अडथळ्यांची शर्यत

By admin | Published: November 20, 2014 06:28 PM2014-11-20T18:28:33+5:302014-11-20T18:28:33+5:30

शरीराच्या र्मयादांवर मात करत भरारी घेणार्‍या तरुणांचे मार्ग अडवणारी व्यवस्था बदलायला हवी, पण कशी?

Hurdles | अडथळ्यांची शर्यत

अडथळ्यांची शर्यत

Next
>आकांक्षा काळे या पुण्यातल्या मुलीनं दिलेल्या लढय़ाच्या बातम्या अलिकडेच वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या.
आकांक्षा पुण्यातल्या बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉर्मसमधे शिकते. ती सीए करतेय. मात्र ती अपंग आहे. व्हील चेअरशिवाय ती कुठंही जाऊ शकत नाही. मात्र अपंग विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात कुठल्याच सुविधा उपलब्ध नसल्यानं ती परीक्षेला जाऊ शकली नाही. त्यामुळेच तिनं उच्च न्यायालयात अर्ज केला आणि महाविद्यालयात अपंग विद्यार्थ्यांसाठी सुविधा असाव्यात अशी मागणी केली. उच्च न्यायालयानं राष्ट्रीय आणि राज्याच्या अपंग विभागाच्या आयुक्तांना असे आदेश दिले की, सर्वच शैक्षणिक संस्थांमधे तातडीनं अपंग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवल्या जाव्यात. त्यांच्या मार्गातले अडथळे दूर करुन त्यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करुन द्यायला हव्यात.
खरंतर ११९५ पासून या संदर्भातला कायदा देशात असूनही अपंग व्यक्तींसाठी आवश्यक त्या सुविधा महाविद्यालयांत उपलब्ध नसतात हे आपल्याकडचं सार्वत्रिक चित्र आहे. रॅम्प, अपंगांना वापरता येतील अशी स्वच्छतागृह, ब्रेल लिपितल्या पाट्या, ऑडिओद्वारे देण्यात येणार्‍या मार्गदर्शक सुविधा उपलब्धच नाही असंच एक सरसकट चित्र आहे. आकांक्षानं दिलेल्या लढय़ामुळं आणि तिला मिळालेल्या न्यायामुळं आता निदान आशा तरी निर्माण झाली आहे की, कुठल्याही अडथळ्याविना अपंग विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाता येईल. तसं वातावरण तयार केलं जाईल.
पण आज काय चित्र आहे? तुम्ही स्वत: अपंग आहात, मात्र मनाची उमेद जग जिंकायची आहे, शरीराच्या र्मयादांवर मात करायची तयारीही आहे.
मात्र कॉलेजात जाताना तुम्हाला काय अडचणी येतात? तुमच्या कॉलेजात आहेत काही अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सोयी? का वर्गात अपंग विद्यार्थी असूनही तिसर्‍या मजल्यावर वर्ग भरवले जातात? जिनेचढउतार करकरुन जीव हैराण होतो?
प्रयोगशाळेत आहेत का, सुविधा? की तिथंही हालच? घरात-समाजात वावरताना काय अडचणी येतात? सिनेमा-नाटक पहायला जायचं किंवा कुठं पिकनिकला जायचं तरी जाता येत नाही कारण व्हीलचेअर नेण्याची सोय नाही असा तुमचा अनुभव आहे का? ब्रेल लिपितल्या पाट्याच नाही त्यामुळे अंध विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी कुणी समजून घेत नाहीत, त्या सांगायला हव्यात असं वाटतं का?
टॉयलेटला जायची कुंचबणा होते, आंघोळीची सोय नाही, रेल्वेस्टेशन-बसस्टेशनवर तर त्याहून अवघड अवस्था अशी अडथळीची शर्यत तुम्हीही अनुभवलेली असेलच ना? त्या त्रासाविषयी, स्वत: अनुभवलेल्या मनस्तापाविषयी आपण स्पष्ट बोलू?
काय अडचणी येतात हे सांगू? 
आणि काय सुविधाच नाहीयेत, कुठल्या सुविधा तातडीनं करायला हव्यात हे ही स्पष्टच बोलू.
आणि, काही सुविधा तुम्ही पुढाकार घेऊन मिळवल्या असतील, किंवा तुमच्या आसपासच्या व्यक्तींनी संवेदनशिलतेने काही उत्तम उपक्रम केले असतील तर ते ही मान्य करता येईलच.
म्हणून तर या अंकात ही विशेष चर्चा.
तुम्हाला होणार्‍या त्रासांविषंयी आणि अनुभवां विषयी सविस्तर मत मांडा.
नाव लिहा किंवा नका लिहू.
नाव प्रसिद्ध होऊ नये असं वाटत असेल तर तसं कळवा.
पत्ता?- शेवटच्या पानावर तळाशी.
पाकिटावर-अडथळ्यांची शर्यत असा उल्लेख करायला विसरू नका.

Web Title: Hurdles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.