दिल ये जिद्दी है..
By admin | Published: August 25, 2016 05:17 PM2016-08-25T17:17:39+5:302016-08-25T17:30:39+5:30
सिंधू-साक्षी-दीपा-ललिता त्यांचं जिंकणं, फक्त मेडलपुरतं मर्यादित नाही..
- अमृता कदम
सिंधू-साक्षी-दीपा-ललिता
त्यांचं जिंकणं, फक्त मेडलपुरतं मर्यादित नाही..
त्यांच्या जिंकण्याइतकंच महत्त्वाचं आहे,
त्यांनी ‘ज्यांना’ हरवलं, त्यांचं हरणं!
आणि ‘ते’ म्हणजे कुणी विदेशी खेळाडू नव्हेत,
ते आपल्याच अवतीभोवती,
‘आपले’ म्हणून वावरत असतात..
त्यांना हरवलं या मुलींनी..
ते कसं?
आल्या कुठून या मुली?
सिंधू.
पहाटे चारपासून कोर्टवर असते ती गेली कितीतरी वर्षं.
सतत सात-सात तास सरावात बुडालेली.
नेटपलीकडून येणारं शटल सोडलं तर काही दिसत नाही तिला
आणि तिच्या महत्त्वाकांक्षेखेरीज दुसरं काही नाही तिच्या जगात.
आणि साक्षी?
ती तर हरियाणाच्या खेड्यातली.
मुली जन्मालाच येऊ नयेत म्हणून तिथे नवस बोलतात अजूनही
आणि आलीच चुकून गर्भात तर
तिथूनच त्या टिंबावर सुरी फिरते म्हणे, का?
तर मुलगी ओझं. वंशाचा दिवा मुलगा ना.
पण ही पठ्ठी राहिली अशा हरियाणात पाय रोवून उभी.
तक्र ारी करण्यात, रडण्या-ओरडण्यात वेळ नाही वाया घालवायला तिने.
तिच्या आईवडिलांनाही फार शिव्या बसल्या म्हणतात.
मुलगी कुस्ती खेळते,
चड्डी घालून लोकांसमोर जाते... क्या होगा इस छोकरीका?
नवरा कसा मिळेल?
आणि कान लांब झाले तर?
शिवाय ही पोरगी अशी उंडारत फिरणार, तर चुल्हाचौका कोण बघेल?
पण ऐकलं नाही तिनं.
तिचं नावही नव्हतं कुणाला माहीत.
तिरंगा फडकावत आपल्या कोचच्या खांद्यांवर बसून
डौलात मिरवली रिओच्या मैदानात तेव्हाच कळलं लोकांना,
की अरे ही साक्षी मलिक!
ललिता बाबर तर कुठली माणदेशातली मुलगी.
तिच्याकडे तर बूट घ्यायलाही पैसे नव्हते म्हणे..
आणि ती दीपा कर्माकर, तिचं तर राज्य कुठं तिकडे दूर ईशान्येत,
तिच्याकडे कसल्या सुुविधा नी काय?
पण जिम्नॅस्टिकमध्ये तिनं जे करून दाखवलं,
ते पाहून साऱ्या जगानं बोटं नाही मनगटंच तोंडात घातली!
अशा कशा या जिद्दीच्या मशाली,
आपल्या समाजात अशा लखलखत उभ्या राहिल्या?$$्रिअलीकडेच कुणा एका मुलीने फेसबुकवर एका पोस्ट लिहिली,
या तळपत्या मशालींसंदर्भात.
ती फार व्हायरलही झाली, वाचली का तुम्ही?
ती पोस्ट लिहिणारी मुलगी म्हणते,
त्यांनी काही फक्त तिकडे खेळात प्रतिस्पर्ध्यांना हरवलं नाही,
जागतिक दर्जाची उच्च कामगिरी फक्त त्यांच्या खेळापुरती मर्यादित नाही.
त्यांनी जन्माआधीच मुलींचे खून करणाऱ्या
‘त्या’ अल्ट्रासाउण्ड गर्भलिंग चाचणीलाच हरवलं,
जी जाहीर करते की, ही ‘ती’ आहे, ‘तो’ नाही!
‘फिंद्रीच’ झाली असं सांगण्याच्या सुरात रडवेली होत,
मुलगीच आहे असं सांगणाऱ्या नर्सलाही त्यांनी हरवलं.
