हायप्रोफाइल तारुण्य ड्रग्जच्या नशेत?
By मनीषा म्हात्रे | Published: December 28, 2017 01:00 AM2017-12-28T01:00:00+5:302017-12-28T01:00:00+5:30
ठाणे-मुंबईच्या उच्चभ्रू सोसायट्यांत अनेक तरुण ड्रग्जच्या जाळ्यात अडकल्याचे उघडकीस आले आहे. त्यांची व्यसनं पालक तर नाकारतातच; पण त्यांना घरपोच ड्रग्ज पुरवले जातात हे वास्तवही दडपलं जातंय..
‘मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएँ में उडाता चला गया..’
गाणं छान आहे; पण सध्या काही तरुणांचं आयुष्यच असं धुरात उडून जातं आहे, आणि त्याची खबर ना त्यांना आहे ना त्यांच्या पालकांना. ठाण्यासह मुंबईत उच्चभ्रू वसाहतीत तरुण मुलं मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जात आहेत हे अलीकडेच उघडकीस आलं.
आणि शोधत गेलं तर जो तपशील हाती लागला, तो अस्वस्थ करणाराच आहे.
ठाण्याच्या उच्चभ्रू वसाहतीत राहणारा १७ वर्षांचा मस्त नरेश डागा. नावाप्रमाणेच मस्त राहणारा, जगणारा. वडिलांचा इंटरनेट आणि फरसाणचा व्यवसाय. तर मस्त हा मुंबईच्या नामांकित कॉलेजपैकी एक असलेल्या सेंट झेविअर्समध्ये बारावीचे शिक्षण घेत होता. सारं काही मस्त सुरू होतं. मात्र एकेदिवशी कॉलेजला जातो सांगून घराबाहेर पडलेला मस्त अचानक बेपत्ता झाला. तीन दिवसानं त्याचा मृतदेह माथेरानच्या दरीत सापडला.
पोलीस तपासात उघडकीस आलं की, अभ्यासाचा कंटाळा आणि त्यातून सुटण्यासाठी लागलेल्या व्यसनांत तो कधी हरवला हे त्यालाही समजलं नाही. आणि त्याच्या कुटुंबालाही. खरंतर झालं असं की, एके दिवशी सोसायटीतील तरु णाचं ड्रग्ज प्रकरण फुटलं आणि पोलीस सोसायटीत धडकले. त्या पोलीस चौकशीच्या घेºयात अडकण्याच्या भीतीने डागाने स्वत:चं आयुष्य संपविल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली. मात्र यातून उच्चभ्रू वसाहतीत वाढत असलेली तरुण मुलांची महागडी व्यसनं हे एक भलतंच भयंकर जगही समोर आलं.
आजही डागासारखे अनेक तरु ण व्यसनांचे बळी ठरत आहेत. एक थ्रिल म्हणून सुरू झालेला हा अनुभव मुलांच्या नकळत व्यसनात बदलतो. आई- वडील दोघेही नोकरी करणारे. बदलती जीवनशैली, मुलांच्या सुखासाठी ओतला जाणारा पैशांचा पाऊस, महागड्या वस्तू आणि प्रायव्हसी म्हणून दिली जाणारी स्वतंत्र खोली हे सारं या टोकाला जातं की मुलं व्यसनांच्या रॅकेटमध्ये अडकतात. आणि हे लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो.
ठाण्यातील तीन हात नाका परिसरातील उच्चभ्रू वसाहतीमध्ये मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचं सोसायटीतील रहिवाशांच्या दोन वर्षांपूर्वी निदर्शनास आलं. मुलांची, तरुणांची प्रकृती खालावतेय आणि ते समजण्याच्याही ते मन:स्थितीत नाहीत. अशात सोसायट्यांच्या गेटवरच मुलांना ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याचं लक्षात येताच रहिवाशांनीच वॉच ठेवला. आणि याबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्र ार केली. मात्र पोलिसांच्या हाती ही मंडळी लागली नाही. अशीच परिस्थिती ठाण्यासह मुंबईतील वांद्रे, पवई, कुलाबा, मरीन ड्राइव्ह, माहीम, मलबार हिल, माटुंगा, दादर, अंधेरी, ओशिवरा, वर्सोवा, मढ अशा उच्चभ्रू सोसायट्याबाहेर आहे असा पोलिसांचाही होरा आहे. मात्र हायप्रोफाइल स्टेटसमध्ये तेथील रहिवाशांना त्याची जाणीव असूनही ते दुर्लक्ष करतात. तक्रार करायला पुढे येत नाहीत. पालक थेट बोलत नाहीत.
