एकतर्फी प्रेमातल्या जीवघेणा अट्टाहासाला कसं तोंड द्यायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:00 AM2018-08-23T03:00:00+5:302018-08-23T03:00:00+5:30

तू मेरी नहीं हो सकती, तो और किसीकी भी नहीं हो सकती!. प्रेमातून किंवा एकतर्फी प्रेमातून नकार मिळाला की तरुण सैरभैर होतात, आता ‘सगळं काही संपलं’ असं समजून नैराश्याच्या गर्तेत जातात, पेटून उठतात आणि समोरच्या व्यक्तीलाही संपवतात. एकतर्फी प्रेमातून असे प्रकार वारंवार होताहेत, वाढीला लागताहेत. का होतंय असं? त्यावर मार्ग काय? ‘नकार’ कसा पचवायचा आणि ‘होकारा’साठी काय करायचं?.

How to deal with the force of One Side Love? | एकतर्फी प्रेमातल्या जीवघेणा अट्टाहासाला कसं तोंड द्यायचं?

एकतर्फी प्रेमातल्या जीवघेणा अट्टाहासाला कसं तोंड द्यायचं?

googlenewsNext

 

-मनीषा म्हात्रे 

दोघंही जण बालपणापासून सोबत. एकाच शाळेत शिकले. नंतर एकाच कॉलेजमध्ये अँडमिशन घेतली. बालपणाची शाळेतली मैत्री कॉलेजमध्ये आणखीनच घट्ट झाली. भेटीगाठी वाढू लागल्या.

तिचं हसणं, तिचं पाहणं. त्याला हवंहवंसं वाटू लागलं. तिलाही आपण आवडतो हे त्यानं गृहीत धरलं आणि तो तिच्यावर जिवापाड प्रेम करू लागला.

‘अरे, तुला ती ‘लाईक’ करते म्हणून मित्रांनीही त्याला प्रोत्साहन दिलं. झाडावर चढवलं. गुडघ्याला बाशिंग बांधल्यागत त्यानंही तिला प्रपोज केलं. तिचा होकार असेलच हे मनाशी पक्कं ठरवून तो स्वप्न रंगवत होता. पण त्याला अनपेक्षित धक्का बसला. तिनं त्याला नकार दिला!

तो हडबडला. निराश झाला. तिच्या या नकाराने जणू त्याचं आयुष्यच थांबलं. तिनं स्वत:च्या मनाचा कौल घेतला, नकार दिला म्हणजे आपला अपमान केला, आपल्या मित्रांमध्ये आपलं हसू केलं. अशा विचारांनी त्याला घेरलं. इतक्या वर्षांची ओळख, मैत्री, सगळं काही बाजूला पडलं आणि तोही तिच्याकडे तिरस्काराच्या भावनेनं बघू लागला.
तिनं नकार का दिला असेल, हे समजून घेण्यापेक्षा ‘ती असं कसं करू शकते’,  याच विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात माजलं. 

ज्याच्यासोबत आपली बालपणापासूनची ओळख आहे, त्यानं आपल्याला गृहीत कसं धरावं याचा तिलाही खरं तर धक्काच होता. त्यालाही हा नकार सहजासहजी पचवता न आल्यानं मग या प्रकारानंतर तिनंही त्याच्याशी बोलणं तर सोडाच त्याच्याकडे साधं पाहणंही सोडलं.

पहिल्यासारखं ती वागत नाही, माझ्याकडे बघत, बोलतही नाही, तिचं दुसरीकडे प्रेमप्रकरण तर नाही ना. या संशयाने त्याच्याकडून तिचा पाठलाग सुरू झाला. प्रत्येक ठिकाणी तो तिच्या मागावर राहू लागला.
तिनंही त्याच्यातला हा बदल नोटीस केला. तिनं त्याला बजावूनदेखील त्याचा पाठलाग सुरूच होता. असं केल्यानं तिचा होकार मिळेल म्हणून त्याची धडपड सुरू होती. मात्र यामुळे ती आणखीन दुरावत गेली. अखेर तिनं पोलिसांत धाव घेतली.

