कुणाचं पासबुक कुणाचे हाती?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 06:45 AM2019-07-04T06:45:00+5:302019-07-04T06:45:01+5:30
सरकार योजना ढीग काढेल. मात्र व्यवस्थेचं आरोग्य आतून सुंदर असावं याकडे लक्ष देत नाही. ते काम आपल्याला करावं लागेल. सरकार नावाच्या नोकरावर सगळंच सोडून चालणार नाही.
- मिलिंद थत्ते
सरकारनं ठरवलं सगळ्यांची खाती बॅँकेत काढायची.
काढायची म्हणजे काढायचीच.
योजनांना चमचमीत नावं द्यायला सरकारला आवडतं. त्यामुळे नाव दिलं ‘जन धन’! बॅँकांनी रडत खडत का होईना दिली काढून झिरो बॅलन्स खाती. मग शिष्यवृत्तीचे पैसे, निराधार योजनेचे पैसे, पीकविम्याचे पैसे, रोजगार हमीची मजुरी असा नुसता पाऊस पडायला लागला त्या खात्यात ! पाऊस म्हणजे धो धो पाऊस नाही, तर मराठवाडय़ातला पाऊस बरं ! आला तर आला अवचित आणि तीही पिरपिर!
एवढं करून भागलं नाही. खात्यावर खाती. घरकुलासाठी नवराबायकोचं जॉइण्ट खातं, मजुरीसाठी सिंगल, पोरीच्या शिष्यवृत्तीसाठी आजून येगळं ! इतकी खाती की नवीन म्हण आली, कुणाचा पासबुक कुणाचे हाती राहिला नाही !
आमच्या एका पाडय़ातला नवश्याकाका पासबुकांची चळत घेऊन तालुक्याला येतो. तिथे तीन बॅँका, प्रत्येकीत लाइन लावतो अन् समदी पासबुकं ठेवून म्हणतो साहेब बघा यात पैसे आलेत का? पैसे आलेले नसतात, त्यातली दोन खाती बॅँकेने गोठवलेली असतात. तिसरी बॅँक त्याला सांगते, प्रतिनिधीकडे जा. प्रतिनिधी दुकान थाटून बसलेला असतो. तो काकाला सांगतो, तुझं खातं बंद झालंय, केवायसी कराय लागंल. मग त्याचे आधार, त्याचा अंगठा घेऊन प्रतिनिधी त्याचे गोठलेले खाते चालू करतात. त्यातले 1200 रु पये स्वतर्च्या खिशात घालतात. आणि नवीन खातं म्हणून जुन्याचाच एक कागद छापून देतात. काकाचा दिवस बुडलेला असतो, भाडय़ाचे पैसे गेलेले असतात, एका नवीन खात्यात खडखडाट ही कमाई असते.
अशा घटना घडतात का तुमच्याकडं?
मग काय करता अशा वेळी? बघत बसता? की एक साधा उपाय करता?
आम्ही वयम् चळवळीचे कार्यकर्ते काय करतो ते तुम्हाला सांगतो.
पटलं तर करून बघा.
1. त्या काकाकडे पासबुक आहे का पहायचं. काकाला सांगायचं, बॅँकेच्या पासबुकात प्रत्येक व्यवहाराची एंट्री मारत जा. आणि बॅँक पासबुक देत नसेल तर प्रतिनिधीकडे होणार्या प्रत्येक व्यवहाराची पावती (स्टेटमेंट) मागत जा.
2. आमच्या काकाने हे केलं. पावती मागितली. तसे बँक प्रतिनिधी म्हणाला, पावतीला 20 रुपये लागतील. काका म्हणाला देईन; पण त्याचीही पावती लागेल मला. प्रतिनिधी म्हणाला जाऊदे, तुला म्हणून देतो फुकट पावती. काका पावती घेऊन आमच्याकडे आला. आम्ही वाचून दाखवले. त्यावर 1200 रु. काढल्याचं लिहिलं होतं आणि त्याला दिले 1100 रुपये. काका तडकून उठला आणि भांडून ते 100 रुपये घेऊन आला.
3. मित्नांनो, आपल्या देशांतल्या लाखो काकांना आपल्याला बॅँक व्यवस्थेत त्यांची न्याय्य जागा मिळवून द्यायचीय. बॅँकेत तक्र ार करणं, व्यवहार समजून घेणं हा अधिकार प्रत्येकाला आहे. अशा किमान एका काकांना तुम्ही मदत करू शकाल ना? तेवढा दम आहे ना?
4. सरकार योजना ढीग काढेल; पण सरकारचा आटा ढिला असतो. व्यवस्थेचा चेहरामोहरा सुंदर करण्यावर सरकार जितकं लक्ष देतं, तितकं व्यवस्थेचं आरोग्य आतून सुंदर असावं याकडे लक्ष देत नाही. ते काम आपल्याला करावं लागेल. सरकार नावाच्या नोकरावर सगळंच सोडून चालणार नाही.
(लेखक ‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)