मी दंगा पण करतो, फक्त संतुलन ठेवून!- प्रथमेश लघाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 07:56 AM2021-02-25T07:56:07+5:302021-02-25T08:00:17+5:30

‘सारेगम लिटिल चॅम्प्स’मधून सर्वदूर परिचित झालेल्या कोकणातल्या प्रथमेश लघाटेनं रसिकांवर गारुड केलं. गंभीर सादरीकरण नि वागण्यात आर्जव असणारा हा गुणी गायक.

I also make a fun, just keep the balance! - | मी दंगा पण करतो, फक्त संतुलन ठेवून!- प्रथमेश लघाटे

मी दंगा पण करतो, फक्त संतुलन ठेवून!- प्रथमेश लघाटे

googlenewsNext
ठळक मुद्देकॉमन हेडिंग : भावपूर्ण स्वरांचा संस्मरणीय वारसा लोकमत सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार नुकताच हरगून कौर आणि प्रथमेश लघाटे या युवा आणि आश्वासक गायकांना देण्यात आला. त्यानिमित्त त्यांच्याशी गप्पा...

मुलाखत- सोनाली नवांगुळ

छायाचित्रे - दत्ता खेडेकर, मुंबई

 

 

अगदी लहानपणापासून गंभीरपणे गातोहेस तू... त्याचं फळ म्हणून इतके मानसन्मान वाट्याला येताहेत...

टीव्ही चॅनल्सवर वगैरेत मी दिसलो तेव्हा खरंच लहान होतो, पण गाणं त्याहून लहानपणापासून ऐकत आलोय. आमच्याकडं ‘गुरुवार भजन परंपरा’ चालते. कानावर यायचंच. गजाननकाका पं. भीमसेन जोशींची भजनं गायचे. मला जसं कळायला लागलं, मी माझ्या परीनं गायला लागलो. मी सहासात वर्षांचा असताना सतीश नि वीणा कुंटेंनी माझा आवाज ऐकला नि म्हणाले, यानं शास्त्रीय संगीताचे धडे घ्यायला पाहिजेत. तिथून सुरुवात आणि गंभीरपणाचं म्हणाल तर सादरीकरण करायचं असतं तेव्हा तिथं एकाग्रता असायलाच हवी म्हणून मी तसा असतो, एरवी भरपूर दंगा प्रिय आहे. टेंपरामेंट वेगळं असतं नं परिस्थितीनुसार.

गायक नसतास तर...

जसा गवय्या आहे तसाच खवय्याही आहे मी. नुसतं खायला नाही, जे आवडतं ते करून बघायलाही आवडतं मला. मी व माझा धाकटा भाऊ पुण्यात आहोत काही वर्षे, तर स्वयंपाक मी घरीच करतो. सगळी तयारी वगैरे नीट करतो. मागचं आवरायला मात्र कंटाळा येतो. आवडीनुसार कामं वाटून घेतलीत आम्ही, तसं करतो. संगीत महोत्सव किंवा बैठकांच्या निमित्तानं फिरतो तेव्हा तिथली स्पेशॅलिटी हुडकून नक्की खातो. मध्यप्रदेश, दिल्ली इकडचं खाणं मला फार आवडलेलं आहे. मी शाकाहारी आहे, सगळ्या भाज्या येतात करायला. माझी पावभाजी आवडते सगळ्यांना. त्यामुळं गायक नसतो तर शेफ असतो हे नक्की.

तुझ्या गाण्यातलं ‘भारी’ काय सांगशील तटस्थपणे? आणि नावडतं काय?

