हार्मोन्स बनतात कसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 04:57 PM2018-01-17T16:57:13+5:302018-01-18T07:35:26+5:30
हार्मोन्स हा शब्द तर आपल्याला माहितीच असतो. अनेकजण चेष्टा करतात, म्हणतात तरुण मुलं परस्परांना, दादा, हार्मोन्स बॅलन्स चेक करून घ्या.
- यशपाल गोगट
हार्मोन्स हा शब्द तर आपल्याला माहितीच असतो. अनेकजण चेष्टा करतात, म्हणतात तरुण मुलं परस्परांना, दादा, हार्मोन्स बॅलन्स चेक करून घ्या.
मुली तर उदास होऊन म्हणतात, माझं हार्मोनचं तंत्र बिघडलं आहे. वजनाचा काटा आणि हे तंत्र याची अनेकजण सांगड घालून ठेवतात. तेही ऐकिव माहितीवर.
पण हार्मोन्स बनतात कसे?
या हार्मोन्सची निर्मिती विशिष्ट ग्रंथींमध्ये होते. या ग्रंथी शरीरात विभिन्न ठिकाणी असतात. या ग्रंथींना एकत्रितपणे अंर्तस्त्रावी ग्रंथी असं म्हणतात. या ग्रंथींच्या समूहातून जे एक तंत्र विकसित होतं त्याला एण्डोक्रि न सिस्टम असं म्हणतात.
चिकित्साशास्त्रात याचा अभ्यास करणाºया शाखेला एण्डोक्रिनॉलॉजी असं म्हणतात. आणि जो उपचार करतो त्याला म्हणतात एण्डोक्रि नॉलॉजिस्ट.
पण शरीरात असतात कुठं या ग्रंथी? आणि कोणत्या?
पिट्युटरी, थायरॉइड, पॅराथायरॉइड, अॅड्रिनल, स्वादुपिंड व ओव्हरी (बीजांड) किंवा टेस्टीस (वृषण). अशा या ग्रंथी. याच्या व्यतिरिक्त काही अवयव जसे त्वचा किंवा चरबीच्या पेशी या मूळत: अंर्तस्त्रावी ग्रंथी नसल्या तरीही काही प्रमाणात तसंच कार्य करत असतात.
भ्रूमध्य रेषेत, मोठ्या मेंदूच्या तळाशी स्थित असलेली वाटाण्याएवढी पिट्युटरी ग्रंथी इतर सर्व ग्रंथींची महानायिका (मास्टर ग्लॅण्ड) बनून स्वामित्व गाजवते. गळ्यामध्ये मध्यभागी फुलपाखराच्या आकाराची थायरॉइड ग्रंथी ही पर्यवेक्षकाप्रमाणे देखरेखीचे काम करीत असते. कॅल्शिअम व इतर क्षारांचा समतोल ठेवणारी पॅराथायरॉइड ग्रंथी थायरॉइडची सख्खी शेजारीण आहे ! इन्सुलिनच्या माध्यमातून शरीरातील साखरेवर नियंत्रण ठेवणारी ग्रंथी म्हणजे स्वादुपिंड.
किडनीच्या डोक्यावर गांधी टोपीप्रमाणे स्थिरावलेली अॅड्रिनल ग्रंथी ऊर्जा देण्याचं कार्य करत असते.
याचं काम जन्मभर चालतं. पण वयात येताना या ग्रंथी मोठा गहजब करतात.
किशोरवयीन मुलामुलींमध्ये पौगंडावस्थेत जे बदल घडतात ते ओव्हरी (बीजांड ) व टेस्टीस (वृषण) या ग्रंथींच्या स्रावावर अवलंबून असतात.
या सर्व ग्रंथी शरीराच्या त्या त्यावेळच्या आवश्यकतेनुसार क्षणोक्षणी संबंधित अवयवांना कार्यक्षम ठेवतात.
पण या ग्रंथीनीच ताल सोडला किंवा त्यांचं काम बिघडलं तर?
किंवा अन्य आजारांमुळे त्यांच्या कामात बिघाड झाला तर?
तर आपल्या शरीरातही गोलमाल होतो.
त्यात सेक्स हार्मोन संबंधातले आजार अजाणतेमुळे किंवा संकोचामुळे अंगावर काढले जातात. त्यातले बरेचसे आजार प्राणघातक नव्हे; पण दैनंदिन जीवनात बाधक मात्र ठरत असतात. आणि नेमकं कशानं काय घोळ होतोय हेच कळत नाही. आपल्या देशात या एण्डोक्रिन आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांचं निदान व उपचारही बरेचदा होत नाही.
अनेकांना वाटतं की उपचार महाग असतील. पण तसंही नाही. वाजवी दरात औषधं सहज उपलब्ध होतात. उदाहरणार्थ थायरॉइड हार्मोन्सवरील गोळीचा दिवसागणिक खर्च दोन रुपयांपेक्षाही कमी आहे. वजनावरील आजार बरेच वेळा खाण्यामध्येच बदल केल्यामुळे आटोक्यात येतात. असे पर्याय अनेक आहेत; पण आपण बोललं तर.. मोकळं होऊन आजार सांगितले तर..
(लेखक एण्डोक्रिनॉलॉजिस्ट अर्थात हार्मोनतज्ज्ञ आहेत.)