कर्णबधिर तरुण-तरुणींची घुसमट ‘ऐकू’च न येणार्‍या आपल्या समाजाच्या बंद कानांचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:09 PM2019-03-28T12:09:15+5:302019-03-28T13:33:36+5:30

कर्णबधिर तरुण. त्यांच्यावर अलीकडेच पुण्यात लाठीचार्ज झाला, म्हणून तेवढय़ापुरत्या बातम्या झळकल्या; पण त्यापलीकडे कसे जगतात हे तरुण? शब्दच नाहीत तर कसं व्यक्त होतात, कुठं घुसमट होतेय आणि कुठं रोजीरोटीचे प्रश्न छळतात. त्यांच्याशी ‘बोलून’, समजून घेतलेला हा शब्दांपलीकडचा संघर्ष.

hearing-impaired youth & their problem, are we not listening them? | कर्णबधिर तरुण-तरुणींची घुसमट ‘ऐकू’च न येणार्‍या आपल्या समाजाच्या बंद कानांचं काय?

कर्णबधिर तरुण-तरुणींची घुसमट ‘ऐकू’च न येणार्‍या आपल्या समाजाच्या बंद कानांचं काय?

Next
ठळक मुद्दे शिक्षणच नाही तर जॉब कुठून येणार. जॉब असेलच तर त्यात शासनाच्या अनेक जाचक अटी असतात.

- राहुल गायकवाड

तो दिवस मला आजही आठवतोय. 25 फेब्रुवारी, दुपारी साधारण दोनची वेळ. पुण्यात अपंग कल्याण आयुक्तालयाजवळ कर्णबधिर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची बातमी समजली. हातातली सर्व कामं बाजूला टाकून तडक तिकडे निघालो. आयुक्तालयाजवळ गेलो तर वातावरण शांत  होतं. काही कर्णबधिर आंदोलक एकमेकांशी साइन लॅँग्वेजमध्ये बोलत होते. मला वाटलं आंदोलन संपलं; म्हणून परत ऑफिसकडे निघणार तर नजर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याकडे गेली. मोठा जमाव नजरेस पडत होता. पुढे गेलो. समोर जे चित्र होतं ते माझ्या मेंदूत घट्ट रु तून बसलंय. हजारो आंदोलक मात्र भयाण शांतता. याआधी अनेक आंदोलनं पाहिली. मोठा आवाज, भाषणं, टीका, घोषणा, लाउड स्पीकर असं सगळं. लांबूनच कळतं की आंदोलन नेमकं कुठं सुरू आहे. परंतु या कर्णबधिर विद्याथ्र्याचं आंदोलन पाहिलं तर त्यांच्याकडे ना आवाज होता ना त्यांचं कोणी ऐकत होतं; पण ते म्हणत मात्र बरंच काही होतं.
जे मला तरी तेव्हा कुठं कळत होतं.
आंदोलन, लाठीचार्जच्या बातम्या झाल्या, पण तो बोलका सन्नाट माझी पाठ सोडत नव्हता, वाटलं आपण भेटलं पाहिजे त्या मुलांना परत. 
पुण्यातच या आंदोलनाच्या वेळी तस्लिम भेटली होती. पुण्यात दोन दिवस चाललेल्या आंदोलनात ती या आंदोलकांचा आवाज बनली होती. एक इंटरप्रिटर. महाराष्ट्रात आजच्या घडीला असे फक्त 30 इंटरप्रिटर आहेत आणि कर्णबधिर लोकांची संख्या 18 लाख आहे असंही तेव्हा कळलं. भारतात कर्णबधिर लोकांची संख्या अडीच कोटींच्या आसपास आहे अशीही माहिती मिळते. तर त्यातलीच एक तस्लिम. या आंदोलकांचा आवाज असलेली. आंदोलकांच्या मागण्या, त्यांचे मुद्दे माध्यमांपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी ती बोलत होती. या आंदोलनाचा प्रमुख आणि राजश्री कर्णबधिर असोसिएशनचा सेक्रेटरी प्रदीप मोरे जे काही साइन लॅँग्वेजमध्ये सांगत होता ते तस्लिम माध्यमांना सांगत होती. तिथं तिची भेट झाली.  त्याच काळात माध्यमात सर्जिकल स्ट्राइकच्या बातम्या धडकल्या आणि या मुलांचं मूक आंदोलन आणि आक्रोश मागे पडला.
