कसं? बबन म्हणेल तसं!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2018 02:12 PM2018-03-22T14:12:56+5:302018-03-22T14:12:56+5:30

ख्वाडा या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचा हा दुसरा सिनेमा. बबन. अस्सल मातीतला सिनेमा काढायचा म्हणून झपाटलेल्या भाऊराव क-हाडेनं आपली जमीन विकून पहिला सिनेमा बनवला. दुसऱ्या सिनेमाचीही त्याची वाट सोपी नव्हतीच.. मात्र रांगडा, ग्रामीण बाजाचा आणि ठसक्याचा सिनेमा घेऊन तो पुन्हा पडद्यावर परतलाय. त्यानिमित्त, त्याच्याशी या गप्पा..

How? Baban said as well! | कसं? बबन म्हणेल तसं!

कसं? बबन म्हणेल तसं!

Next

- सुधीर लंके

नव्या दमाच्या या दिग्दर्शकांनी खेड्यांनाच चित्रनगरी बनविले आहे. नगरसारख्या जिल्ह्यात गत दोन-तीन वर्षात पाच-सहा चित्रपट बनले. तरुण पोरंच हे चित्रपट बनवताहेत. एका दिग्दर्शकाने तर अंकुश चौधरीला कास्ट केलंय. त्याचही शूटिंग नुकतेच नगरला झाले आहे. भाऊराव नगरच्या न्यू आॅर्ट्स महाविद्यालयात सिनेमा बनवायला शिकला. त्याच्यासोबतची बहुतांश टीमही नगरची आहे. ‘ख्वाडा’च्या निर्मितीसाठी भाऊरावनं स्वत:ची जमीन विकून चित्रपट काढला. ख्वाडाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तेव्हा भाऊराव लोकांना कळला. नगरसारख्या गावात एवढे दर्जेदार दिग्दर्शक आहेत, चित्रपटाच्या कहाण्या आहेत याचे महाराष्ट्राला नवल वाटलं. नागराजही याच कॉलेजात शिकला.
ख्वाडा पाहिल्यानंतर मनोहर मुंगी आणि जोशी काका हे दोन सत्तरी ओलांडलेले गृहस्थ भाऊरावकडे आले व त्याला शंभरची नोट देऊन शाबासकी दिली. भाऊरावने पैसे नको, फक्त आशीर्वाद द्या म्हणून त्यांना विनंती केली. त्यावर ते दोघंही म्हणाले, ‘अरे ठेवरे. तुझ्या पुढच्या पिक्चरसाठी लाव’. या शंभराच्या नोटेतून उभारी घेऊन आपण हा दुसरा चित्रपट केल्याचे भाऊराव सांगतो. या दोघांचाही त्याने ‘बबन’च्या नामावलीत खास ऋणनिर्देश केलाय.


हिरो-हिरोईन चिखलात डुबकी मारून वर येतात, असे एक दृश्य ‘बबन’ या येऊ घातलेल्या मराठी चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसतेय. हे चिखलातले हिरो-हिरोईन सध्या सोशल मीडियावर भलतेच चर्चेत आहेत. पावसात भिजणारे हिरो-हिरोईन थेट चिखलात माखलेले दिसताहेत...सिनेमा अजून यायचाय; पण नगर जिल्ह्यातल्या या ‘ख्वाडा’फेम दिग्दर्शकाला म्हणजे भाऊराव क-हाडेशी गप्पा मारताना एक मातीतली गोष्ट आणि सिनेमाचं रांगडं ‘मेकिंग’ उलगडत जातं. सगळं काम मोकळंढाकळं, सहजसोपंच. बबनसाठी नायिकेची निवड कशी झाली, याचा किस्सा भाऊराव सांगतो. ती नायिका त्याला भेटली, पुण्यात बाणेर रोडवर. आपल्या चित्रपटाची नायिका कशी असावी याचं एक रेखाचित्र करून ठेवले होते. तशीच नायिका त्याला हवी होती. तशी मुलगी न भेटल्यास चित्रपटाचा विचार सोडून द्यायचा असं त्यानं मनाशी घाटलं होतं. पण त्याच्या मनातल्या रेखाचित्रासारखी तरुणी त्याला बाणेर रस्त्यावर आईसोबत फिरताना दिसली. तेव्हा हा दिग्दर्शक मित्रांसोबत वडापाव खात होता. या मुलीला बघताच तो आणि त्याच्या मित्रांचा ग्रुप अधाशासारखा धावत गेला. एखाद्या मुलीला प्रपोज करावं तसं तू माझ्या चित्रपटाची नायिका होशील का? हे भाऊरावनं तिला थेटच विचारलं. हीच गायत्री जाधव आता ‘बबन’ची हिरोईन आहे. तिला अभिनयातला ‘ट’ की ‘फ’ माहीत नव्हतं. त्यादिवशी रस्त्यावर तर भाऊरावला ओळखलही नव्हतं. त्यानं तिचा नंबर मागितला तर तोही दिला नव्हता. शेवटी भाऊरावनेच तिला आपला स्वत:चा नंबर दिला. घरी गेल्यावर माझा ‘ख्वाडा’ चित्रपट बघ, नेटवर त्याच्याबाबत काही माहिती वाच आणि चित्रपटात काम करण्याची झालीच इच्छा तर फोन कर असं कळवलं. घरी गेल्यावर या मुलीने सहकुटुंब ख्वाडा बघितला तेव्हा हा कोण भाऊराव क-हाडे हे तिला कळलं. पुढे बऱ्याच विचाराअंति तिनं होकार कळविला.

