सांगितले आहेत.
अर्थात अनेक मानसशास्त्नज्ञांनी आणि वैद्यकीय शास्त्नज्ञांनी तिच्या या प्रयोगाला ‘सुडो सायन्स’ म्हटले आहे. म्हणजे जे शंभर वेळेला बरोबर येऊ शकेल अशी खात्नी कुणी देऊ शकत नाही. पण. आपल्या मनाची सकारात्मक विचार करण्याची ताकद समजून घ्यायची तर हे पुस्तक पहायला हरकत नाही.
हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपात यू टय़ूबवर ऐकताही येतं. त्याचबरोबर याच विषयावर डाना पेचर हिचा टेड एक्स टॉकही ऐकण्यासारखा आहे.