मात्र मनात होतच की या तरुणांना भेटायचंच. ज्यांच्या आयुष्यात शब्द नाही, आवाज नाही; पण जगणं मात्र आपल्यासारखंच, ते समजून घेऊ. तस्लिमला फोन केला आणि मुंबईत भेटायचं ठरलं. काही कर्णबधिर तरुण दोस्त भेटणार होते, मदतीला तस्लिम होतीच.
तस्लिम आणि प्रदीप दोघेही मुंबईत राहातात. त्यांच्याबरोबरचे काही आंदोलकदेखील मुंबईचे होते. तेव्हा मुंबईत भेट ठरली.
एका संध्याकाळी दादर स्टेशनजवळच्या एका कॉफी शॉपमध्ये आम्ही भेटलो. माझ्या आधीच तस्लिम, प्रदीप मोरे, आनंद गोल्हार, विनय कदम, नितू साळवे हे सर्वजण पोहोचले होते. मी जे काही बोलत होतो, ते तस्लिम या सर्वांना सांगत होती आणि ते जे काही साइन लॅँग्वेजमध्ये सांगत होते ते ती मला सांगत होती. म्हणायला आवाज आमच्या दोघांचाच पण गप्पा रंगत होत्या, या अशा गप्पा मला नवीन होत्या आणि अवतीभोवतीच्यांनाही. आजूबाजूला बसलेलं लोकं इथं नेमकं काय चालू आहे हे कुतूहलानं पाहात होते. त्यांना कळत नव्हतं की हे लोक हातवारे करून मला काय सांगताहेत. 
गमतीसाठी दमशेराज खेळतो आपण, त्या खेळात जेव्हा खूप प्रयत्न करूनही समोरच्याला आपण काय म्हणतोय हे कळत नाही तेव्हा सांगणार्‍याची काय अवस्था होते. मला क्षणभर तसंच वाटलं. हे तरुण सुदृढ पण शब्द नाहीत. ते आतल्या आत घुसमटतात; पण व्यक्त होता येत नाही हे जाणवत होतं. 
आणि लक्षात आलं की, काय मागताहेत हे तरुण?
तर त्यांना त्यांच्या भाषेत साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण हवंय, इंटरप्रिटर्स हवेत, नोकरीच्या संधी हव्यात. मोठी स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य हवंय. एक माणूस म्हणून जगण्याची संधी हवीये. तुटकी-मोडकी का होईना साइन लॅँग्वेज लोकांनी शिकावी अशी त्यांची किमान अपेक्षा आहे. ते सांगत होते, कर्णबधिर मुलांना साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण मिळेल अशी शाळा नाही तर महाविद्यालयाचं तर विचारूच नका. शिक्षणाच्या संधी नाहीत तर नोकर्‍या नाहीत. बरं नोकर्‍या मिळाल्याच तर त्या कुठे वॉचमन तर एखाद्या ऑफिसात शिक्के मारायचे, झाडू पोछा करायचा अशीच कामं करावी लागतात. रोजचा दिवस एक संघर्ष आहे.  कुठे काही दुखलं, त्रास झाला तर डॉक्टरांना सांगायचं काय, हे कळत नाही ते पत्ता विचारणं, काही सांगणं हे सारं रोजच अवघड असतं. 