सारे मार्ग बंद झाल्याने, ‘तू माझी नाही तर कुणाचीच नाहीस’. म्हणून त्यानं भररस्त्यात तिची चाकूनं सपासप वार करून हत्या केली आणि स्वत:ही ट्रकसमोर येत आत्महत्येचा प्रयत्न केला; पण तत्पूर्वीच एका मित्रानं त्याला बाजूनं ओढलं. त्याला घेऊन तो पसार झाला. ठाण्यात घडलेली ही सत्य घटना. प्राची झाडेवरील या हल्ल्यानं आणि तिच्या मृत्यूनं सर्वांनाच सुन्न केलं.

यात तिची चूक काय? केवळ एका नकारानं तिच्या आयुष्याचा बळी गेला.
प्राचीसारख्या अनेक मुली अशा एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा, अमरावती, नागपूर, सांगली या भागांसह राज्यभरात एकतर्फी प्रेमातून हत्या, प्राणघातक हल्ल्याच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे.

महिन्याकाठी एकीला जीव गमवावा लागत असल्याचं धक्कादायक वास्तव या घटनांवरून समोर आलं. 
अमरावतीच्या प्रकरणात तर विवाहिता होकार देत नसल्यानं तिच्या तीन वर्षांच्या मुलाचाच काटा काढण्यात आला. काही ठिकाणी या त्रासाला कंटाळून तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न तर काहींनी आत्महत्या केल्या. 
2013मध्ये प्रीती राठी प्रकरणानं जगाला सुन्न केलं होतं. दिल्लीहून भारतीय नौसेनेत नर्सच्या नोकरीचं स्वप्न घेऊन ती मुंबईत आली. भविष्याचं रंगवलेलं स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच तिचा दुर्दैवी अंत झाला. यालाही  तिनं दिलेला नकारही कारणीभूत होता.

प्रीतीच्या करिअरचा चढता आलेख तिच्याच शेजारी राहाणारा तिचा मित्र अंकुर पानवरला रुचला नाही. त्यानं तिला हिणवणं सुरू केलं. त्यानं तिच्यापुढं विवाहाचा प्रस्तावही ठेवला; परंतु हा प्रस्ताव तिनं फेटाळला. याचाच राग म्हणून त्यानं तिला धडा शिकविण्याचं ठरविलं. मुंबईतील वांद्रे स्थानकावर संधी मिळताच त्यानं तिच्यावर अँसिड फेकलं आणि दुसरी ट्रेन पकडून तो मुंबईतून पसार झाला. 1 जून रोजी तिचा मृत्यू झाला. पुढे अंकुरवर कारवाई झाली. मात्र यामध्ये राठी कुटुंबीयांनी घरचा आधार असलेली त्यांची मुलगी गमावली.

नकार दिला म्हणून थेट एखाद्या व्यक्तीला थेट जगातूनच नाहीसं करणं, तिला संपवणं. हे प्रकार आताशा बरेच वाढले आहेत आणि ते मन सुन्न करणारे आहेत. चित्रपट, माध्यमांवर सुरू असलेला प्रेमाचा बाजार, अतिशयोक्ती यामुळे तरुण, तरुणी नकळत त्यात ओढले जातात. लैंगिक शिक्षणाचे अपुरे ज्ञानही त्याला तितकेच जबाबदार आहे. 
कोवळ्या वयातच मुलं, मुली जोडीदाराची स्वप्नं रंगवू लागतात. त्यात महाविद्यालयीन विश्व म्हणजे प्रेमाचं जणू प्रवेशद्वार, असाच बहुतेकांचा समज झाला आहे. आणखी एक धक्कादायक वास्तव म्हणजे सोशल मीडिया हा तरुणाईसाठी बदला घेण्याचा एक प्लॅटफॉर्म ठरू पाहतोय.

प्रेम या अत्यंत पर्सनल गोष्टीचा सोशल मीडियावर आज बाजार मांडला जातो आहे. एकांतात असताना फेसबुक, व्हॉट्सअँपवर एकमेकांशी प्रेमसंवाद हा तर जणू एक ट्रेण्डच झाला आहे. फेसबुकवरून मैत्री झाली, व्हॉट्सअँपवर चॅटिंग वाढले, हाईकवरून दोघंही जवळ आले आणि सोशल मीडियाच्या भावविश्वात दोघेही गुंग झाले !. ना कशाची फिकीर. ना काळजी.

