बार्बी बदलली कशी? तिनं बदललं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 06:20 PM2019-03-07T18:20:09+5:302019-03-07T18:20:14+5:30

लहान आणि वयात येणार्‍या मुलींच्या जगाचा भाग होत जी जगभर कौतुकाचा आणि टीकेचाही विषय झाली, तिच्या साठीत पोहचण्याची गोष्ट.

How did Barbie change? What did she change? | बार्बी बदलली कशी? तिनं बदललं काय?

बार्बी बदलली कशी? तिनं बदललं काय?

googlenewsNext
ठळक मुद्देसंस्कृती, बदल, जागतिकीकरण, उदारतावाद आणि साचेबद्धता, जुनाट समज यांच्या भेदाच्या मर्यादा जगली, कधी बदलली आणि कधी तिला बदलावंच लागलं. 

- प्रगती जाधव-पाटील

बार्बी. एकेकाळी या सुंदर बाहुलीनं अनेकींना वेडं केलं होतं. गेली सहा दशकं ही बाहुली लहान मुलींपासून तरुणींर्पयत अनेकींच्या जगाचा भाग झाली. पण बार्बी फक्त खेळण्यांपूरती उरली नाही. गेल्या सहा दशकांत ती बदलली. जगासोबत बदलली, त्या त्यावेळच्या मुलींच्या इच्छा आणि महत्त्वाकांक्षाप्रमाणे बदलली, कधी ती का बदलत नाही म्हणून ओरड झाली तर कधी तिच्यावर बायकांना एकाच पठडीत कोंबायचा आरोप झाला. कधी तिच्या रंगरूपावर टीका झाली तर कधी रंगभेदावर. मात्र हे सारं असतानाही बार्बी होतीच, गेली 60 वर्षे ती तरुणच आहे. पूर्वी ती अत्यंत सडपातळ होती, स्लिम होती, गोरीगोमटी होती आता हेवीवेटही दिसते, ब्राऊनही दिसते, कृष्णवर्णीयही दिसते. आज नव्या खेळण्यांच्या काळात तिची  बाजारपेठेतील मागणी मंदावलेली असली तरी ती एक फक्त खेळणं नाही, ती त्या खेळण्यापलीकडेही गेली..
संस्कृती, बदल, जागतिकीकरण, उदारतावाद आणि साचेबद्धता, जुनाट समज यांच्या भेदाच्या मर्यादा जगली, कधी बदलली आणि कधी तिला बदलावंच लागलं. 
बहुतांश मुलींचं पहिलं खेळणं म्हणजे बाहुली. आपल्या बाहुलीशी गप्पा मारत बसणं, तिची काळजी घेणं, शक्य असल्यास नेहमी आपल्याजवळ ठेवणं मुलींना खूपच आवडतं. बाहुला-बाहुलीच्या जगात  ‘बार्बी डॉल’ मात्र भारी प्रतिष्ठेची. तिचे अनेक सेट अनेकींनी जमवले. खरं तर आपल्या मुलीच्या हाती एखादी चांगली बाहुली असावी या विचारातूनच, रूथ हँडलर या उद्योजिका-आईने जन्म दिला होता तो  बार्बी डॉलला.
अमेरिकेच्या डेन्वर, कोलेरॅडोमध्ये 1916 साली जन्मलेल्या रुथ हॅण्डलर यांनी केवळ घर सांभाळत न बसता आपल्या पतीच्या मदतीनं व्यवसायाला सुरुवात केली. मॅटल कॉर्पोरेशन नावाने सुरू केलेल्या या कंपनीच्या माध्यमातून त्या विविध खेळ साहित्याचं उत्पादन करत असत. 1956 साली हॅण्डलर कुटुंबीय आपली दोन मुलं, बार्बरा आणि केनेथ यांच्यासह युरोपात फिरायला गेले. त्यावेळी जर्मनीमध्ये प्रसिद्ध असलेली ‘लीली डॉल’ त्यांनी विकत घेतली. छोटय़ा बार्बराला ही लीली भलतीच भावली. त्यावेळी अमेरिकेमध्ये केवळ लाकूड किंवा कागदापासून बनवलेल्या बाहुल्यांचीच निर्मिती होत असे. लीलीचं नाजूक रूप पाहून रूथला वाटलं अमेरिकेमध्ये असं उत्पादन व्हावं. पण ती केवळ बाहुली न राहता लहान मुलींबरोबरच किशोरवयीन मुलींना एक आदर्श वाटावा, अशी रूथ हॅण्डलर यांची संकल्पना होती. मॅटल कंपनीमध्ये त्यांनी जेव्हा हा विचार मांडला तेव्हा, तिच्या पतीसह कोणालाच ही संकल्पना आवडली नाही. अमेरिकेत अशाप्रकारची संकल्पना मूळ धरूच शकणार नाही, असं रूथ यांना कंपनीच्या बैठकीत सांगण्यात आलं. पण, युरोपहून परतल्यानंतर आपल्या मुलीला लागलेल्या लीली बाहुलीच्या वेडावरून रूथ यांना खात्नी होती की अमेरिकेत अशाप्रकारची बाहुली नक्कीच लोकप्रिय होईल. त्यामुळेच त्यांनी लीलीमध्ये त्यांना अपेक्षित असलेले बदल केले आणि पुन्हा कंपनीच्या बैठकीत, या बाहुलीचं प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन करण्याची गळ घातली. अखेर, हट्टाला पेटलेल्या रूथ यांच्यासमोर कंपनीने हार पत्करली. 