मला भेटलेला कॅन्सर

By admin | Published: March 4, 2016 11:55 AM2016-03-04T11:55:52+5:302016-03-04T11:55:52+5:30

22 वर्षाची एक मुलगी. भरभरून जगण्याचं आणि छोटुसे प्रश्न मोठाले मानून, झोपाळ्यावाचून झुलण्याच्या वयातली. मात्र याच वयात तिला कॅन्सरनं गाठलं आणि ब्रेस्ट कॅन्सर नावाच्या या आजाराशी हिमतीनं तोंड देत तिनं जो प्रवास केला. त्याची ही ‘जिगरबाज’ गोष्ट.

I have cancer | मला भेटलेला कॅन्सर

मला भेटलेला कॅन्सर

Next
>कॅन्सरसह जगताना जी उमेद तिनं कमावली,  त्या उमेदीचं हे एक शेअरिंग.
 
या घटनेला आता आठ वर्षे होत आहेत. तेव्हा मी फक्त 22 वर्षाची होते. माङया वयाच्या मुलांना जसे स्वत:च्या आयुष्याबद्दल गंभीर प्रश्न पडतात तसेच काही प्रश्न मलाही त्यावेळी पडले होते. उदाहरणार्थ माङो केस स्ट्रेटनिंग करून जास्त चांगले दिसतील का? मी कोणत्या अँगलने जास्त फोटोजेनीक दिसते? माझा बॉयफ्रेंड मला सोडून गेला तर? - असे अनंत प्रश्न समोर होते.
पण येत्या काही दिवसांत माङो सो कॉल्ड ‘गंभीर’ प्रश्न मागे सारत मला हादरवून सोडणारं खरंखुरं गंभीर काहीतरी घडणार होतं, याची मला कुठं कल्पना होती. माझं कॉलेज, फ्रेंड्स, डेटिंगभोवती फिरणारी गाडी भलत्याच ट्रॅकवर येणार होती आणि या नव्या वळणावरचं स्टेशन असणार होतं ‘कॅन्सर’.
मला डिटेक्ट झालेला ब्रेस्ट कॅन्सर. त्याची ट्रिटमेंट आणि आठ महिने टाटा हॉस्पिटलच्या वा:या, हे सगळं मी खूप एन्जॉय केलं. खोटं वाटेल हे वाक्य पण ते खरंय. या संपूर्ण ट्रिटमेंटच्या काळात मिळालेलं अटेन्शन. कधी न मिळालेलं प्रेम आणि सतत काहीतरी वेगळं घडतंय याचं थ्रिल या सगळ्यांमुळे किमोथेरपी, सजर्री आणि रेडिएशन हे सगळे टप्पे फारच मंतरलेले होते. आज ‘त्या’ दिवसांकडे मागे वळून पाहिलं तर खूप काही सोसलं, मिळवलं असं मात्र नक्कीच नाही वाटत. 
आणि टाटा हॉस्पिटल या एका वेगळ्या मुंबईशी माझी ओळखही झाली. त्याच मंतरलेल्या दिवसांची ही धमाल गोष्ट. मला भावलेली माणसं, प्रसंग आणि अर्थात मला भेटलेल्या कॅन्सरची ही गोष्ट..
अंघोळ, ही अशी गोष्ट आहे की जिचा मला मनस्वी कंटाळा आहे.  अंघोळ आणि अंघोळ केलेला आणि न केलेला माणूस दहा-पंधरा मिनिटांनी सारखाच दिसतो असं माझं ठाम मत आहे. पण त्या दिवशीची अंघोळ कायम लक्षात राहणारी अशीच होती. साबण लावता लावता छातीजवळ हात गेला आणि डाव्या ब्रेस्टच्या वर हाताला एक गाठ लागली. नेमकं काय झालं, घडलं, त्या एक-दोन क्षणात; आता आठवत नाही. पण जाणवलं तेव्हा अख्खं बाथरूम धूसर झालं होतं. डोळ्यातल्या पाण्यामुळे बहुधा. 
बाहेर आले. जाम घाबरले होते मी. कसं सांगू कोणाला की इथे.. छातीजवळ अशी गाठ आहे?.. 
