पायात मणामणाच्या बेड्या
By admin | Published: October 2, 2014 08:10 PM2014-10-02T20:10:43+5:302014-10-02T20:10:43+5:30
जाऊ का पळून’? हे एका मैत्रिणीची खंत माडणारं पत्र १२ सप्टेंबर २0१४च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं.
Next
>ऑक्सिजन -
‘जाऊ का पळून’? हे एका मैत्रिणीची खंत माडणारं पत्र १२ सप्टेंबर २0१४च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं. त्या पत्राला प्रतिक्रिया देत अनेक मित्रमैत्रिणींनी फोन करुन, पत्र लिहून आणि फेसबूकवर मेसेज टाकून कळवलं की, आमचाही हा प्रश्न आहे. जातीपातींनी घेरलंय. घरचे इमोशनल ब्लॅकमेल करताहेत आणि पळायचं म्हटलं तरी पळता येत नाही. अनेकजणांनी आपला प्रश्न फोनवरही तपशिलात सांगितला. काय उत्तर देणार त्या प्रश्नांना? पळाच ! किंवा अजिबात पळू नका, घरचे म्हणतील तसंच करा, असं तरी कसं सांगणार? मात्र या चर्चेतून कळलं इतकंच की, प्रेमात पडलेल्या मुलांसाठी जातीपातीचे आणि घरच्यांच्या विरोधाचे प्रश्न हिमालयाएवढे मोठे आहेत.
जे सुटता सुटत नाहीत, काहीजण तर म्हणतात की, पळून जाऊन लग्न केलं तरी हे प्रश्न पिच्छा सोडत नाहीत. अस्वस्था व्हावं, प्रसंगी हताश वाटावं अशा या कहाण्या.
इतरांनी केलेल्या प्रेमभंगाच्या. त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया नक्की वाचा.
आहे उत्तर?
मी इंजिनिअर. ती ही.
आम्ही दोघं एकाच कंपनीत नोकरी करतो.
त्यात आमची जातही एकच आहे. पण तरीही माझ्या आईला मुलगी पसंत नाही. खूप खोदून खोदून विचारल्यावर म्हणाली, ‘केस कापलेली, नोकरी करणारी मुलगी आपल्या घरात नको.ती डोक्यावर बसेल.!’
किती समजावलं पण तरीही ती ऐकतच नाही. आता तर ब्लॅकमेल करतेय की तू केलंच तिच्याशी लग्न तर मी जिवाचं बरंवाईट करेन.
काय करावं आणि कसा सोडवावा प्रश्न?
डोकं फुटून चाललंय, मी एकुलता एक. वडील नाहीत. आईनंच मला लहानचं मोठं केलं, आता तिच्या विरोधात कसं जायचं? आणि या मुलीवर जीवापाड प्रेम आहे, हिला तरी कसं सोडून द्यायचं?
आहे उत्तर?
- आदिनाथ, पुणे
पळून गेले पण.
‘जाऊ का पळून’?
असं विचारत न बसता मी पळून जाऊनच लग्न केलं. दोन वर्षे झाली लग्नाला. तू आम्हाला मेलीस म्हणून घरच्यांनी टाकलं मला. नुकतंच लहान बहिणीचं लग्न झालं. त्या लग्नालाही बोलावं नाही.
आणि इकडे मी ज्याच्याशी लग्न केलं, त्याच्या घरचे मला छळतात. त्यांना माहितीये मला माहेरचा आधार नाही. नवरा म्हणतो, तू समजुतदार आहे, घे सांभाळून.
आता माझा हा प्रश्न मी कुणाला सांगायचा आणि आता कुठं पळून जायचं?
- प्रियांका, नागपूर
ती पळाली,
मी अडकले !
माझी मोठी बहीण. तिनं पळून जाऊन लग्न केलं.
त्यावेळी घरात इतकी रडारड. मुलीनं खालच्या जातीत लग्न केलं म्हणून, हा सारा आक्रोश. मला हे काही पटत नव्हतं. पण घरात माझं कुणी ऐकलंच नाही. त्यांचं एकच आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. ‘त्यांची मुलगी पळून गेल्याची चर्चा’ तर होतीच. पण मी ही तशीच असेन असं लोक म्हणू लागले. टवाळ पोरं माझ्या मागे फिरू लागली.
तिकडे माझी बहीण सुखात आहे. माझे मेहुणेही चांगले आहेत. मात्र अजूनही माझं घर त्या धक्क्यातून सावरायला तयार नाहीत. नातेवाईक अजून आम्हाला त्यांच्याकडच्या लग्नाला बोलावत नाहीत. आईबाबा गेलेच क्वचित कुठं त्यांच्याकडे तरी लगेच टोमणे मारतात. धाकटीचं लग्न लावून टाका म्हणतात लवकर.
खरंतर माझं कुणावर प्रेम नाही, ना मी पळून जाईन.
पण तरी लोकांना काळजी.
आता घरचे माझ्यासाठी स्थळं पाहताहेत.
कुणाकुणाला काय काय समजावणार.?
पळून जाणं इतकं सोपं थोडंच असतं.
अनेक माणसांच्या जगण्याची फरफट होते त्या पळण्यात.
आणि मुख्य म्हणजे, चूक पळण्याची नसली तरीही.
- अपर्णा कुलकर्णी,
हडपसर
TTMM म्हणजे काय?
TTMM म्हणजे टेन्शन-टेंगळं-मस्ती- मॅजिक.
म्हणजे काय?
तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच!
म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे!
मग वाट कसली पाहता.?
लिहा बिंधास्त.
आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे.
आम्ही वाट पाहू.
आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.
पत्ता?
ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी अंबड, नाशिक, ४२२0१0