या गप्पांत मला भेटला प्रदीप. त्याची कहाणी सांगत होता. तो म्हणतो, ‘आईवडिलांच्या लवकर लक्षात येत नाही की आपल्या मुलाला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यावेळेला जे आवश्यक उपचार असतात ते केले जात नाहीत. अनेकजण जन्मताच कर्णबधिर असतात. कधी डॉक्टर चुकीचं मार्गदर्शन करतात. मग पुढे प्रश्न येतो, कुठल्या शाळेत घालायचं. सुरु वातीला म्हटलं तसं महाराष्ट्रात एकही साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण देणारी शाळा नाही. कर्णबधिर विद्याथ्र्यासाठी 300 शाळा आहेत. मात्र शाळेत गेल्यानंतरही या मुलांना साइन लॅँग्वेज न शिकवता बोलायला शिकविण्याचा प्रयत्न केला जातो. घरी आईवडिलांना आपल्या मुलाला काय म्हणायचंय हेच कळत नाही. मुलांना काही सांगता येत नाही. या मुलांना योग्य शिक्षण मिळत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. ही मुलं जेव्हा एखाद्या साधारण मुलांसोबत खेळायला जातात तेव्हा इतर पालकांना भीती असते की आपली मुलंदेखील कर्णबधिर होतील की काय? आम्ही शिक्षण तर घेतो मात्र ते फक्त कॉपी करून.  आम्हाला ज्ञान दिलंच जात नाही. आम्हाला जे शिक्षण दिलं जातं त्याचा आम्हाला काडीमात्र उपयोग होत नाही. शिक्षणच नाही तर जॉब कुठून येणार. जॉब असेलच तर त्यात शासनाच्या अनेक जाचक अटी असतात.
 मनोरंजन नावाची गोष्टच त्यांच्या आयुष्यात नाही. कारण नुस्ती चित्रं पहायची, सिनेमा-सीरिअल कळत नाही. आम्हाला स्वप्न पाहायलाच कधी शिकवलं नाही. आमच्या जगण्याची काही किंमतच नाही. आम्ही खाणाखुणा करत बोलण्याचा प्रयत्न करतो तर लोक टवाळी करतात. साधं सांगतो, आम्हाला कुठे जायचंय तर तिकीट काढता येत नाही. गाडी कुठल्या प्लॅटफॉर्मला उभी आहे हे कळंत नाही. अनाउन्समेण्ट ऐकूच येत नसल्याने आम्ही चुकीच्या गाडीत बसतो. समाजाने आमच्याकडे दुर्लक्ष केलंच आहे त्यात दिव्यांगांमध्येसुद्धा आम्ही दुर्लक्षित आहोत. आम्हालासुद्धा मोठय़ा पदांवर काम करायचंय, आयएएस, आयपीएस व्हायचंय पण ते सध्यातरी शक्य नाही. आमची कळकळीची मागणी आहे की आम्हाला साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण हवंय, नोकर्‍या हव्यात, सन्मानाचं जीवन हवंय
प्रदीप कळकळीनं सांगतो. आनंद गोल्हारही तेच सांगतात आणि विनय कदमही. मुलगा कर्णबधिर असल्याचे कळाल्यानंतर पालकांनी कर्णबधिर शाळेत घातलं. शाळेत साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण नसल्याने काय शिकवलं जातंय काहीच कळत नव्हतं. विनय म्हणतो, शाळेत सगळं कॉपी करत होतो; परंतु कळत काहीच नव्हतं. बारावीला खूप प्रयत्न करून अनेकदा नापास होऊन शेवटी पास झालो. नोकरीच्या कुठेच संधी मिळत नव्हत्या. सुरु वातीला एका ठिकाणी केवळ शिक्के मारायचे काम करायचो. आता एका शोरूममध्ये कॉप्युटरवर काम करतोय. 
नितू साळवे तर कर्णबधिर महिलांच्या व्यथा सांगत होत्या. लैंगिक अत्याचार सहन करण्यापासून ते मासिक पाळीसंदर्भातल्या अडचणींर्पयत सारीच कोडी छळतात. आणि कुणाला काही सांगायची, विचारायचीही सोय नाही. नितू यांना आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचंय, त्यांची मुलं ऐकू, बोलू शकतात. त्या त्यांना साइन लॅँग्वेजमध्ये शिक्षण देताहेत.
या गप्पा सुरू असताना मी सहज विचारलं की, सगळ्यांना साइन लॅँग्वेज शिकणं खरंच शक्य आहे.
माझा हा प्रस्न तस्लिमाने प्रदीपला सांगितला.
तो सांगत होता, तस्लिम गप्प होती.
आणि माझ्या लक्षात आलं की, मी नीट लक्ष देऊन पाहिलं, जरा शांतपणे समजून घेणं सुरू केलं तर तो काय सांगतोय हे मला कळत होतं.
मला समजतंय अशा नजरेनं मी तस्लिमकडे पाहिलं तर तस्लिम म्हणाली, तो तेच सांगतोय, जरा संवेदनशीलतेनं पाहिलं तर होईल आपल्यात संवाद, थोडं लक्ष तर द्या.’
-किती खरं होतं ते?
या मुलांकडे शब्द नाहीत, पण समाजाचे तर कान शाबूत आहेत, आपण तर ऐकू शकतो त्यांचं म्हणणं..

***
राजश्री कर्णबधिर असोसिएशनकडून या  कर्णबधिर तरुणांच्या मागण्या सरकारच्या दरबारी पोहोचविण्याचं काम सुरू आहे. 2013 साली या संघटनेची स्थापना करण्यात आली. मनोज पटवारी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत. अनिकेत सेळगावकर हे उपाध्यक्ष, तर प्रदीप मोरे हा सेक्र ेटरी आहे. ही संघटना या कर्णबधिर लोकांची आवाज बनली आहे.  2013पासून या संघटनेने आपल्या मागण्यांसाठी पाचवेळा मोर्चा काढला आहे. ते झगडत आहेत, आपल्या मागण्यांसाठी!



( लोकमत ऑनलाइनमध्ये वार्ताहर आहे.)
 

Web Title: hearing-impaired youth & their problem, are we not listening them?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.