मी जाईन दुर्गम भागात! जिथं आपली गरज आहे, तिथं वर्षभर तर काम करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 10:58 AM2017-11-16T10:58:51+5:302017-11-16T10:59:19+5:30
एमबीबीएसनंतर वर्षभर ग्रामीण भागात जाऊन एमओशिप घ्यायचीच असं ठरवलेल्या आणि ‘बॉण्ड हवाच’ असं सांगणा-या एमबीबीएस फायनल इअरच्या दोन विद्यार्थ्यांचं हे मनोगत. ते म्हणतात, पीजीसाठी पुस्तकांचा रट्टा मारून क्लेरिकल काम करण्यापेक्षा वर्षभर ग्रामीण भागात काम करू, तो अनुभव जास्त महत्त्वाचा आहे...
का नाही?
हा माझा थेट आणि स्वच्छ प्रश्न आहे.
मी मेडिकलला, त्यातही शासकीय मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला. त्याचवेळी मी बॉण्डवर सही केली की एमबीबीएस पूर्ण केलं की एक वर्ष मेडिकल आॅफिसर म्हणून सेवा देईल, मगच तो अभ्यासक्रम पूर्ण होईल.
हा बॉण्ड मान्य नव्हता तर मला सरकारी महाविद्यालय सोडून खासगी कॉलेजात जाण्याचा पर्यायही असतोच. तिथं काही बॉण्डची अट नाही. म्हणजे मी जर शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलाय तर बॉण्ड पूर्ण करणं हे मी तेव्हाच मान्य केलं आहे.
मी स्वत: तरी या बॉण्डकडे एक वर्षभराची पूरक इण्टर्नशिप म्हणूनच पाहते. ते करून डॉक्टर म्हणून माझे स्किल्स अजून वाढतील, त्यात सुधारणा होईल असं मला वाटतं. वैद्यकीय शिक्षणात अजून एक प्रॅक्टिकल शिकण्याचं वर्ष असं म्हणून मी याकडे पाहते. याकाळात मला क्लिनिकल आणि प्रशासकीय दोन्ही कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहे. मी भविष्यात डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करेल तेव्हा मला या अनुभवाचा फायदाच होईल. पुढे ज्या क्षेत्रात मी काम करेल त्यासाठीचा पाया या वर्षभरात अधिक मजबूत होईल. जे एमबीबीएसच्या पाच वर्षांत शिकले नाही ते या वर्षभरात कदाचित शिकायला मिळेल या आशेनं मी या वर्षाकडे पाहते आहे.
पीजी करण्यापूर्वी हा बॉण्ड पूर्ण करणं मला म्हणूनच महत्त्वाचं वाटतं. कारण त्यातून मला नेमकं काय आवडतं, डॉक्टर म्हणून माझ्या क्षमता काय आहेत हे माझं मलाच या काळात अधिक स्पष्ट होऊ शकेल. स्पेशलिस्ट होण्यापूर्वी एक परिपूर्ण एमबीबीएस डॉक्टर होणं हा काळ मला शिकवेल याची मला खात्री वाटते.
म्हणून हा बॉण्ड मला मानगुटीवर ठेवलेलं ओझं वाटत नाही. हा बॉण्ड पूर्ण करणं म्हणजे एक वर्ष वाया घालवणं असं तर माझ्या मनातही येणं शक्य नाही. एमबीबीएस म्हणून कॉलेजातून बाहेर पडताच मला प्रत्यक्ष समाजात, प्रत्यक्ष रुग्णांसोबत काम करायला मिळणार ही डॉक्टर म्हणून माझ्यासाठी केवढी मोठी संधी आहे.
आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, डॉक्टर म्हणून जिथं माझी सर्वाधिक गरज आहे, माझ्या असण्यानं जिथं अनेकांच्या आयुष्यात बदल घडणार आहे तिथं मी काम करायला हवं. एका एमबीबीएस डॉक्टरने आपलं एक वर्ष दिलं तर दुर्गम भागातल्या, खेड्या-पाड्यातल्या रुग्णांना केवढी मदत होईल. वर्षानुवर्षे डॉक्टर म्हणून काम करताना हा अनुभव किती मोठं बळ देईल.
म्हणून मी स्वत: दुर्गम भागातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन वर्षभर सेवा द्यायचं नक्की केलं आहे. तिथं माझी जास्त गरज आहे. म्हणजे शहरी भागात डॉक्टरांची गरज नाही असं मला म्हणायचं नाही; पण ग्रामीण भागात जाणंही गरजेचं आहे. म्हणून या बॉण्ड पूर्ततेची नीट अंमलबजावणी व्हावी आणि सर्व माणसांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात हे मला जास्त महत्त्वाचं वाटतं, तसं होणं हे गरजेचं नाही का?
आणि या एमओशिपचा मला पीजीच्या तयारीसाठी उपयोग होईल का?
तर तसं मला वाटत नाही.
मी जी काही थोडीबहुत तयारी सुरू केली त्याचा माझा अनुभव वेगळं सांगतो. कारण ही परीक्षाच क्लिनिकल स्किलवर आधारित गुणवत्ता तपासणीपासून दूर आहे. आणि तो मुख्य प्रश्न आहे. पीजीला प्रवेश घ्यायचा तर पुन्हा पाठांतर, घोकंपट्टी. त्यापेक्षा जर शासनाने या परीक्षेचं स्वरूप बदललं, ती जास्त प्रॅक्टिकल केली तर त्याचा फायदा होईल. एमओशिप करून जे प्रत्यक्ष शिकायला मिळेल, डॉक्टर म्हणून कस लागेल त्याचा या परीक्षेत उपयोग होईल. आता तसं नाही. पीजीची प्रवेश परीक्षा म्हणजे वर्ष-वर्ष मुलं स्वत:ला एका खोलीत पुस्तकांसह कोंडून घेतात. त्यापेक्षा निदान करण्याची क्षमता, वैद्यकीय ज्ञान, आणीबाणीत वापरलेली कौशल्य यांचा कस लागला तर मुलं आनंदानं हा बॉण्ड पूर्ण करतील.
- सुरभी धर्माधिकारी
(एमबीबीएसची शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,
कोल्हापूर)