याबाबत महाराष्ट्र सायबर सेलचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूतही आपला अनुभव मांडतात. सोशल मीडियाच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईची पावलं आता गुन्हेगारीच्या दिशेनंही वाटचाल करू लागली आहेत, असं त्यांचं निरीक्षण आहे. याबाबत वेळीच सतर्क व्हा, थोडं थांबा, विचार करा आणि मगच कुठलीही कृती करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

प्रत्येकाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाच्या भावभावना आहेत आणि त्या व्यक्तीच्या मतांचा प्रत्येकानं आदर करायला हवा, प्रेमात, एकतर्फी प्रेमात कोणी नकार दिला म्हणजे आपलं आयुष्य संपत नाही, इतरांचंही आयुष्य संपवण्याचा अधिकार नाही, उलट स्वशोधाचा प्रवास त्यानं सुरू होऊ शकतो आणि आपल्या विचारांना एक विधायक दृष्टी मिळू शकते.

बघा, तसं करून. स्वत:ला विचारून. आपल्या पावलांना नक्कीच एक चांगली दिशा मिळेल.

वेळ निघून जाण्यापूर्वीच सावध व्हा.
 

दुसरी व्यक्ती आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नसल्यास मनात विचारांचं काहूर माजतं. मेंदूची विशिष्ट रसायनं साथ देत नाहीत. विवेकबुद्धीने विचार होत नाही. आपला अपमान झाला, या विचारानं इगो दुखावतो. तिरस्कराची भावना निर्माण होते. संशयी, हिंसक वृत्ती वाढते. तिला प्रेमाची किंमत नाही. या विचारांनी तो बदल्याच्या भावनेत जातो. जोपर्यंत तिला धडा शिकवत नाही तोपर्यंत तो शांत बसत नाही. यातून टोकाचे पाऊल उचलले जाते. चूक समजेपर्यंत वेळ निघून गेलेली असते. ओव्हर पझेसिव्हनेसमुळे हे घडतं. समोरच्या व्यक्तीवर माझाच हक्क या वत्तीमुळे नात्यात कोंडी निर्माण होते.

अशावेळी थोडा विचार होणे गरजेचे आहे. एकतर्फी प्रेमात समोरच्याकडून होकार मिळत नसेल तर थोडे मागे जाऊन विचार करायला हवा. एका नकाराने जग थांबत नाही. विवेकबुद्धी, थोडे भावनिक प्रयत्न हे प्रेमासाठी योग्य ठरू शकतात. तिने नकार दिला. का दिला? हे जाणून घ्या. ती किंवा तो. अडचण समजून घ्या. प्रत्येकाला स्वत:ची आवडनिवड ठरविण्याचा अधिकार आहे. आपण तो जबरदस्तीने मिळविण्याचा प्रयत्न करू नये.

या प्रकरणात मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचा सहभागही महत्त्वाचा आहे. त्यांनी भडकवल्यास प्रकरण वाढते. त्यावेळी परिस्थिती समजून घेत योग्य मार्गदर्शन करावे. पालकांनीही न ओरडता चूक बरोबर याची जाणीव करून द्यायला हवी. प्रेमानं समजाविल्यास प्रकरण वेळीच शांत होऊ शकतं.

प्रेमीयुगल तसेच जोडप्यांनीही संशयी वृत्ती कमी करावी. याच संशयी वृत्तीतून मोबाइल तपासणे, वारंवार मोबाइल अथवा कार्यालयात फोन करणे टाळावे. दोन्ही बाजू समजून घेणं गरजचं आहे. प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे वाटताच मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी.
 

- डॉ. सागर मुंदडा, मानसोपचार तज्ज्ञ
.......
 

सावधान. तुमच्यावर नजर आहे !