आणि पोटात नाहीच मारता आलं म्हणून रोज, दररोज
‘मुलगी आहेस तू, छातीवरची जळती शेगडी’ असं म्हणत
‘तिला’ कमी लेखणाऱ्या, तिचा रागराग करणाऱ्या पालकांनाही त्यांनी हरवलं.
शिकून डॉक्टर नाहीतर इंजिनिअरच व्हायचं असतं ही यशाची व्याख्या ठरवणाऱ्या
खानदानकी परंपरेलाही त्यांनी मागं सारलं..
खेलकुद पोरीबाळींचं काम नाही असं सांगणाऱ्या अनेक पीटी टीचर्सनाही त्यांनी मात दिली.
आणि क्रीडाधोरणाचा पुरता खेळखंडोबा करणाऱ्या,
खेळाडूंऐवजी साऱ्या सुविधा स्वत:च उडवणाऱ्या
बाबूशाहीलाही त्यांनी धूळ चारली..
‘इतवीत कपडे घालून कुठं मैदानावर खेळतेस, घरात बस’
असं म्हणणाऱ्या दादा-नाना-आजोबा टाइप्स लोकांना
आणि उन्हातान्हात खेळलीस तर काळी पडशील,
असं काळजीने म्हणणाऱ्या आजी-नानींना,
‘जरा कमी कर तुझं अॅग्रेशन’ असा सल्ला देणाऱ्या मित्रमैत्रिणींना,
कुठं गावभर हिंडत राहतेस म्हणून तांकझाक करणाऱ्या
शेजारच्या काकामावश्यांना
हरवत जिंकली आहेत त्यांनी ही मेडल्स !
खेळणाऱ्या तरुण मुलीच्या मैदानावरल्या कौशल्यापेक्षा
तिच्या उघड्यावाघड्या पायांकडेच पाहणाऱ्या हावरट नजरांना,
‘लग्न कधी करणार?’ या सततच्या भोचक उत्सुकतेला
आणि ‘सेटल कधी होणार?’ या राष्ट्रीय प्रश्नालाही माती चारली आहे त्यांनी!
त्यामुळे त्यांच्या जिंकण्याला ‘आपलं जिंकणं’ म्हणत मिरवू नका..
त्यांच्या कर्तृत्वाचं चिमूटभर यशही ‘हमारी बेटी’ म्हणून
हक्कानं मागू नका...
जे काही आहे, ते फक्त त्यांचं आहे,
त्यांनी आपल्या सगळ्यांना हरवून मिळवलेलं आहे..
****
लागला का दिसायला तुम्हाला तुमचाच चेहरा, आपलाच चेहरा?
किंवा खेड्यापाड्यात घुसमटलेल्या तुमच्या कुण्या मैत्रिणीचा?
तू मुलगी आहेस,
हे काम बाईमाणसाचं नव्हे,
लग्न कर, ते महत्त्वाचं, बाकी शिकायचं काय ते नंतर..
एकट्यादुकट्या मुलीचं हे काम नाही,
जरा चारचौघींसारखी वाग..
जरा लाव चेहऱ्याला गोरं होण्याचं क्रीम,
लग्न कसं जमायचं तुझं..???
... असे सारे टोमणे ऐकायला लागलेल्या
आणि त्यापायी मनातून हरलेल्या अनेकींची लढाईच
तर लढल्या या मुली..
त्या जिंकल्या म्हणून त्यांचं कौतुक नाही,
तर आपल्या समाजरीती, आपल्या धारणा,
बाईपणाचं उगीचचं कौतुक ते काचेचं भांडं असल्याची धास्ती,
खानदान की इज्जत ते घरच्यांवरचं ओझं
या साऱ्या गोष्टींना त्यांनी हरवलं
म्हणून त्यांच्या जिंकण्याचं कौतुक!!!
आणि हे जिंकणं फक्त सिंधू किंवा साक्षीपुरतं कुठं उरलंय आता?
ते तर आहे आपलं.
भारतातल्या प्रत्येक मुलीचं.. तिच्या स्वप्नांचं जिंकणं!!
आपल्यातही काहीतरी खास आहे,
अशी चिमूटभर आग सिंधू, साक्षी, दीपा आणि ललिताने
भेट म्हणून वाटली आहे सगळ्या मुलींना!!
तुम्हाला मिळाली का ती आग?