रडत रडत बाबांना मिठी मारली. सांगितलं की एक गाठ आहे ब्रेस्टमध्ये आणि मला खूप भीती वाटतेय. बाबा नेहमीप्रमाणो शांत होते. ते आयदर खूप शांत असतात किंवा खूप भडकलेले. मनात प्रचंड खळबळ चालू होती. शेजारची काकू. तिला सांगितलं, दाखवलं. तीही खूप घाबरली. आईला जाऊन सात-आठ वर्षे झाली होती आणि तिच्याही मृत्यूचं कारण ‘कॅन्सर’च होतं. मग आमचं एक रडण्याचं सेशन झालं. पुढे ही सेशन्स वेगवेगळ्या लोकांबरोबर, घरी, हॉस्पिटल, गच्ची, कॉलेज अशा लोकेशन्सवर घडतच गेली. आणि अर्थातच या सेशन्समध्ये कॉमन फॅक्टर होते ‘मी’.
एका नातेवाइकाने जवळच्याच एका सजर्नला भेटण्याचा सल्ला दिला. त्यांनी मला तपासलं. काही टेस्ट केल्या आणि ती गाठ काढून टाकण्याचा निर्णय घेतला. सकाळी सकाळी आम्ही डॉ. व्यासांच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. माङया आयुष्यातलं पहिलंच ऑपरेशन. मेरी तो फटी पडी थी. पण खूप एक्साईटमेण्टही होती. आणि बहुतेक या परस्परविरोधी भावनांमुळे खूप थकल्यासारखं झालं होतं. एसीचा गारवा लागताच एकदम शहारून आलं. 
खूप लोक असतील का? सगळ्यांसमोर असं उघडं कसं जायचं, हे सगळं टाळता नाही का येणार? खूप दुखेल? मी मेले तर? हे सगळे प्रश्न बरोबर वागवत मी ऑपरेशन टेबलार्पयत पोहोचले. मान वर करून पाहिलंच नाही. डोळे  बंद केले. मला लोकल अॅनेस्थेशिया दिला गेला आणि ऑपरेशनला सुरुवात झाली. माङयाशी गप्पा मारत साधारणत: अर्धा तास ऑपरेशन चाललं. बॅग्राउंडला गायत्री मंत्र चालू होता. इतका वेळ नॉनस्टॉप गायत्री मंत्र ऐकून मला गरगरायला लागलं होतं. मी सांगितलं, दाखवा हं, कशी आहे गाठ ते! एका छोटय़ा पातीच्या कांद्यासारखी गाठ होती, काळपट पांढरी. डॉक्टरांनी ती गाठ एका प्लॅस्टिकच्या डब्यात बंद केली आणि ऑपरेशन संपल्याचं जाहीर केलं. मी उठले. डॉक्टरांना सांगितलं की, ‘प्लीज, नेक्स्ट टाइम कोणी यंग पेशंट असेल तर सिनेमातली गाणी लावा, मी देते पाहिजे तर सीडी.’
हा सगळा सोहळा संपवून घरी आले. ही गाठ कॅन्सरची नसेल असं सगळ्यांना वाटत होतं. त्यामुळे सगळेच एकमेकांची माझी आणि स्वत:ची तेच तेच सांगत समजूत घालत होते. ती गाठ म्हणजे सॅम्पल, रहेजा हॉस्पिटलला पाठवलं होतं. चेक करायला रिपोर्ट यायला वेळ होता. बाबा सतत कॅन्सरचे रिपोर्ट कधी येणार, ते आल्यावर टाटाला जायला हवं असं बोलत होते. त्यामुळे डॉक्टर पण त्यांच्यावर वैतागले होते. पण बाबांना कॉन्फिडन्स होता ही गाठ कॅन्सरचीच आहे आणि त्यामुळे मीही मनाची तशीच तयारी सुरू केली. 
माझी भीती कमी करण्याची आणि संकटाला सामोरं जाण्याची हीच पद्धत होती. जास्तीत जास्त वाईट काय होईल याचा विचार करून ठेवायचा. अखेर बाबांबा कॉन्फिडन्स बरोबर ठरला. 
रहेजाचा रिपोट आला.
 गाठ कॅन्सरचीच आहे.
- शचि मराठे
shachimarathe23@gmail.com
 
(कॅन्सरशी जोरदार लढा देऊन आशावादी जगणं जगणारी शचि ही एक मुक्त पत्रकार आहे. आणि न्यूज चॅनलमध्येही तिनं काम केलेलं आहे.)

Web Title: I have cancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.