जगा पोटभर....आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 02:00 AM2017-10-19T02:00:00+5:302017-10-19T02:00:00+5:30
आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोषण होणार? आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया? आणि जिंकणार कशा?
You don't need a silver fork to eat good food."
हे वाक्य वाचून कुणाला तरी पटकन वाटेल की, काय हे यांना खायचं येऊन पडलंय. प्रेरणादायी विचारांच्या रांगेत खाणंपिणं कुठं येतं का?
- येतं!
आणि हेच आपल्याला कळत नाही, आणि आपलं दिवसाचं गणित दिवसेंदिवस बिघडत जातं.
आपलं स्वत:वर नसतंच प्रेम. पण खाण्यावरही नसतं आणि भुकेवरही!
पोटात भुकेचा यज्ञ भडभडून पेटलेला असताना आपण त्यात आहुती कसली देतो?
चहाची.
कुरकुरे, वेफर्स किंवा वडापावची!
आणि त्यानं भूक तर भागत नाहीच, पोट बिघडतं आणि त्याच्या रेट्यानं मनही भिरभिरायला लागतं हे आपल्या लक्षातही येत नाही..
आणि जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपल्या शरीरानं आपल्याशी असहकार पुकारलेला असतो..
शरीराचे अनेक विकार हे पोट साफ नसल्यानं होतात..
आणि पोट साफ होत नाही कारण अनेकदा आपण खातच नाही किंवा योग्य पदार्थ, योग्य प्रमाणात, योग्यवेळी, नियमित खात नाही..
एक साधं उदाहरण घ्या..
आपण सकाळी उशिरा उठतो, कसंबसं आवरतो, घोटभर चहा पितो आणि जातो कॉलेजला..
पोट रिकामंच...
मग चिडचिड होते. वर्गात लक्ष लागत नाही. भांडणं होतात.. मूड जातो. उदास वाटतो..
याला कारण काय तर नास्ता न करणं..
त्यानं रक्तातली साखर कमी होते आणि आपला मूड बिघडतंच जातो..
पोटभर नास्ता करून, मस्त शांतचित्तानं कॉलेजला जा..
तो दिवस वेगळा वाटेल..
गोष्टी छोट्याच असतात. पण आपण त्या कॉम्प्लिकेट करतो..
बिघडवून टाकतो..
आणि मग त्याचा टोल आपल्या शरीराला भरावा लागतो..
भुके पेट भजन नहीं होता,
ते सैन्य पायावर नाही, पोटावर चालतं
या वाक्यापासूनची फिलॉसॉफी समजून घ्या. आणि मग स्वत:ला विचारा की, आपण काय खातोय..
आपल्याला आउटडेटेड वाटते आपली पारंपरिक बाजरीची, ज्वारीची, कळण्याची नि नागलीची भाकरी..
नको वाटतात पातळ पालेभाज्या, डाळीसाळी, उसळींचं तर वावडंच..
कोशिंबिरी आणि आमट्या तर फारच मागास..
जे पदार्थ आईनं मायेनं शिजवले, त्या पदार्थात आपण शंभर चुका काढतो आणि म्हणतो हे काय जुनाट करता तुम्ही..
मग आपण निवडतो काय?
पॅक्ड फूड. प्रोसेस्ड फूड. दोन मिन्टात तयार होणारं जंक फूड.
रात्रीची पोळी आपल्याला शिळी वाटते आणि सहा सहा महिने पॅक्ड करून ठेवलेलं अन्न चटकदार लागतं, यात किती विरोधाभास आहे?
एरव्ही जिथंतिथं लॉजिक शोधतो आपण?
आणि उसळी, शेवगा आणि सोयाबीन नाकारत प्रोटीन पावडरचे भपके मारतो..
विचार करून पहा.
नक्की चुकतंय कुठं आपलं?
आपल्या शरीराचंच भरणपोषण नसेल तर आपल्या मनाचं काय पोेषण होणार?
आणि कशा लढणार आपण स्वत:साठी निवडलेल्या लढाया?
आणि जिंकणार कशा?
या दिवाळीत घरच्या फराळावर मस्त ताव मारा..
खा बिनधास्त चकल्या-करंज्या आणि जगा पोटभर..
उगीच कशाला करायची स्वत:ची उपासमार?
नाही का..