माणसं जोडण्याची कला
By admin | Published: April 14, 2016 05:53 PM2016-04-14T17:53:45+5:302016-04-14T17:53:45+5:30
कामाला वाघ, पण तोंड उघडलं की पचका! बोलून सगळी घाण करणार, कुणाशी कसंही वागणार, आणि बरोबरच्या माणसांना हिडीसफिडीस करणार, अशा माणसांचा एक विषय कच्चा असतो, त्यांना माणसं जोडता येत नाहीत!
Next
>सोशल इंटिलिजन्स नावाच्या बुद्धिमत्तेचा विचार, आपण करिअर निवडताना करतो का?
वास्तविक भारतीय माणसांना काही गोष्टी अजिबात नव्यानं सांगायला नकोत! उदा. टीमवर्क, इतरांचा/ सहका:यांचा/मोठय़ांचा आदर करणं, दुस:यांचं मत ऐकून घेणं हे सारं म्हणजे ढोबळमानानं सोशल इंटिलिजन्स.
हे सारं तर आपण लहानपणापासूनच शिकत असतो. आपल्याकडे एखाद्याच्या घरच्या कार्याला मदत करण्यासाठी न बोलावता माणसं जमा होतात. गावाकडे तर हा एकोपा जास्त दिसतो. शहरात तो आता जरा कमी होत असला तरी ‘काही मदत लागली तर सांगा’ असं स्वत:हून म्हटलं जातंच. मदत केलीही जाते. गावात तर शेततळं काढायचं असो, रस्ता खोदायचा असो, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेला एखादी मदत करायची असो, किंवा उरूस असो; जत्र असो, नाहीतर साधा गणपती असो, टीमवर्क वेगळं शिकवावं लागत नाहीच. माणसं पटापट जमा होतात, ज्याला जे जे जमतं, ते ते काम वाटून दिलं जातं. भराभर लोक कामाला लागतात, जरा मन नाराज झालं तर चार लोक समजूत घालतात, होत रे असं म्हणत पुन्हा कामाला लावतात.
‘हाऊ टू बिल्ड टीमवर्क’ अशा प्रकारची वर्कशॉप्स तिथं घ्यावी लागत नाहीत. कारण टीमवर्क हा शब्द तोंडी नसला तरी ते टीमवर्क म्हणजे काय हे आपल्याला माहीत असतं. क्रिकेट सामने पहायला हजारो लोक स्टेडियमध्ये तिकिटं काढून जातात, आणि लाखो लोक टीव्हीसमोर श्वास रोखून बसलेले, अस्वस्थ झालेले असतात. सारा देश त्यावेळी त्या संघाच्या पाठीशी वगैरे असतो ते सारं वेगळ्या अर्थानं टीमवर्कच!
मात्र तरीही नव्यानं आलेल्या आणि आता करिअरच्या वाटेवर अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काही विदेशी संकल्पनाही आपण माहीत करून घ्यायला हव्यात. कारण हल्ली अशा विषयांवर सेमिनार्स होतात. शोधनिबंधांचं सादरीकरण केलं जातं. त्यामुळे बिल्डिंग टीमवर्क, सोशल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स या शब्दांची आणि विषयांची तोंडओळख तरी आपल्याला असलीच पाहिजे. कारण, अर्थातच ही सारी समूहजीवनासाठी आवश्यक असणारी मूल्यं आहेत.
आणि कामाला वाघ असलेले अनेकजण केवळ यागोष्टी जमत नाहीत म्हणून किंवा माहिती असून वळत नाहीत म्हणूनही मागे पडतात.
म्हणून ही चर्चा नव्या काळातल्या काही परवलीच्या शब्दांची. नव्या बुद्धिमत्तांची.
त्या आपल्याकडे आहेत का, हे तपासून पहा, आणि आपल्या करिअरचा निर्णय घेताना या बुद्धिमत्तेशी तो निर्णय ताडूनही पहा!
म्हणून आज ही चर्चा एका महत्त्वाच्या गोष्टीची; सोशल इंटिलिजन्स!!
सोशल इंटिलिजन्स
म्हणजे काय?
अगदी सोपं करून सांगायचं तर ही सोशल इंटिलिजन्स म्हणजे समाजातल्या माणसांशी चांगले संबंध ठेवण्याची बुद्धिमत्ता. म्हणजेच सामाजिक बुद्धिमत्ता.
माणसं हेच भांडवल
1) ही सामाजिक बुद्धिमत्ता असं सांगते की, कोणतीही वस्तू आपल्याला पैशांमुळे खरेदी करता येते. पैसे नसतील तर वस्तू खरेदी करता येणार नाहीत. मात्र त्याहीपेक्षा महत्त्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे समाजातल्या विविध लोकांशी असलेले आपले चांगले संबंध. म्हणजे नवीन परिभाषेत कॉण्टॅक्टस!
