आपण एकाकी तर नाही?

By admin | Published: October 6, 2016 05:42 PM2016-10-06T17:42:31+5:302016-10-06T17:42:31+5:30

तसे आपण सतत माणसांच्या गराड्यात असतो, प्रत्यक्षातच काय ऑनलाइनही गर्दीतच असतो; पण म्हणून आपल्याला एकटेपणा जाणवत नाही असं नाही. गर्दीतही आपण ‘एकटे’ असतो. काहीतरी खुपतंच मनाला. ते काय? आणि का?

If you are not alone? | आपण एकाकी तर नाही?

आपण एकाकी तर नाही?

Next
>- मयूर देवकर
 
‘माणूस हा सामाजिक प्राणी आहे’ हे वाक्य आपण सर्वांनी शाळेत रटलेलं आहे. माणसाला माणसं लागतात. घरचे एका दिवसासाठी जरी गावाला गेले तरी घर कसं खायला उठतं? आपल्याला एकट्याने राहायची सवय नाही किंवा आपली तशी नैसर्गिक सहजप्रवृत्ती नाही. आपल्याला गल्ली कशी गजबजलेली पाहिजे. गप्पा-टप्पा मारायला यार-दोस्त पाहिजेत. जरा दोन-चार मिनिटं कोणी मित्र चॅटिंगवर आॅनलाइन नसेल तर अस्वस्थ होणारे आपण! आपल्याला नाही बुवा एकटेपणा सहन होत, असंच आपलं मत.
मात्र हे कितीही खरं असलं तरी आपल्याकडेही ‘एकाकीपणा’ किंवा ‘लोनलीनेस’ची समस्या वाढते आहे. महानगरीय संस्कृती आणि इंटरनेटच्या विस्ताराने जग जोडलं जात असल्याचं चित्र रंगवताना काही माणसं आतून पूर्ण एकाकी होत आहेत. 
बोटाच्या स्पर्शावर हवा त्याला संपर्क करण्याची सुविधा असतानाही मनातलं बोलावं असं कुणी नाही असं अनेकांना वाटतं. व्यक्त व्हायला एवढी माध्यमं असूनही आपल्या मनातलं कुणाला कळत नाही, सांगता येत नाही असं अनेकांना वाटतं. त्याची नोंद कोणी आसपासच्या गर्दीत वाटणाऱ्या या एकटेपणाला काय म्हणावं? मनातील दोन गोष्टी घडाघडा बोलायला ना आपल्याला वेळ, ना ऐकणाऱ्याला. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस अपडेट करून जिवंत असल्याची तेवढी स्वत:ला आणि जगाला जाणीव करून देत राहायची. बरं इथं सोशल मीडियाला दोष देण्याचं काही कारण नाही. ते पडले आपल्या हुकमाचे गुलाम. 
 
एकटेपणा खरंच समस्या आहे?
अनेकांना एकाकीपणा गंभीर समस्या वाटत नाही. परंतु जगामध्ये एकटे राहणाऱ्या लोकांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. विशेष करून वयोवृद्ध लोकांचा यामध्ये मोठ्या प्रमाणावर सामावेश आहे. नोकरी-व्यवसायासाठी मुले आईवडिलांना मागे सोडून दूर जातात. बरं ही समस्या केवळ वृद्धांपुरतीच सीमित नाही. तरुणांमध्येसुद्धा ‘एकलकोंडेपणा’ वाढतोय. आपल्याच धुंदीत मग्न राहणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्याचं प्रमाण वाढत आहे. ‘मेंदूच्या नेमक्या कोणत्या भागात एकटेपणाची भावना उत्पन्न होते हे शोधण्यात यावर्षी ‘एमआयटी’तील संशोधकांना यश आलं आहे. त्याला ‘डॉर्सलस रॅफे न्यूक्लियस’ असं म्हणतात. विशेष म्हणजे, नैराश्य निर्माण करणाऱ्या भागाशीच तो जोडलेला आहे. 
मानसशास्त्रज्ञ जॉन कॅचिओप्पो गेली तीन दशके ‘एकटेपणा’वर संशोधन करीत आहेत. ते म्हणतात, एकाकीपणाची भावना ही तहान-भुकेसारखी असते. तुम्ही ती नाकारली तरी तिचं अस्तित्व नष्ट होत नाही. बऱ्याच लोकांना एकटेपणाची भीती वाटणं किंवा ती बोलून दाखवणं दुर्बलतेचं लक्षण वाटतं. म्हणून तर आजपर्यंत याकडे दुर्लक्ष होत आलं आहे. 
प्रा. कॅचिओप्पो यांनी केलेल्या संशोधनातून सिद्ध झालं आहे की, एकटेपणाच्या भावनांचा आपल्या शारीरिक क्षमतांवर विपरीत परिणाम होतो. खासकरून यामुळे तणाव वाढतो. स्ट्रेस हार्मोन ‘कोर्टिसोल’ची वृद्धी आणि रक्तपुरवठ्यात अडथळा आल्यामुळे ब्लडप्रेशरमध्ये वाढ होते व महत्त्वाच्या अवयवांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. एवढंच नाही तर एकटं असल्याची भावना पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीवरही परिणाम करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होण्याचा धोका संभवतो. मागच्या काही वर्षांपासून ‘एकटेपणा’चा केवळ सामाजिक व मानसशास्त्रीयरीत्या अभ्यास न करता वैद्यकीय दृष्टिकोनातूनही विचार केला जात आहे. याविषयी अधिक जागृती करण्याचा ते आग्रह करतात.
 
