अजब हार्मोन्स की गजब कहानी, शरीरात धावणारं भन्नाट रसायन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 02:39 PM2018-01-10T14:39:08+5:302018-01-11T08:46:48+5:30

ऐन तारुण्यात शरीर-मनात होणारे बदल धुमाकूळ घालतात. सतत मूड जातात. कधी वजन वाढतं, कधी वाढतंच नाही. चेहऱ्यावरचे पिंपल्स तर अत्यंत छळकुटे. कधी कुणाविषयी आकर्षण वाटतं, कधी वाटतच नाही. हे सारं कशानं? हार्मोन्स

hormonesl situation in Human body | अजब हार्मोन्स की गजब कहानी, शरीरात धावणारं भन्नाट रसायन

अजब हार्मोन्स की गजब कहानी, शरीरात धावणारं भन्नाट रसायन

Next

- डॉ. यशपाल गोगटे

हार्मोन्सची हार्मोनी

हार्मोन्स हे रासायनिकदृष्ट्या तीन मुख्य प्रकारांमध्ये मोडतात. अमिन्स, प्रथिनं व चरबी. त्यांची आंतरिक रचना इतकी विशिष्ट असते की एका अवयवातून दुसऱ्या अवयवांकडे संदेश वहन करताना थोडीशीही चूक होत नाही. आणि ती झालीच तर ते जीवघेणंही ठरू शकतं. संदेश मिळताच त्या विशिष्ट अवयवांकडून हार्मोन बनवणाºया ग्रंथीला लगेच प्रतिसादही मिळतो. यातून आपल्या शरीरात एक समतोल साधला जातो. मुंबईतील डबेवाले हे लाखोंच्या संख्येने एकही चूक न करता दररोज डब्यांची ने-आण करत असतात, याचे आपल्याला अमाप कौतुक वाटते. विचार करा शरीरामध्ये एका क्षणात असे लाखोंनी संदेश वहन होत असते ज्याचा आपण साधा विचारही करत नाही.
त्या वहनात बिघाड झाला की मात्र दंगल उसळते. म्हणून ती हार्मोनी जपणं फार महत्त्वाचं !

वयात येण्याचं वय.
त्याची केवढी चर्चा होते. शरीर-मनात होणारे बदल. पंचविशीपर्यंत आणि त्यानंतरही नुस्ता धुमाकूळ सुरू असतो. घरात कुणाशी पटत नाही. स्वत:चेही सतत मूड जातात. कधी हे करावंसं वाटतं तर कधी ते करावंसं वाटतं.
कधी वजन वाढतं, तर कधी वाढतंच नाही.
चेहºयावरचे पिंपल्स तर अत्यंत छळकुटे ते भयानक त्रासदायक वाटतात.
कधी कुणाविषयी आकर्षण वाटतं, कधी वाटतच नाही.
असे कितीतरी प्रश्न वयात येताना आणि त्यानंतर तारुण्यातही अनेक मुलामुलींना छळतात. त्यांच्या पालकांना हैराण करून सोडतात. अनेकदा या बदलाच्या टप्प्यांत मनाचा विचार होतोच. मनाला कसं सावरायचं, संवाद कसा साधायचा याची चर्चा होते. गरज पडल्यास समुपदेशनही घेण्यात येतं. आणि चर्चा होते ती मनाच्या बदलाची. मनात होणाºया भूकंपाची आणि त्यातून निर्माण होणाºया प्रश्नांची.
पण या साºयात शरीराचं काय?
आणि मुख्य म्हणजे शरीरात निर्माण होणाऱ्या हार्मोन्सचं काय?
आपलं शरीर आणि मन दोन्हीही अनेकदा वेगळंच वागतं, धुमसत राहतं, आजारांनी हैराण होतं आणि कधीकधी तर पेचातच पाडतं.
हे सारं कशानं होतं?
त्याचं एक उत्तर, हार्मोन्स असंही असतं.
या हार्मोन्सच्या खेळाचा आणि त्यांच्या वर्तनाचा आपण कधी विचारच करत नाही आणि त्यामुळे त्यांनी घातलेले घोळ सोडवायचे कसे हेही आपल्या लक्षात येत नाही.
पण आपल्या शरीरमनातली ही धुमश्चक्री समजून घ्यायची तर या हार्मोन्सचीही ओळख करून घेतली पाहिजे.
ती करून घेण्याचा आणि या अजब हार्मोन्सची गजब कहानी नक्की काय असते हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे सदर.
पृथ्वीतलावरील संपूर्ण जीवसृष्टीत मानवी शरीर ही निसर्गाची एक अद्भुत, उन्नत निर्मिती आहे ! या शरीरातील विविध अवयव जसे की लिव्हर, किडनी, मेंदू व स्नायू हे स्वतंत्रपणे कार्यरत असतात. पण त्याचवेळी त्यांना परस्पर निर्भर असणंही आवश्यक असतं. शरीरातील हे अवयव एकत्रितपणे काम करतात तेव्हा त्यांच्या एकोपा असणंही आवश्यक असतं. टीममध्ये कसे सगळे वेगळे खेळतात; पण टीम एक असते. परस्पर संवाद असतो. तो संवाद साधण्याचं आणि एकमेकांना संदेश देण्याचं काम रसायनं करतात. आणि त्या संदेश वाहक रसायनांनाच म्हणतात ‘हार्मोन्स’. अवयवांना एकमेकांशी जोडणाºया रक्तवाहिन्यांनी बनवलेल्या रुळावरून हे हार्मोन्स धावत असतात.
साधारण शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वी स्टारलिंग नावाच्या चिकित्सा-वैज्ञानिकानं त्यांचं बारसं केलं आणि तेच हार्मोन्स नाव पुढे प्रचलित झालं. मुळात हा शब्द ग्रीक. ‘उत्तेजित करणं’ असा त्याचा अर्थ होतो.
हार्मोन्सचं काम पाहिलं तर हे नाव अगदी परफेक्ट ठरतं.
पण नाव परफेक्ट असलं तरी त्यांच्या कामाचं तंत्र बिघडलं की शरीराचंही तंत्र आणि मंत्र बिघडून जातं.
हार्मोन्सच्या असमतोलामुळे होणारे आजार आपल्या देशात प्रचंड आहेत. त्यातून शरीरात गोलमाल होतो; पण ते पटकन लक्षात येत नाही कारण बरेचदा हे आजार शरीरात सुप्त अवस्थेत असतात. त्यांना म्हणतात एण्डोक्रिन आजार. त्यांच्याविषयी फारसं माहिती नसल्यानं ऐन तारुण्यात शरीर-मनातच नाही तर घरात, समाजातही अनेक लढाया लढल्या जातात..
आजार भलतीकडेच, उपचार भलतीकडेच असं होतं..
ते नेमकं कशानं होतं, त्याविषयी बोलू पुढच्या आठवड्यात...

( लेखक सुप्रसिद्ध एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोनतज्ज्ञ आहेत.)
 

 

Web Title: hormonesl situation in Human body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.