मी, स्वत:शी मोकळेपणानं बोलणारी एक फिल्म कॉन्व्हर्सेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 08:44 AM2018-03-15T08:44:04+5:302018-03-15T08:44:04+5:30

समाजात वावरताना अनेकदा स्वत:मधला ‘मी’ बाजूला ठेवावा लागतो.

I, a free-talking movie Conversation with myself | मी, स्वत:शी मोकळेपणानं बोलणारी एक फिल्म कॉन्व्हर्सेशन

मी, स्वत:शी मोकळेपणानं बोलणारी एक फिल्म कॉन्व्हर्सेशन

googlenewsNext

- माधुरी पेठकर

समाजात वावरताना अनेकदा स्वत:मधला ‘मी’ बाजूला ठेवावा लागतो. समाजाला अनुकूल असा मुखवटा घालावा लागतो. समाजातल्या चालीरिती, परंपरा आणि संस्कृतीला जे पटतं त्यानुरूप वागावं, दिसावं लागतं. समाज बोट ठेवेल, विरोध करेल असं वागणं सहसा टाळलेलं बरं असा एक साधारण कल असतो.

पण मग आपल्यातल्या त्या ‘मी’चं काय? आपण खरे कुठं असतो? आपल्या घरात? मित्र मैत्रिणींच्या घोळक्यात? नेमकं कुठे?
खरंतर कुठेच नाही. आपण खरे असतो ते एकांतात. आपल्या मूळ रूपाशी, मनातल्या उघड्या नागड्या इच्छांशी आपली तिथं भेट होते. पण मनाला शांतावणारा, सुखावणारा हा एकांत मिळतो कुणाला?

घरातली भांडणं, आजूबाजूचा आवाज, गर्दी गजबजाट, जगण्यासाठीची रोजची धावपळ यानं थकायला होतं. या सगळ्या कोलाहलाचा, गजबजाटाचा विसर पडावा, आतून आनंद देणारं असं काहीतरी करावंसं वाटतं. पण जे करावंसं वाटतं ते समाजाला मान्य असेलच असं नाही. मग त्यासाठीच शोधला जातो चोरटा एकांत.

असाच एक चोरटा एकांत भेटतो तो हर्षल वाडकर याच्या ‘कॉन्व्हर्सेशन’ या लघुपटात.
एक ती. तिला संध्याकाळी मुलगा पाहायला येणार असतो. आॅफिसमध्ये आहे असं ती आईला खोटंच सांगून ‘त्याच्या’ सोबत लॉजवर आलेली. घरातल्या भांडणांना कंटाळलेली, आजूबाजूच्या गोंगाटाला कावलेली, प्रायव्हसीसाठी आसुसलेली असते ती. त्याच्यासोबत तिला निवांत क्षण घालवायचे असतात. आपण म्हणजे निष्प्राण देह आहोत असं तिला अनेकदा वाटतं. त्या एकांतात ती त्याच्याशी लैंगिक सुखाविषयी मोकळेपणानं बोलते. मनातली लैंगिक भूक अस्वस्थ करते तेव्हा मी हस्तमैथुन करते असं ती त्याला मोकळेपणानं सांगते. समाजाकडे पाठ करून स्वत:च्या गरजांविषयी ठामपणे बोलते. झुगारून देते संकोच.

‘तो’ही तिच्यासोबतच्या त्या क्षणांसाठी आसुसलेला असतो. पण एका क्षणी तिला विचारतो, ‘हे सर्व केल्यावर तुला अपराधी किंवा चुकीचं काही केलं असं तर वाटणार नाही ना?’
त्याच्या त्या प्रश्नासरशी पुन्हा मानसिक कल्लोळ जागा होतो. बºया वाईटाच्या आकडेमोडीतून तिला थोडी सुटका हवी असते. पण त्याच्या एका प्रश्नासरशी चूक की बरोबरची गणितं तिच्या डोळ्यासमोर फेर धरतात. ती गोंधळते, बिचकते, थांबते. काय चूक काय बरोबर या दुविधेत सापडते..
ते सारे प्रश्न तिच्यासह त्याक्षणी आपल्यालाही छळायला लागतात.
दिग्दर्शक हर्षल या शॉर्टफिल्ममध्ये नैतिक-अनैतिक लेबलं न लावता, एक गोष्ट फक्त सांगतो. आताच्या पिढीची. सभोवतालचं वातावरण, त्यातून होणारी घुसमट, मनातल्या सुप्त इच्छा, त्या पूर्ण करण्यासाठी ते निवडत असलेले मार्ग याचा एक पट फक्त तो मांडतो. चूक काय नी बरोबर काय हे प्रेक्षकाला ठरवू देतो.
त्यासाठी हर्षलनं फिल्मचं तंत्रही तसंच निवडलं. त्यानं संपूर्ण फिल्म ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट, क्लोजअप शॉट्समध्येच शूट केली. २१ मिनिटांचा हा लघुपट प्रेक्षकांनाही स्वत:शी संवाद साधण्याची एक मोकळी संधी देतो.
आपण क्षणभर विचारतो स्वत:ला, मी कुठेय?

madhuripethkar29@gmail.com

ही फिल्म पाहण्यासाठी क्लिक करा.

 hhttps://filmfreeway.com/881541


ही फिल्म पाहाण्यासाठी..

Web Title: I, a free-talking movie Conversation with myself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.