आपण एकटे आहोत का?
आज जरी आपल्याकडे ‘द सिल्वर लाइन हेल्पलाइन’सारख्या संस्था नाहीत याचा अर्थ असा नाही की आपण या समस्येपासून अलिप्त आहोत. भारतातही ही समस्या बळावतेय. महानगर आणि शहरी भागात एकटे राहणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक आहे. नोकरी, शिक्षण, गरज किंवा नाइलाज; कारण काहीही असो, कुटुंबापासून दूर राहणं फार कॉमन गोष्ट झाली आहे. एकांत आणि एकटेपणा यामध्ये गफलत करू नये. सतत लोकांच्या गरड्यात असतो, प्रत्यक्षात किंवा आॅनलाइन म्हणजे आपल्याला एकटेपणा वाटणार नाही असं नाही. 
तो वाटतोच. अनेकदा जास्त वाटतो.
त्यामुळे नाकारू नका की आपल्याला आतून एकेकटं वाटतं आहे.
तसं वाटत असेल तर बोला मित्रांशी, घरच्यांशी. गरज असेल तर डॉक्टरांची मदत घ्या. शरीराला होतात तसे मनालाही आजार होतात, आणि ते बरेही होतात यावर विश्वास ठेवा आणि आनंदानं जगण्याचा प्रयत्न करा!
तो आपला हक्कच आहे...
 
संवादाचं कॉलसेंटर
एकटेपणाची समस्या किती गंभीर रूप धारण करू शकते हे पाश्चिमात्य देशांकडे पाहून कळेल. इंग्लंडमध्ये एकाकी वृद्धांना कोणाशी तरी बोलता यावे, त्यांच्याशी कोणी तरी आपुलकीने बोलावे या उद्देशाने गेल्या तीन वर्षांपासून ‘द सिल्वर लाइन हेल्पलाइन’ हे कॉलसेंटर काम करीत आहे. इंग्लंडमध्ये एकटे असलेले वयोवृद्ध येथे कॉल करून स्वयंसेवकांशी बोलतात. एखाद्या रेसिपीपासून ते बालपणातील आठवणींपर्यंत सर्व काही बोलण्यासाठी लोक या हेल्पलाइनमध्ये फोन करतात. ३६५ दिवस आणि दिवसाचे चोवीस तास लोकांशी बोलण्यासाठी स्वयंसेवक उपलब्ध असतात.
पाच वर्षांपूर्वी २०११ च्या आॅगस्ट महिन्यात डेम इस्थर रँटझेन यांनी एकटेपणावर निबंध लिहिला होता. एकटे राहताना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, भावना, कंटाळा याविषयी त्यांनी लिहिले होते. त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. तीन महिन्यांनी जेव्हा त्यांना याविषयी बोलण्यासाठी एका परिषदेत बोलवले होते तेव्हा एकटेपणावर मात करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्याची कल्पना सुचली. यापूर्वी त्यांनी लहान मुलांच्या समस्यांसाठी १९८६ साली ‘चाइल्डलाइन’ या जगप्रसिद्ध हेल्पलाइनची मुहूर्तमेढ रोवली होती.
मग फेब्रुवारी २०१२ साली वृद्ध लोकांसाठी काम करणाऱ्या विविध सामाजिक संस्थांना आमंत्रित करून त्यांच्यासमोर ही संकल्पना मांडली. त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यावर इंग्लंडच्या आरोग्य विभागाकडून प्रायोगिक तत्त्वावर ५० हजार पौंडाची मदत करण्यात आली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर मग पुढच्या वर्षी पाच लाख पौंडाचे घसघशीत अनुदान देण्यात आले. आर्थिक मदतीमुळे त्यांना कामाचा आवाका वाढवणे शक्य झाले. जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचे बळ मिळाले.
स्थापन झाल्यापासून आतापर्यंत दहा लाखांपेक्षा जास्त कॉल्स या हेल्पलाइनमध्ये आले आहेत. त्यांपैकी सुमारे ५३ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांच्याशी बोलायला अक्षरश: कोणीच नाही. हेल्पलाइनमधील स्वयंसेवक दर आठवड्याला दहा हजारांपेक्षा जास्त कॉल्स अटेंड करतात. लोकांना वैद्यकीय सेवांबरोबरच इतर गरजेची माहितीसुद्धा पुरवतात.
एक साधा फोन कॉल, दोन प्रेमळ शब्द आयुष्यात नवी ऊर्जा भरतात.
 
(मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत सहायक उपसंपादक आहे.)

Web Title: If you are not alone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.