या हॉलिडे स्ट्रेसचं करायचं काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2020 07:48 AM2020-11-19T07:48:45+5:302020-11-19T07:50:01+5:30
सुटी तर हवी; पण सुटीच्या दिवसातलं भकास रिकामपण घेरतं तेव्हा..
-प्रतिनिधी
हॉलिडे स्ट्रेस.
हा शब्द ऐकून जरा विचित्र वाटेल. मुळात सुटी असतेच ती ताण कमी करायला. मस्त निवांत झोपा काढायला. मनासारखं फुरसतीत जगायला; पण सध्या कोविडकाळात अनेकांना या हॉलिडे स्ट्रेसने गाठलं आहे. तसं पाहता ही काही नवीन गोष्ट नाही. अनेक माणसांना आपल्याला सुटी मिळावी असं वाटतं; पण त्या सुटीत काय करावं हे कळत नाही. इतर लोक निवांत सुटी एन्जॉय करतात आणि आपल्याला बोअर होतं, चिडचिड होते. उदास वाटतं. काय करावं हे कळत नाही, झोपही येत नाही. सुटीसाठी काही खास आपण प्लॅनही केलेलं नसतं. आणि काही करावं झडझडून असंही वाटत नाही. त्यालाच म्हणतात हॉलिडे स्ट्रेस. दोन दिवसांपेक्षा जास्त सुटी मिळाली तर अनेकांना हा स्ट्रेस जाणवतो.
त्यातून बाहेर पडायचं असेल तर काही गोष्टी प्लॅन करायला हव्यात.
१. एकतर हे मान्य करायला हवं की, आपल्याला असा हॉलिडे स्ट्रेस येतो.
२. त्याचं नियोजन म्हणून सुटीच्या दिवशी करायच्या गोष्टी आधीपासून ठरवायच्या.
३. गॅझेट्सना विश्रांती द्यायची म्हणजे कोण काय सेलिब्रेट करतोय याचे अनावश्यक तपशील आपल्याकडे येत नाहीत.
४. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय काय आवडतं, हे जरा ओळखून त्यावर नियमित काम करायचं.
५. आपल्याला सुटीचा ताण येतो की स्वत:बरोबर राहायचा, हा प्रश्न जरा अवघड आहे; पण विचारायचा स्वत:ला!