‘मला समजेल असं बोल..’
By Admin | Published: October 6, 2016 05:47 PM2016-10-06T17:47:48+5:302016-10-06T17:47:48+5:30
‘काय लिहिलं आहे तू मेसेजमध्ये, मला वाचून काहीही कळलेलं नाही..’ ‘J1 झालं नाहीये अजून म्हणजे काय?’ असे प्रश्न जर घरचे तुम्हाला विचारत असतील, तर नवीन जगाची भाषा तुम्हालाही येते असं म्हणायला हरकत नाही
>- निशांत महाजन
‘काय लिहिलं आहे तू मेसेजमध्ये, मला वाचून काहीही कळलेलं नाही..’ ‘J1 झालं नाहीये अजून म्हणजे काय?’ असे प्रश्न जर घरचे तुम्हाला विचारत असतील, तर नवीन जगाची भाषा तुम्हालाही येते असं म्हणायला हरकत नाही..पण सध्या या नव्या शॉर्टफॉर्म, व्हॉट्सअॅप आणि टेक्स्ट मेसेजेस भाषेनं भाषेची आणि ती ही इंग्रजी भाषेची पुरती तोडमोड करायला घेतली आहे.
जगभर अनेक लोक याविषयावर चर्चा, मंथन करत कधी आक्रोश, तर कधी चिंता व्यक्त करत आहेत. खेद तर अर्थातच आहे की, भाषेची अशी कशीही ससेहोलपट होणं बरं नव्हे म्हणून..पण हे इतकं असं टोकाचं वाटावं, अशी परिस्थिती का निर्माण व्हावी?
याचं कारण म्हणजे तरुण मुलांच्या तोंडी असलेले अनेक शब्द.
Lol, OMG, Selfie हे शब्द तर थेट डिक्शनरीत पोहचले. पण बाकीची लिंगोही (लॅँग्वेजचा शॉर्टफॉर्म!) आता बरीच चर्चेत आहे. तरुण मुलांना ती भाषा ‘कूल’ वाटते आणि सोशल मीडियात तर सध्या सर्रास तीच भाषा वापरली जाते. शिवाय या इंग्रजी कूल भाषेवर स्थानिक भाषेचा तडका मारला जातो तो वेगळाच.. मिक्स हिंदी, हिंग्लिश, मिंग्लिश ही तर या नव्या भाषेची आणखी वेगळी रूपं.
असं का बोलतात ही तरुण मुलं?
तर अनेकांचं म्हणणं की, ‘दोस्तांशी बोलण्याची, कट्ट्यावरची भाषा वेगळी, फ्रेण्डली असते. तिथं पुस्तकी भाषेत कोण बोलेल? तेच सोशल मीडियाचंही. टाइमपास करायला येतो आम्ही तिथं, तेव्हा भाषाही तशीच वापरणार! शिवाय आपण जुन्या जमान्याचे बोअरिंग नाही, यंग-हॅपनिंग भाषा आपल्याला येते, आपणही कूल आहोत हे भाषेतून दाखवणं जास्त सोपं असतं..आणि म्हणून तरुण मुलं आपल्या आपल्यात ‘कोड-डीकोड’ करता येईल, अशी भाषा वापरतात..
हे फक्त इंग्रजी संदर्भातच घडतं आहे असं नव्हे, तर मराठी भाषेसह सर्व स्थानिक भाषांबाबतही घडतं आहे. हिंदी, मराठी, या भाषेतले अनेक शब्द आता ‘कूल’ होऊ लागले आहेत.
एवढंच नाही, तर मराठीतल्याही वेगवेगळ्या बोलीभाषेतले शब्द वापरात नव्यानं दाखल होत आहे. विशेषत: सोशल मीडियात संवाद साधताना हे होताना दिसतं आहे.
एसएमएस भाषा ही एक थोडक्यात बोलण्याची नवीन तऱ्हाच जन्माला घालते आहे. आणि अर्थातच भाषा जशी लिहिली जाते, तशीच बोललीही जाते. मग बोलण्यातही वारंवार तेच शब्द येतात. वापरले जातात. यासगळ्याचा परिणाम एवढाच की, अनेकदा घरच्यांना आपली मुलं काय बोलताहेत, हे कळतच नाही. आणि त्यामुळेही गैरसमज होतात. अनेकदा तर मुला-मुलींमध्येही या भाषेमुळे गैरसमज होऊ शकतात. मुलांची ‘कूल’ भाषा काहीशी वेगळी, मुलींची ‘कूल’ भाषा काहीशी वेगळी असते..पण बोलताना, लिहिताना तीच वापरली जाते.
परिणाम?
अनेकदा गैरसमज. भांडणं होतात. वादही पेटतात. कारण शब्दांचे चुकीचे अर्थ घेतले जातात, लावले जातात. भाषेची तऱ्हाच तरुण जगात अशी बदलते आहे.. सर्वत्र. जगभर.आणि त्या भाषेतून नवीन काय अर्थबोध होणार की होणार नाहीच, वादच फक्त होणार हे कळेलच लवकर..तोवर आपण ‘कूल’ राहण्यापलीकडे दुसरं काय करू शकतो..
सध्या चर्चेत असलेले शब्द
पुढील शब्दांचे अर्थ डिक्शनरीत पाहण्यात अर्थ नाही कारण ते फक्त अर्बन डिक्शनरीतच सापडतील. मुख्य म्हणजे अर्बन डिक्शनरी असा एक नवाच प्रकार आता आॅनलाइनही हाताशी आहे..अर्थ शोधायचाच असेल तर गूगल करून पहा, एका शब्दाच्या अर्थाची बरीच माहिती मिळेल!
lol, OMG, selfie, TTYL, ROTFL, COOL, BFF, RIDIC, DOOSH, ToTes, Inapporos, Gunnich, Adorbs
परीक्षेत कसं लिहिणार?
शॉर्टफॉर्म वापरून लिहिण्याची सवय होते. बोलणंही तसंच. मोबाइलवर टाइप करताना हाताशी सतत स्पेलचेक. स्पेलिंग चुकलं तरी भावना पोहचतात.
पण त्यामुळे आता एक मोठीच पंचाईत झाली आहे. अनेकांना परीक्षा देताना शब्दांचे स्पेलिंगच आठवत नाही. कारण स्पेलचेक आॅन असल्याशिवाय लिहिण्याची सवयच उरलेली नाही.
मग त्यामुळे परीक्षेत भोपळे मिळतात, काहीच लिहिता येत नाही..
मराठीच नाही तर इंग्रजी माध्यमात शिकलेल्या अनेकांची ही गत आहे..