गायत्री एका सामान्य कुटुंबातील मुलगी. वडील शासकीय नोकरी करतात. भाऊरावला जेव्हा ती प्रथम रस्त्यावर दिसली तेव्हा दहावीत होती. आता बारावीची परीक्षा दिली. ही मुुलगी चित्रपटात काम करण्याचं धाडस करू शकेल का हा प्रश्न होताच. त्यासाठी भाऊरावनं तिची जी आॅडिशन घेतली, तेही भन्नाटच होतं. तिला एका खोलीत बसवलं आणि मी जो मुलगा या खोलीत पाठवेल त्याच्या कानफटात वाजवायची अशी असाईनमेंटच तिला दिली. गायत्रीही भारीच. जो कुणी मुलगा तिथं पहिल्यांदा आला त्याच्या कानाखाली तिनं खणखणीत आवाज काढला. तेवढ्यावरच झालं तीच कास्टिंग. कानशिलात खाणारा तो अभय चव्हाण, या चित्रपटाचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर आहे.
या चित्रपटाचा हिरो भाऊसाहेब शिंदे हेही भन्नाटच पात्र. भाऊसाहेब हा शेतकरी कुटुंबातला. साधासुधा. मुळातच रांगडा. गावच्या पारावर बसून गप्पांचा फड रंगविणारा. बोलीही रांगडी. ‘ख्वाडा’मध्ये तोच हिरो होता. वैयक्तिक जीवनात हा हिरो प्रचंड लाजाळू. मुलींची सावलीही पडू न देणारा. त्यामुळे याच्याकडून हिरोचा अभिनय कसा करून घ्यायचा यासाठी भाऊरावने गायत्रीला खासगीत आणखी एक असाईनमेंट दिली होती. भाऊसाहेबला तू खरोखरच प्रपोज करून दाखव. भाऊसाहेबचा स्वभाव असा आहे की, एखाद्या हिंदी चित्रपटाच्या नायिकेनं जरी प्रपोज केले तरी हा बाबा नाही म्हणेल हे भाऊरावला माहीत होतं. तरी त्यानं गायत्रीची परीक्षा घेतली. त्यानुसार गायत्रीने प्रयत्नही केले. पण तिला ते जमलं नाही. अखेरीस चित्रपटासाठी तू तुझ्या स्वभावात काही बदल करं, असं गायत्री आणि भाऊराव या दोघांनीही या हिरोला सांगितलं तेव्हा ‘बबन’ तयार झाला.