9 मे 1959 साली अमेरिकन इंटरनॅशनल टॉय फेअरमध्ये ही बाहुली प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली. या बाहुलीचं नाव रूथ यांनी आपल्या मुलीच्याच नावावरून ठेवलं ‘बार्बी’! 
कंपनीतील अधिकार्‍यांप्रमाणेच प्रदर्शनातील व्यावसायिकांना या बाहुलीत फारसा रस वाटला नाही. पण, प्रदर्शनासाठी आलेल्या लहान मुलींना मात्न या बाहुलीने वेड लावलं. हळूहळू, बार्बीची मागणी वाढू लागली. ती इतकी वाढली की बार्बीची आगाऊ नोंदणी करावी लागू लागली. प्रतीक्षायादी तब्बल महिन्यांची असे. बार्बी जगातील अनेक किशोरवयीन मुलींची सखी झाली आहे. 
झेब्रा स्टाइल काळा पांढरा स्विमसूट परिधान करून बार्बीने 9 मार्च 1959 साली बाजारात पाऊल ठेवलं. सिग्नेचर टॉपकोट, पोनीटेल ही तीची खासियत. सावळा आणि गोरा असे दोन्ही रंग घेऊन ती बाजारात दाखल झाली. ‘किशोरवयीन फॅशन मॉडेल’ असं सांगून तिचं मार्केटिंगही करण्यात आलं. पहिल्याच वर्षी तीन लाख 50 हजार बार्बी विकल्या गेल्या. आत 60 वर्षे ही बार्बी रूप बदलते आहेच. 
बदलत जाणारी रूपं. 
 1. बार्बी म्हणजे मुलींची प्रतिमा आणि मुली कशा असाव्यात तर बार्बीसारख्या हे समीकरण डोक्यात घेऊन वाढणारी एक पिढीही पहायला मिळाली. या पिढीने स्वतर्‍ला बार्बीच्या मापात बसवण्यासाठी स्वतर्‍ला बारीकही करून घेतलं. इतकं बारीक की, त्या स्लिम दिसण्याचं खूळ अनेक तरुण मुलींनी अनुभवलं.
2. बार्बीमुळे मुलींचा आरोग्य धोक्यात येतेय अशीही आरोळी जागतिक स्तरावर ठोकण्यात आली. त्यानंतर उत्पादकांनी नवीन आकारातील, प्रकारातील आणि करिअरिस्ट बार्बी बाजारात लाँच केली. तिचं बाजारात आलेलं रूप समाजाचं दर्पण म्हणावं लागेल.
3. ऐंशीच्या दशकात नुसतचं मिरवणारी, किचनमध्येच रमणारी बार्बी नव्वदच्या दशकात बदलली. या दरम्यान जागतिक पातळीवर सौंदर्य स्पर्धा जोमात होत्या, त्यामुळे सुंदर दिसणारी, लांब केस असणारी आणि बांधेसुद बार्बी आकर्षण ठरली.
4. त्यानंतरच्या दशकात देखणं दिसण्याबरोबरच स्वतर्‍च्या स्वतंत्न अस्तित्त्वाला अधोरेखित करत ती आपल्या स्वतंत्न घरासह दाखल झाली होती. जागतिकीकरणाचं वारं वाहू लागलं आणि महिलांना नवनवीन क्षेत्नातील कवाडे खुली झाली. नोकरीत मिळणारं स्थान, शिक्षणाच्या माध्यमातून मिळणार्‍या नवनवीन संधीही बार्बीने प्रदर्शित केल्या. अंतराळवीर, डॉक्टर, यासह अन्य काही व्यावसायिक रूपांमध्येही ती जगासमोर आली. विशेष म्हणजे दिव्यांगांच प्रतिनिधित्व करत तिने सर्वानाच थक्क केलं. त्यानंतर आलेल्या सोशल मीडियाच्या युगातही बार्बी आपल्या प्रियजनांना भेटायला सरसावली आणि लाखो फॉलोअर्स यू टय़ूब चॅनेलद्वारे भेटू लागली. बार्बी बदलत गेली. म्हणून टिकली !



 

Web Title: How did Barbie change? What did she change?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.