घरच्या संस्कारांमुळं असेल, पण माझं गाणं प्रासादिक आहे, आवाज लवकर हृदयापर्यंत पोहोचतो असं रसिक सांगतात. मी श्रद्धाळू आहे त्यामुळं यात ‘त्याची’ कृपा मानतो. कार्यक्रम झाला की कुणाशी फार बोलत नाही. शांत असतो. परतीच्या प्रवासात किंवा झोपताना स्वत:चं गाणं ऐकतो. काय नवी जागा सापडली, कुठं कच्चा राहिलो याचं विश्‍लेषण मला त्यातून करता येतं. दोष म्हणावा तर एकदा शिरलो गाण्यात की हातचं राखून गात नाही. त्यामुळं भान राहत नाही. लाँगटर्म चांगलं ऐकवीत राहायचं असेल तर अनावश्यक आवाज व रेंज नाही लावली पाहिजे. आहे मिळालेला तर पिळून घ्यावा आवाज हे चुकीचं आहे.

रियाझ नि सोशल मीडियाचा वापर गरजेचा होऊन बसणं याचा ताळमेळ कसा बसवतोस?

रियाझ मूडवर अवलंबून. प्रत्येक वेळचा तो वेगळा असतो. पहाटेचा षड्जाचा किंवा खर्जाचा असला पाहिजे. तेव्हा उगीच आवाज ताणून नैसर्गिक प्रवाह नाही मोडता कामा. दुपारआधी तानांचे पलटे, मिंडेचे पलटे. संध्याकाळी एक राग घ्यावा नि आलापी करीत त्याला एक्सप्लोअर करावा असं चालतं माझं. सोशल मीडिया गरजेचाच आहे आजकाल, त्यामुळं तुम्ही किती अ‍ॅक्टिव्ह आहात हा प्रश्‍न नाही, त्यासाठी तुमचं मूळ काम नि हे काम यात वेळेचं नियोजन कडक करावं लागतं. नाही तर बिघडत जातं गणित. आपण एखादी गोष्ट मीडिया हँडलवर टाकतो, त्यावर रिस्पॉन्स येतो, मग तुम्ही खुश होता- ते आकर्षण थोपवणं अवघड होऊन बसतं. ट्रिकी आहे ते. कमेंट, लाइक, शेअर, सबस्क्राइब यावरच दुनिया चाललीय असं वाटतं नि अंतिम साध्य धूसर होऊन बसतं. त्यामुळं गाण्यात काय नि इथं काय, संतुलन पाहिजे! सतत पोस्ट करण्यानं कंटेंटचा दर्जा घसरत जातो किंवा आपण कॉम्प्रमाइज करायला लागतो. ज्यामुळं लोकांना आपण आवडतोय त्याकरिता वेळ नि श्रम कमी पडताहेत हे लक्षात येऊ दिलं तर येतं.

तंत्रज्ञानाच्या वापराबाबत खुलं ठेवलंहेस तर स्वत:ला?

हो तर! माझा पाया शास्त्रीय असला तरी मला सगळ्या तऱ्हेचं गायला आवडतं. लॉकडाऊनच्या काळात माझ्या यू ट्यूब चॅनलवर मी अ‍ॅक्टिव्ह झालोय. त्यापूर्वी स्टुडिओजमध्ये मी रेकॉर्डिंग, डबिंग, मास्टर, मिक्सिंग, एडिटिंग निरखून बघायचो. आता सॉफ्टवेअर वापरून घरच्या सेटअपवर स्वत: करतो सगळं. भजनं रचतो, संगीत संयोजनही करतो. त्यातून कळलं मला की गाण्याचा रंग, ताल, शब्द, धून निवडायला संयोजकाला किती अभ्यास करावा लागतो; पण खरं सांगू डिजिटल महत्त्वाचं वाटतंय, मर्यादा कमी होतात, त्यामुळं. तरी प्रत्यक्ष साथसंगत मिळते तेव्हा सगळ्यांच्या विचारांची दिशा एकत्र होत वेगळंच सादरीकरण होतं. संवाद होतो. कष्टाचं चीज झाल्याचं कळतं. परफॉर्मिंग आर्टमधले बारकावे मी जरूर शिकेन भविष्यात. सध्या कळतंय ते हे की मला नि श्रोत्यांना आनंद मिळतो आहे तोवर गाणं बरं चाललंय!

Web Title: I also make a fun, just keep the balance! -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.