उंची कमी आहे? तुलनेनं लवकर वयात आलात?- ते कसं ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 01:41 PM2018-08-10T13:41:20+5:302018-08-10T13:42:09+5:30
वजन उंचीचं गणित वाढत्या वयात महत्वाचं ठरतं!
- डॉ. यशपाल गोगटे
किशोरवयीन मुला-मुलींमध्ये लैंगिक बदल घडवणारा काळ, त्याला पौगंडावस्था असे म्हणतात. उंची व लैंगिक बदलाबरोबर मानसिक व आकलनविषयक बदल या काळात घडत असतात. साधारणतर् मुलींमध्ये बाराव्या वर्षी व मुलांमध्ये तेराव्या वर्षी हे अपेक्षित परिवर्तन घडत असतं. मागील लेखात पाहिल्याप्रमाणे सुप्त असलेली जननसंस्था एका विशिष्ट वयात अचानक जागृत होते व पौगंडावस्थेला सुरुवात होते. शरीरशास्त्नाप्रमाणे बहुतेककरून योग्य वजन झाल्यावर हे बदल आढळतात. हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुला-मुलींमध्ये चरबीचं प्रमाण वाढत चाललं आहे. टीव्ही व सोशल मीडियाच्या अतिप्रभावामुळे मानसिक प्रगल्भतादेखील लवकर येत आहे. त्यामुळे वयात येताना व्हायचं ते वजन अनेक मुलं-मुली वयाच्या आधीच प्राप्त करतात. बहुतेककरून लवकर वयात येण्याचं हे एक मुख्य कारण समोर आलं आहे. त्यामुळे हे बदल आजकालच्या काळात मुलींमध्ये दहाव्या वर्षी व मुलांमध्ये अकराव्या वर्षी दिसून येतात; पण काही वेळेस हे बदल त्याही अगोदर होत असल्यास त्या आजाराला अकाली पौगंडावस्था (प्रीकॉशियस प्युबर्टी) असं म्हणता येईल.
अकाली पौगंडावस्था हा पालक व बालक दोघांसाठी अतिशय मानसिक तणाव आणणारा हार्मोन्सचा आजार आहे. बालकामध्ये तेवढी समज नसल्यामुळे हे शरीरात घडणारे बदल त्याला त्नासदायक ठरतात. त्यामुळे इतर मुला-मुलींपेक्षा आपण वेगळे आहोत या भावनेनं न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. पालक स्वतर्देखील यामुळे चिंतित होतात व काय करू हे समजत नसतं. आपल्याकडे समाजात या विषयावर मोकळेपणाने चर्चा होत नाही त्यामुळे बरेच वेळा संकोचून, घाबरून जाऊन या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते. पालकांनी या आजाराबद्दल सतर्क राहावं म्हणून काही लक्षणांचं गांभीर्य जाणून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मुलींमध्ये आठ वर्षाच्या आत स्तनांची वाढ, काखेत अथवा जांघेत केस येणं, पाळी येणं अशी लक्षणे आढळतात. तर मुलांमध्ये केस येणं, आवाज घोगरा होणं, राग, लोभ तीव्र होणं व लैंगिक प्रेरणा येणं हे होऊ शकते. मुला-मुलींमध्ये अचानक उंची वाढीला वेग येणं हेदेखील या आजाराचं लक्षण असू शकतं.
या आजारातील सर्वात मोठा शारीरिक तोटा म्हणजे लवकर सेक्स हार्मोन्स सक्रिय झाल्यामुळे हाडांची वाढ थांबते व सुरुवातीला तुलनेनं उंच वाटणारी मुलं पुढं जाऊन मात्न बुटकी राहतात. या आजाराकरता अनेक कारणं असू शकतात. तज्ज्ञ डॉक्टर योग्य त्या तपासण्याकरून आजाराचं निदान कायम करतात. वेळेवर केलेल्या औषधोपचारानं काही प्रमाणात होणारा मानसिक ताण व उंचीचा तोटा नियंत्नणात ठेवता येतो.
या आजाराची दुसरी बाजू म्हणजे किशोरवयीन मुला-मुलींमध्ये हे बदल उशिरा दिसून येणं. याला ‘डिलेड प्युबर्टी’ अथवा उशिरा येणारी पौगंडावस्था असं म्हणता येईल. मुलींमध्ये वयाच्या तेराव्या वर्षार्पयत व मुलांमध्ये वयाच्या चौदाव्या वर्षार्पयत जर काहीच लैंगिक बदल झाले नसतील तर या आजाराची लक्षणं असू शकतात. अनेकवेळा या आजारामध्ये उंचीदेखील कमी राहू शकते. त्यामुळे बरोबरीच्या वयाच्या मुला-मुलींपेक्षा उंची कमी असल्यास पालकांनी सतर्क राहणं गरजेचे असते. हा आजार बरेच वेळा सेक्स हार्मोन्सच्या कमतरतेमुळे होत असतो. त्यामुळे तज्ज्ञ डॉक्टरांना भेटून योग्य तो उपचार घेतल्यास फायदा होतो.
पौगंडावस्थेच्या या दोन्हीही विकारांमध्ये लवकर निदान झाल्यास योग्य त्या उपचारांनी नैसर्गिक वाढ होते व पुढील समस्या टाळता येतात. त्यामुळे पालकांनी सगळे मनातले गैरसमज, भीती, संकोच बाजूला ठेऊन सतर्क राहणं गरजेचं आहे. काहीही शंका असल्यास आपल्या जवळील हार्मोन्स तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.