हिंदी-मराठी चित्रपटांत आता दाढीवाले हिरो दिसत नाही. तिकडं साउथच्या चित्रपटांत असतात. पण, मराठी-हिंदीत दाढी वर्ज्य आहे. मिशाही चालत नाहीत. हिरोंची व्याख्या बदलली आहे. सिनेमातला बबन नावाचा हिरो मात्र दाढीवाला आहे. तो एमएटी या जुन्या स्कूटरवर हिंडतो. वेगळा दिसतो, मातीतला. ग्रामीण बाजाचा. ‘बबन’च्या या मेकिंगबद्दल भाऊराव पुस्तक लिहितोय. त्यात हे किस्से तो सांगतो आहे. नागराज मंजुळे, भाऊराव कºहाडे या तरुण आणि ग्रामीण भागातून पुढे आलेल्या दिग्दर्शकांनी मराठी सिनेमाचा बाजच बदलवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्या काळी दादा कोंडके यांच्या चित्रपटांचा जोर होता. सगळा ग्रामीण बाज त्या चित्रपटांत ठासून भरला होता. धोतर, पागोटे दिसायचे. चंद्रकांत-सूर्यकांत यांनीही ग्रामीण धाटणीचे रोमॅण्टिक मराठी सिनेमे दिले. पुढे अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन, महेश कोठारे हे अभिनेते आले. त्यात ग्रामीण व शहरी असा मिश्र जमाना दिसला. जुन्या काळापासून ग्रामीण सिनेमे आले. पण, त्या सिनेमांतही शहरी पगडा दिसायचा. गावातील मुलीला मुंबईच्या फौजदाराची ओढ असायची. हा ट्रेण्डच ख्वाडा, सैराट यांनी बदलवण्याचा प्रयत्न केला आहे.
हे सिनेमे शतप्रतिशत ग्रामीण जीवन दाखवताहेत. आम्ही आहोत तसे आहोत. शहरी वैगेरे बनणे या ग्रामीण हिरोंना मान्य नाही. सुटा-बुटातील हिरोंपेक्षा हे ग्रामीण व रांगडे हिरो बॉक्स आॅफिसवर गल्ला जमवायला लागले आहेत. मराठीत हा नवीन ट्रेण्ड निर्माण झालाय. हे काहीतरी अस्सल आहे असं लोकांना वाटतंय. तरुण दिग्दर्शकांनी हा बदल करून दाखवलाय.

ग्रामीण भागाची वेगळी अशी एक भाषा आहे. ही रांगडी भाषा या मंडळींनी चित्रपटात आणली आहे. ती लोकप्रिय होत आहे.
खेड्यातील मुलांची नावे ग्रामीण ढंगाची असतात. त्यामुळेच चित्रपटाचे नावही ‘बबन’ दिल्याचं भाऊराव सांगतो. असे बबन आपल्याभोवती असतात. गावातील रान, शेत, शेतक-याचे जीवन, भोवतालची आर्थिक समृद्धी पाहून एखाद्या तरुणाला ‘बबन’पासून ‘बबनराव’ होऊ वाटणं याचा प्रवास त्याने या चित्रपटात दाखवलाय. गावशिवारात एक अस्सल रंग दडला आहे. आजवर हा रंग कधी प्रेक्षकांसमोर आलेला नाही. आपल्याकडे एखादं गाणं चित्रित करायचं म्हटलं तरी दिग्दर्शकाला बागेत जावंस वाटतं. मात्र, आपण सगळी गाणी जाणीवपूर्वक गावात, शेतात, तळ्यात चित्रित केल्याचे भाऊराव सांगतो. त्याच्या काही गाण्यांत देखणी डाळिंबाची शेतं दिसतात. ख्वाडामध्ये तर त्यानं लग्नाच्या हळदीचा प्रसंग अफलातून दाखविला. त्यातील पिवळाधमक रंग आणि धनगर समाजाला प्रिय असणारा पिवळाधमक भंडा-याचं अफलातून समीकरण त्याने घातले होते. त्यात नुसताच रंग नव्हता तर एक समाजशास्र होतं.

बबन चित्रपटात एकही स्टार कास्ट म्हणजे नावाजलेला कलावंत नाही. त्यामुळे चित्रपट चालेल का? असा प्रश्न भाऊरावला अनेकांनी केला. इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांनी तर स्टार नाहीत मग आम्ही मुलाखती कोणाच्या दाखविणार, असा प्रश्न केला. पण, या प्रश्नांनी भाऊराव डगमगत नाही. चित्रपटात बैजू पाटील नावाची एक व्यक्तिरेखा आहे. या रोलसाठी नाना पाटेकर, मकरंद देशपांडे, शशांक शेंडे यांनी काम करावं, अशी भाऊराव यांची इच्छा होती. पण, या तिघांशीही संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे स्वत: भाऊरावनेच हा रोल केला.
सोशल मीडियावर ‘बबन’च्या गाण्यांना लाइक्स वाढत आहे. ‘कसं, बबन म्हणेल तसं’ हे वाक्य या वर्षभर कॉलेजच्या कट्ट्यांवर कल्ला करेल, असा विश्वास ‘बबन’च्या टीमला आहे.


(लेखक ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत.sudhir.lanke@lokmat.com)

 

Web Title: How? Baban said as well!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.