म्हणजे काय तर आपल्या खूप चांगल्या ओळखी असतील तर ती एक प्रकारची उत्पादनक्षमताच असते. आपली ताकद असते असं म्हणता येईल.
कारण ही क्षमता वाढते ती आपल्या वेगवेगळ्या लोकांशी असलेल्या ओळखी, जवळचे किंवा लांबचे नातेवाईक, शेजारी, आपले मित्रमैत्रिणी, कमी-आधिक ओळखीची, वेगवेगळ्या स्तरातली माणसं यांच्या संपर्काने! आणि अर्थातच उपयुक्त संपर्काने.
लहानपणापासून आत्तापर्यंतचा विचार केला तर आपले वेगवेगळे ग्रुप्स जमलेले असतात. आपल्या ओळखीचे लोक आणि नातेवाईक यांचेही ग्रुप्स असतात. हल्लीच्या भाषेत याला ‘सोशल नेटवर्क’ असंही म्हणतात. ही सर्व माणसं आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची असतात. म्हणूनच बरेच जण इंटरनेटवर ऑनलाइन मित्र शोधतात. मात्र अशा आभासी ओळखींचा काहीही उपयोग नसतो प्रत्यक्षात माणसांशी खरं खुरं बोलणं, त्यांच्याशी संपर्क, त्यातून सुरू झालेलं काम हे महत्त्वाचं असतं. सोशल नेटवर्किग त्या संपर्काला ताकद देऊ शकतं, इतकंच!
2. ज्या वस्तू हौसेनं विकत घेतल्या आहेत, त्यांचा खरं तर फारसा आणि खराखुरा उपयोग नसतोच. आपण जर एखाद्या अडचणीत सापडलो तर कितीही महाग असल्या तरी या वस्तू मदत करायला येतात का? तर नाही. उलट अशावेळी विविध लोकांशी असलेले चांगले संबंध, एकमेकांबद्दल वाटणारी सहानुभूती, घरची माणसं, शेजारी, ऑफिसातले किंवा शिक्षक, प्राध्यापक या सर्वांशी असलेले प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध यांचाच खरा उपयोग होतो. विशेषत: जेव्हा एखादं आर्थिक संकट कोसळतं, अचानक कोणाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं, तेव्हा माणसंच उपयोगाला येतात.
3. ही जी माणसं आहेत त्यालाच नव्या, आधुनिक जगात ‘सोशल कॅपिटल’ असं म्हणतात. या तंत्रधुनिक जगाने जिव्हाळ्याच्या माणसांनाही कॅपिटल ऊर्फ भांडवलाच्या कप्प्यात टाकलं आहे. भारतीयांनीही या युगात या नवनव्या गोष्टी आधुनिक संकल्पना म्हणून समजून घ्यायला हव्यात.
4. तुमचा आयक्यू उत्तम असला, हातात चांगली डिग्री असेल किंवा नोकरी करत असाल, शोधत असाल, अशा कोणत्याही पायरीवर असलात तरी समाजाशी संबंध असतोच. करिअरच्या निवडीत आणि करिअर घडणीत ही संकल्पना समजून घेतली तर त्याचा उपयोग होईल. ज्या प्रकारच्या करिअरमध्ये सतत विविध प्रकारच्या माणसांशी संबंध येतो, त्यांच्यासाठी तर हा विचार जास्त महत्त्वाचा आहे.
सोशल इंटिलिजन्स वाढवायचा कसा?
आपल्या करिअरमध्ये सर्व काही नीटनेटकं आणि ठिकठाक चालायला हवं असेल तर ही सामाजिक बुद्धिमत्ता जवळ असावी किंवा अवश्य वाढवावी. त्यासाठी सुरुवात म्हणून किमान हे करून पाहा.
* समविचारी मित्रंचा ग्रुप तयार करा.
* सर्वांच्या आवडीच्या गोष्टी करण्यावर भर द्या.
* विशेषत: एकमेकांच्या अडचणींविषयी बोलता आलं पाहिजे. हक्काने कोणत्याही स्वरूपाची मदत मागता आली पाहिजे. आपल्या अडचणीविषयी बोलताना न्यूनगंड नको.
* जसे इतर लोक आपल्या नेटवर्कमध्ये असावेत असं वाटतं, तसं आपणही इतरांसाठी या नेटवर्कचाच भाग आहोत, हे लक्षात घ्या. आणि जे तुम्हाला शक्य आहे ती मदत इतरांना कराच.
डॉ. श्रुती पानसे
( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)
drshrutipanse@gmail.com