मी शेफ होणार!

By admin | Published: November 10, 2016 02:41 PM2016-11-10T14:41:27+5:302016-11-10T14:41:27+5:30

स्वयंपाक नावाच्या कलेवर प्रेम करणारे तरुण मुलगे... जुनाट भेदाच्या चौकटी मोडत सरळ किचनकडे वळतात आणि तिथून एका ग्लॅमरस, पैसेवाल्या क्षेत्रात करिअर करू पाहतात.. त्या लजीज बदलाची ही एक गोष्ट...

I will be chef! | मी शेफ होणार!

मी शेफ होणार!

Next

- भक्ती सोमण

मोठ्ठं झाल्यावर कोण होणार? - हा शाळकरी बावळा प्रश्न अनेकांना अजूनही घरी आलेले पाहुणे विचारतातच...
एवढंच कशाला? बारावी झाली? ग्रॅज्युएशन झालं? - आता पुढे?
ढमक्याचा पिंट्या गेलापण यूएसला असं सांगणाऱ्या भोचक काकवा-मावशा आणि तुसडे काकाबिका आपल्याही वाट्याला येतातच...
आता या अशा उत्सुक + भोचक मंडळींना कुणी उत्तर दिलं की, 
मी मोठा झालो की, शेफ होणार आहे.
किंवा सांगितलं की, मला स्वयंपाक करायला खूप आवडतं, सांगा तुमच्यासाठी चायनिज करू की थाई, कोकणी करू की इराणी?
तर..?
एक तर ते मोेठ्ठाले डोळे करून आश्चर्यानं गप्प बसतील किंवा मग काहीतरी टिपिकल म्हणतील की, मुलगा असून, असल्याकसल्या रे आवडी तुझ्या? स्वयंपाक कस्ला करतोस तू मुलगा असून??
***
पण अशा तमाम ‘टिपिकल’ लोकांच्या त्याहून टिपिकल आणि जुनाट विचारसरणीला मोडीत काढत आता काही तरुण मुलं स्वयंपाकघरात प्रवेश करू लागली आहेत. आपण केलेल्या पदार्थांचे फोटो हौशीहौशीनं पाककृतीसह फेसबुक-इन्स्टावर टाकू लागलेत. पदार्थांच्या कृतीपासून ते प्लेटिंगपर्यंतची चर्चा अतिउत्साहानं जाहीरपणे करू लागलेत..
आणि स्वयंपाक म्हणजे ‘बायकी’ गोष्ट, पुरुषांच्या मर्दानगीला न शोभणारी असा जुनाट स्त्री-पुरुष भेदभाव तरी किमान काहीजणांनी मोडीत काढण्याचं ठरवलं आहे. काहींनी तो मोडीतही काढला आहे. अर्थात त्याला जोड मिळाली आहे ती टीव्हीवरच्या ग्लॅमरस कुकिंग शोजची आणि त्याहून देखण्या शेफ्स अ‍ॅँकरची...
कुणाच्या गालावरच्या खळ्या, कुणाची स्टाईल, कुणाची स्माईल, कुणाची अदा तर कुणाचा संताप हे सारं तरुण मुलांच्या चर्चेचा विषय तर बनलंच.
पण या शेफ्सचं ग्लॅमरस करिअर, त्यांच्याकडे आलेला पैसाही दिसू लागला..
ग्लॅमर-पैसा या दोन्ही गोष्टींसह हाका मारणारं हे क्षेत्र म्हणूनच आता तरुण मुलांना (हो, मुलांनाच, मुलींना कमी !!) खुणावतं आहे..
आणि मी शेफ होणार, हे तरुण मुलं अभिमानानं सांगत आहेत..
कुकिंग, हॉटेल मॅनेजमेण्टसह शेफ म्हणून करिअरची वाट चालणाऱ्या या नव्या प्रवासाची एक झलक...
खमंग गप्पांची एक खास लजीज मेजवानीच!!

 

Web Title: I will be chef!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.