ठाण्याच्या रहेजा गार्डन येथील उच्चभ्रू वसाहतीतील अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांकडे पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली. याच तरुणांच्या चौकशीतून डागालाही चौकशीसाठी बोलावलं होतं. अभ्यासाचा ताण, त्यात पोलिसांचा ससेमिरा यातूनच त्यानं आत्महत्या केल्याचा पोलिसांचा संशय आहे.
ओळखीचे बनतात ड्रग्ज तस्कर
हायप्रोफाइल सोसायट्यांमधील मुलांच्या मोकळेपणाचा फायदा घेत तस्कर मंडळी त्यांना गाठतात. विशेषत: सोसायटी असो वा महाविद्यालय या परिसरातील पानटपरी, चहावाला, भाजीवाला, इस्त्रीवाला नशेच्या वस्तू या मुलांपर्यंत पोहचवीत असल्याचं कारवाईतून वेळोवेळी समोर येतं. अगदी थेट घरपोच पैशाच्या जोरावर सर्व काही मिळत असल्यानं नशा करणारे आणि ड्रग्ज तस्करांचं फावतं आहे.
अमली पदार्थमुक्त शाळा-महाविद्यालयांसाठी प्रयत्न
मुंबई अमली पदार्थांचे पोलीस उपआयुक्त शिवदीप लांडे यांनी मुंबईत ‘अमली पदार्थमुक्त शाळा आणि महाविद्यालय’ ही मोहीम छेडली आहे. या मोहिमेअंतर्गत शाळा, महाविद्यालय परिसरात ड्रग्ज विक्र ी करणाºयांकडे पोलिसांनी मोर्चा वळविला आणि मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली आहे. जवळपास ५० हून अधिक शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहोचल्याचं पोलीस उपआयुक्त लांडे सांगतात. ज्या पालकांकडून तक्र ारी प्राप्त होतात त्यानुसार संबंधित सोसायटी, ठिकाणी गस्त वाढविण्यात येते. अशात जनजागृतीसाठी पालकांनी आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचं आहे, असंही पोलीस आवर्जून सांगतात.
नार्को इन्फोलाइन
पालकांसाठी, मुलांसाठी नार्को इन्फोलाइन क्र मांक सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी संपर्क क्रमांक 9819111222
माझा मुलगा हे करूच शकत नाही..
आजही लोखंडवालासारख्या परिसरात ३०० सोसायट्यांमध्ये १५ मुलांची याच व्यसनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा अनेक उच्चभ्रू वसाहतींमध्ये तरुण मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या आहारी जाताना दिसताहेत आहे. मात्र यात दुर्दैवी बाब म्हणजे या सोसायटीतील आईवडिलांना ते मान्य नाही.
‘माझा मुलगा ते करूच शकत नाही’ अशी त्यांची भूमिका असते आणि त्यावर ते ठाम असतात. अनेक घरांमध्ये पालकच व्यसन करत असल्याने याच स्टेटस सिम्बॉलचे मुलंही अनुकरण करायला लागतात. माझा मुलगा सगळ्याच गोष्टीत अॅडव्हान्स आहे, आणि का नसावा? असंही पालकांचं मत अस्वस्थ करणारं आहे. मुळात एका क्लिकवर या मुलांना सर्व काही उपलब्ध होतं. त्यात एक नवी क्रेझ आहे या मुलांमध्ये.
ते परस्परांना सांगतात, आज मैने ये टेस्ट किया, आज मैने वोे टेस्ट किया! आणि कुठेतरी सिगारेट, दारूपासून सुरू झालेली सुरु वात एमडी, कोकेन, हेरॉइनपर्यंत पोहचली. आता तर मुलं नवनवीन केमिकल्सचा आधार घेत आहेत. आणि हे खूप गंभीर आहे.
- वर्षा विद्या विलास सचिव, महाराष्ट्र राज्य नशाबंदी मंडळ