स्टॉक मार्केटमधून पैसा कसा कमवायचा?
By admin | Published: April 6, 2017 07:35 PM2017-04-06T19:35:22+5:302017-04-06T19:35:22+5:30
त्याचं शिक्षण कुठे मिळेल? स्टॉक मार्केट हे एक असं क्षेत्र आहे, ज्यातून तुम्हाला अधिक पैसा मिळू शकतो
त्याचं शिक्षण कुठे मिळेल? स्टॉक मार्केट हे एक असं क्षेत्र आहे, ज्यातून तुम्हाला अधिक पैसा मिळू शकतो. सर्वसाधारणपणे आपण आपला पैसा बॅँकेत ठेवल्यावर जे व्याज मिळतं त्यापेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात स्टॉक मार्केटच्या व्यवहारातून तुम्हला पैसा मिळू शकतो. मात्र स्टॉक मार्केटचा अभ्यास हवा. आज ठरवलं आणि उद्या लगेच स्टॉक मार्केटमध्ये व्यवहार करायला गेलात, तर लाखाचे बारा हजार होण्याची शक्यताच अधिक. आपल्या आजूबाजूला असे अनेक प्रकार आपण नेहमीच पाहतो आणि गोत्यात आल्यानं पुन्हा या मार्गाला कधीच न जाण्याचा वज्रनिर्धारही आपण त्यांच्याकडून ऐकतो. आयुष्यातली कोणतीही गोष्ट असो, त्याचा पद्धतशीर अभ्यास असला, कोणत्या वेळी, कोणती गोष्ट करायची याचं सुयोग्य ज्ञान असलं तर आपटी खाण्याची वेळ सहसा येत नाही. शेअर मार्केटच्या बाबतीतही तेच खरं आहे. त्यामुळे शेअर मार्केटचा पद्धतशीर अभ्यास हवा. त्यासाठी कोणावर विसंबून राहण्यापेक्षा आणि त्यानी सांगितलेल्या शेअर्समध्ये समजा आपला कष्टाचा पैसा बुडालाच तर त्याच्या नावानं खडे फोडण्यापेक्षा आपण स्वत:च जर हा अभ्यास केला तर अचूक निर्णय घेण्याची आपली क्षमताही वाढते आणि यशस्वी होण्याचा एक मंत्र आपण आपलाच बनवू शकतो. त्यासाठी कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. याचा रितसर अभ्यासक्रमही आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला आणि स्टॉक मार्केटचं शास्त्र व्यवस्थित समजून घेतलं तर त्यातील बारकावे आपल्याला आपोआपच कळू शकतात. यासाठी दोन महत्त्वाचे सर्टिफिकिट कोर्सेस आहेत. एक कोर्स आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (एनएसई) आणि दुसरा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा (बीएसई). यातून प्रारंभिक ज्ञान आपल्याला मिळवता येईल. हा कोर्स केल्यानंतर बीएसई ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे शंभर मार्कांची एक परीक्षा घेतली जाते. या परिक्षेत ज्यांना ६० किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळतील त्यांनाच प्रमाणपत्र बहाल केले जाते. या परिक्षेसाठीची कोणतीही पात्रतेची आवश्यकता नाही. कोणीही ही परीक्षा देऊ शकतो. स्टॉक एक्सचेंजमधून पैसा मिळू शकतो, हे निश्चित, पण त्यासाठी हवेत गोळीबार करून उपयोग नाही. या मार्केटचा रीतसर अभ्यास करून, हळूहळू गुंतवणूक करून, प्रत्यक्ष अनुभवातून शिकत गेलं, तर स्टॉक मार्केट म्हणजे खरोखरच सोन्याची कोंबडी आहे.
- रितिका कुलकर्णी (दिशा कौन्सेलिंग सेंटर)