निदान नाहीच झालं तर..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 08:33 AM2018-03-29T08:33:10+5:302018-03-29T08:33:10+5:30
परीक्षा जवळ आली की, अनेकांच्या छातीत धडधडतं. आजारपण येतं, जीव घाबरतो, डॉक्टरकडे निदानही नेमकं होत नाही तेव्हा..?
- माधुरी पेठकर
शरीरात काहीतरी विचित्र होतंय. प्रचंड अस्वस्थता. तगमग. हे का होतंय? हे कसलं लक्षण आहे, काही कळत नाही. डॉक्टर एकामागून एक टेस्ट सांगतात. निदान मात्र होत नाही. आपल्याला जे होतंय ते भयंकर रोगाचं तर लक्षण नाही ना? हा प्रश्न जीव कुरतडत राहातो. सगळ्यावरचं लक्ष उडवतो.
एका पेशंटसाठी रोगाचं अचूक निदान होणं म्हणून महत्त्वाचं असतं. निदानाचा हा कणा पेशंटला आजारावर मात करण्यासाठी उभं करतो. सुमित बोबडे लिखित आणि दिग्दर्शित ‘कणा’ या लघुपटात पेशंटला योग्य डॉक्टर भेटणं, त्याच्या त्रासाचं अचूक निदान होणं याविषयी एक गोष्ट उलगडते.
अनिल हा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देणारा विद्यार्थी. कॅम्पस इंटरव्ह्यू झालेला. त्यात सिलेक्शनही झालं. आता ‘एक्झाम’ क्लिअर करण्याचं तेवढं टेन्शन. एकीकडे अभ्यास सुरू असतो; पण मनात जर-तरची धाकधूक सुरूच असते. या धाकधुकीचं रूपांतर प्रचंड मानसिक तणावात होतं. मनावरचा हा परिणाम मग शरीरावरही दिसू लागतो. अनिलला प्रचंड अस्वस्थता वाटते. घुसमटल्यासारखं होतं. श्वासच घेता येत नाही. छातीतल्या धडधडीचं रूपांतर कळांमध्ये होतं. एकदा, दोनदा, मग सारखं सारखं हे होतं. अनिल मग रूममेट सागरची मदत घेऊन दवाखाना गाठतो. डॉक्टर अनिलची प्राथमिक तपासणी करतात; पण अनिलच्या त्रासाचं कारण मात्र कळत नाही. मग एकामागून एक तपासण्या, हॉस्पिटलायझेशन असं सगळं होतं. या व्यापात अनिलचे पेपर बुडतात.
आपल्याला काहीतरी भयंकर आजार झाला असल्याच्या भ्रमात अनिल आपला आत्मविश्वास गमावून बसतो. घरी आल्यावर बरं वाटेल म्हणून वडील परीक्षेची पर्वा न करता त्याला घरी बोलावून घेतात. पण, घरीही अनिलला तोच त्रास. आता अनिलसोबत त्याचे आई-वडीलही धास्तावतात. पुन्हा डॉक्टर, तपासण्या हे चक्र सुरू होतं. हे असंच सुरू राहणार असं वाटत असतानाच डॉक्टर अनिलला त्याच्या त्रासाचं अचूक कारण सांगतात. प्रचंड तणाव आणि अनामिक भीती यामुळे अनिलला पॅनिक अटॅक येत असतात. औषधोपचार आणि मानसोपचार यामुळे हा त्रास कमी होतो. हा काही गंभीर आजार नाही. डॉक्टरांकडून आपल्याला होणाऱ्या त्रासाचं नेमकं कारण अनिलला कळतं. एक लढाई जिंकल्याचे, मोठ्या तणावातून सुटल्याचे भाव त्याच्या चेहºयावर उमटतात.
अनिलच्या हातात आपल्या त्रासाचं योग्य कारण पडेपर्यंत त्याच्या हातातली एक संधी मात्र सुटलेली असते. हेच जर त्याला आधी कळलं असतं, तर त्याचे पेपर बुडाले नसते. वर्ष वाया गेलं नसतं आणि अर्थातच नोकरीची संधीही हुकली नसती. पण निदान न होणं किती जीवघेणं असतं ही चुटपुट लावूनच लघुपट संपतो..
या लघुपटाचा लेखक सुमित. काही वर्षांपूर्वी विदर्भातल्या छोट्याशा शहरातून नवीन संधीच्या शोधात आलेल्या सुमितला नेमक्या याच त्रासानं गाठलं. उमेद हरवलेला सुमित एकामागून एक तपासण्यांना सामोरं जात होता. हाती काहीच लागत नव्हतं. पुढे पुढे या त्रासानं सुमितला इतकं बेजार केलं की त्याला पुणं सोडून परत आपल्या घरी परतावं लागलं. एका अनामिक त्रासानं आपण आयुष्यात हरलो अशी सुमितची भावना पक्की होत असतानाच त्याला आयुष्यासमोर धीरानं उभं करणारा कणा सापडतो. हा कणा असतो त्याला झालेल्या आजाराच्या निदानाचा. योग्य उपचारानंतर या त्रासातून बाहेर पडलेल्या सुमितने मग हा विषय अनेकांपर्यंत पोहोचवायचा ठरवला. वेगवेगळ्या परीक्षांना सामोरं जाणाºया अनेक विद्यार्थ्यांना हा त्रास होतो. या त्रासाला वैद्यकीय भाषेत सोमॅटिक डिसआॅर्डर, अॅग्झायटी डिसआॅर्डर असं म्हटलं जातं. या त्रासाचं स्वरूप, त्याचे परिणाम आणि त्याचे प्रत्यक्ष आयुष्यावर घडणारे परिणाम हे सर्व सुमितनं स्वत: अनुभवलं होतं. आपल्या अनुभवातून इतरांना शहाणं करण्यासाठी सुमितनं १६ मीनिटांच्या ‘कणा’ या लघुपटाची निर्मिती केली.
हा लघुपट https://filmfreeway.com/projects/1367495
या लिंकवर उपलब्ध असून, ही लिंक ओपन करण्यासाठी holocosmo#9 हा पासवर्ड वापरावा.