व्हॉट्सअँप, फेसबुक, इन्स्टाग्राम या माध्यमांवर टिनेजरपासून तरुण, तरुणी तसेच ज्येष्ठांचाही वावर वाढतोय. त्यात आपले फोटो, माहिती सहजपणे शेअर केली जाते. सोशल मीडियावरील मोकळेपणाच ही मंडळी हेरतात. एखाद्या अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद म्हणून ‘हाय’ जरी केलं, तरी ती आपल्याला ‘लाईक’ करते, असा समज बनला आहे. त्यातूनच सोशल मीडियावर स्टॉकिंग म्हणजेच पाठलाग सुरू होतो. वारंवार मेसेज करणं, फोटो, व्हिडीओ शेअर करून भेटण्यास बोलावणं, एकमेकांना मैत्री, प्रेमात शेअर केलेले व्हिडीओ, फोटो मॉर्फ करणं. आणि त्यातूनच नकार आला तर पुढे ब्लॅकमेलिंगसारखे प्रकार सुरू होतात. बदला घेण्यासाठी बनावट अकाउण्ट तयार करून बदनामी करण्याचे प्रमाण तर गेल्या काही दिवसात खूप मोठय़ा प्रमाणावर वाढले असून, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तीची फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारू नका. तिची खातरजमा करा. आपली माहिती, फोटो शेअर करू नका. नेहमी सतर्क रहा. असा गुन्हा करण्याचा विचार कोणाच्या डोक्यात घोळत असेल तर त्यांनीही कोठडीत जाण्यापूर्वी वेळीच सावध राहा. आमची नजर तुमच्यावर आहेच. 
 

- बाळसिंग राजपूत, पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र सायबर
........

पोलीस तुमच्याचसाठी..

कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी कायद्याचा विचार नक्कीच करा. आयुष्य कोठडीत घालविण्याआधी थोडा विचार करा. तसेच कुठल्याही प्रकारे कोणी त्रास देत असेल, पाठलाग करत असेल तर वेळीच न घाबरता पोलिसांशी संपर्क साधा. जेणेकरून पुढचा अनर्थ टळू शकेल.
.......

‘नकार’ टाळायचा असेल तर.

तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, ती व्यक्ती तुमच्यावर प्रेम करत असलीच पाहिजे, असे नाही. प्रेमाला एकतर्फी वगैरेची बंधनं नसतात. मात्र, तरीही एकतर्फी प्रेमातील र्मयादा काही जण ओलांडतात. प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते, असं कायम म्हटलं जातं. त्यामुळे प्रपोज करण्याआधी मैत्री करा. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला तुम्ही समजून घेऊ शकता आणि त्यानंतर तिच्यासमोर व्यक्त होऊ शकता. तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता, त्या व्यक्तीची आवड-निवड जाणण्याचा प्रय} करा. यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आवडणार्‍या गोष्टींबाबत बोलू शकता आणि तिला तुमच्याकडे आकर्षित करू शकता.

मैत्रीचं रूपांतर प्रेमात होत आहे किंवा त्या व्यक्तीलाही तुम्ही आवडू लागला आहात, असे लक्षात आल्यावर तुमच्या फिलिंग्ज तिला सांगून टाका. व्यक्त झाल्यानं मनावरील दडपण आणि ताणही कमी होतो. शिवाय, तुमचं म्हणणंही समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. तिचा होकार की नकार, हा पुढचा मुद्दा. एवढं सारं करूनही तुम्हाला तुमचं प्रेम मिळत नसेल, तर हिंसक न होता शांतपणे एक पाऊल मागे घ्या. आयुष्य तुम्हाला नक्की पुढची संधी देईल. किंवा असंही असू शकतं की, हे प्रेम मिळालं नाही, म्हणजे कुठंतरी कुणीतरी तुमच्यासाठी खास व्यक्ती आहे, जी तुमच्यावर जिवापाड प्रेम करत असेल, करेल.
.............

शिक्षा कुटुंबीयांना का?

एकतर्फी तसेच प्रेमप्रकरणातून होणारे हल्ले, हत्या यामध्ये दोघांच्याही कुटुंबीयांना भोगावे लागते. मुलगी, मुलगा गमावल्याच्या दु:खात पुढील आयुष्य काढणे कुटुंबीयांना कठीण होऊन बसतं. यात मुलाची चूक असेल तर त्याची शिक्षा कुटुंबीयांना आयुष्यभर भोगावी लागते. समाजात वावरताना त्यांना कायम टोमणे, तिरस्काराच्या भावनेतून जावं लागतं.

(मनीषा लोकमतच्या मुंबई आवृत्तीत गुन्हेविषयक वार्ताहर आहे.)

manishamhatre05@gmail.com
 


 

Web Title: How to deal with the force of One Side Love?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.