गोपीसरांच्या अकॅडमित चँपियन घडतात कसे?
By admin | Published: April 2, 2015 06:12 PM2015-04-02T18:12:03+5:302015-04-02T18:12:03+5:30
बॅडमिण्टनच्या जगावर फक्त चीनचं साम्राज्य. चिनी खेळाडूंना मात देणं भल्याभल्यांच्या तों
Next
>बॅडमिण्टनच्या जगावर फक्त चीनचं साम्राज्य.
चिनी खेळाडूंना मात देणं भल्याभल्यांच्या तोंडाला फेस आणतं, आणि भारत, अगदी अलीकडच या काळापर्यंत भारतीय खेळाडू त्या नकाशावर पहिल्या शंभरातही दिसत नसत!
मात्र पुलेला गोपीचंद नावाच्या जादूगारानं जादू करावी तसं हे चित्र बदललं. आणि आज तरी सायना नेहवाल वर्ल्ड नंबरवन आहे. गोपीचंद स्वत: उत्कृष्ट बॅडमिण्टनपटू.
हैदराबादमध्ये त्यानं बॅडमिण्टन अकॅडमी सुरू केली. सायनाचे आईवडील हरियाणातून मुलीला घेऊन हैदराबादेत स्थायिक झाले ते केवल या अकॅडमीत प्रशिक्षण मिळावं म्हणून. मग सिंधू, पी. कश्यप, श्रीकांत असे एकसे एक गुणी खेळाडू बॅडमिण्टन कोर्टवर झळकू लागले. उत्कृष्ट कामगिरी करू लागले.
मात्र या अकॅडमीत प्रवेश सोपा नसतो, आणि तिथला सरावही. गोपीचंदची आई तिथली व्यवस्था पाहते. जागतिक दर्जाच्या सुविधा, उपकरणं तर आहेतच; पण कठोर प्रशिक्षणही आहे. पहाटे साडेचारला पहिली ट्रेनिंग बॅच सुरू होते. सव्वाचार वाजता स्वत: गोपीसर कोर्टवर हजर असतात.
अकॅडमीतली मुलं बाहेर हुंदडायला जात नाहीत, व्हॉट्सअँप, फेसबुक सगळं बंद. तिथं इंटरनेट नाही. जेवणाच्या ब्रेकमध्ये फक्त टीव्ही पाहता येतो. तोही थोडाच वेळ!
अकॅडमीत १६ रूम्स, तीन मोठ्ठे हॉल आहेत. सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. शिस्तीला तर काही पर्यायच नाही. ‘डिसिप्लीन इज मोअर इम्पॉर्टण्ट दॅन एक्स्लन्स!’ हेच तिथलं ब्रीदवाक्य. ‘चालतं- काही होत नाही, बघ, होता है’ असं खेळात नाही चालत, रोज स्वत:ला शिस्तीत ठेवा असं इथं खेळाडूंना शिकवलं जातं!
आणि म्हणूनच या अकॅडमीत ९९ टक्के चांगलं खेळून, वागून चालत नाही, १00 टक्केच चांगलं परफॉर्म करावं लागतं, सतत. कायम, चोवीस तास!
- चॅम्पियन घडवणार्या शिस्तीच्या गुरुला म्हणून तर आज जग सलाम ठोकतं,
त्याचंच नाव, पुलेला गोपीचंद!!