एका पायावर उंच उडी

By admin | Published: September 22, 2016 06:41 PM2016-09-22T18:41:25+5:302016-09-22T18:41:25+5:30

आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच, त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं, मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, यानं काय फरक पडतो?

High jump on one of the legs | एका पायावर उंच उडी

एका पायावर उंच उडी

Next
- विश्‍वास चरणकर
 
आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक सुपर हिरो दडलेला आहेच,
त्याला जगवायचं नी कष्ट करत राहायचं,
मग आपल्याला हातपाय आहेत की नाही, 
यानं काय फरक पडतो?
- पॅरालिम्पिक स्पर्धेत 
सुवर्णपदक जिंकणार्‍या 
मरिअप्पनची एक जिद्दी गोष्ट.
 
कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण झेप घेण्याचं काळीज जन्माला येताना घेऊन यावं लागतं, असं टिपिकल घिसंपिटं वाक्य कितीदा कानावर पडतं.
फॉरवर्ड मारायला बरी पडतात अशी वाक्यं, मात्र एखादा माणूस अशी वाक्यं जेव्हा खरी करून दाखवतो, जगतो तेव्हा चकित होण्यापलीकडे दुनियेच्या हातात दुसरं काही नसतंच. 
मरिअप्पन थांगवेलू. हे नाव त्याच पराक्रमाची साक्ष देतंय. वयाच्या पाचव्या वर्षी अपघातात पाय गेला; पण जगण्याची आणि जिंकण्याची ऊर्मी काही तो अपघात अधू करू शकला नाही.
तामिळनाडूतलं सालेम (दक्षिणेत त्याचा उच्चार सेलम असा करतात) शहराजवळच्या पेरियावादमगाती नावाच्या अगदी छोट्या गावातला हा मुलगा. वडिलांनी आईला टाकून दिलेलं. सोबत तीन भावंड. पाच वर्षांचा मरिअप्पन रमत-गमत शाळेत चालला होता. भरधाव आलेल्या एका बसने त्याला धडकच दिली. ती इतकी भयानक होती की त्याचा उजवा पाय बसच्या चाकाखाली सापडला आणि कायमचा अधू झाला.  अपघातानं शरीर अधू झालं, पण  खेळाकडील त्याची ओढ मात्र कमी झाली नव्हती. त्याला व्हॉलिबॉलची आवड होती. मात्र सुरुवातीला खेळताना मैदानाबाहेर गेलेला चेंडू आणून देण्यातच त्याला धन्यता मानावी लागे. मात्र मरिअप्पन हळूहळू संघात खेळू लागला. व्हॉलिबॉल स्मॅश करण्यासाठी मोडक्या पायानं उडी मारणारा मरिअप्पन क्रीडाशिक्षक आर. राजेंद्रन यांच्या नजरेत भरला. त्यांनी त्याला उंच उडी या खेळाकडे वळविले. 
वयाच्या १५ व्या वर्षी त्याने जीवनातील पहिल्या स्पर्धेत भाग घेतला, तोही शारीरिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूंसोबत. या स्पर्धेत त्यानं दुसरा क्रमांक मिळवला. पुढे २0१३ च्या राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धेत सत्यनारायण यांच्या नजरेस हा हिरा पडला. त्यांनी त्याला आणखी पैलू पाडण्याचं ठरवलं. त्यासाठी ते त्याला बेंगळुरूला घेऊन गेले. तेथे दोन वर्षांच्या खडतर प्रशिक्षणानंतर २0१५ मध्ये तो त्याच्या कॅटेगिरीतील जगात क्रमांक एकचा खेळाडू बनला होता. 
आता त्याचं ध्येयं होतं रिओ पॅरालिम्पिक. 
ती स्पर्धा तो कशासाठी खेळला?
अनेकजण सांगतात, देशासाठी, पदकासाठी?
पण मरिअप्पन खरंखुरं उत्तर देतो. 
तो म्हणतो, हे मोठ्ठं मेडल मला का हवंय? तर त्यानं मला नोकरी मिळेल आणि माझ्या आईची मला नीट देखभाल करता येईल!
भाजी विक्रीचा व्यवसाय करून आईनं मरिअप्पनला वाढवलं. त्याच्या पायावर उपचार करण्यासाठी तिनं घेतलेलं तीन लाख रुपयांचं कर्ज अजूनही ती फेडतेच आहे. तिच्या कष्टाचं, हालअपेष्टांचं चीज करायचं एवढाच त्याचा खरंतर ध्यास होता.
२१ वर्षांच्या मरिअप्पनने १.८९ मीटर ऐतिहासिक उंच उडी घेत सुवर्णपदक जिंकले. या प्रकारात भारताला सुवर्ण जिंकून देणारा तो पहिला खेळाडू ठरला.
आणि त्यापुढची गोष्ट. त्याला मिळालेल्या बक्षिसातून त्यानं ३0 लाख रुपये रक्कम त्यानं तो ज्या शाळेत शिकला, त्या शाळेला भेट म्हणून दिली.
सुवर्णउडी यालाही म्हणतातच.
 
मरिअप्पन म्हणतो,
 आता वाटतं, आपल्या सगळ्यांमध्ये एक सुपरहिरो आहेच, त्याला जगवायचं, मग हातपाय आहेत की नाही, यानं देखील काय फरक पडतो?
 
(लेखक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

 

Web Title: High jump on one of the legs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.