...तर गांधीविचार वाचायला हवाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 02:00 PM2017-10-04T14:00:30+5:302017-10-05T08:53:19+5:30

गांधी गांधीजींनी आयुष्यभर प्रयोग केले, पुस्तकं लिहिली, विचार मांडले. ते समजून घ्यायचं तर गांधीविचार वाचायला हवाच..

If you want to read Gandhi ... | ...तर गांधीविचार वाचायला हवाच

...तर गांधीविचार वाचायला हवाच

googlenewsNext

मोहनदास करमचंद गांधी. महात्मा गांधी. भारतात नाही तर जगभरात ज्या माणसाची चर्चा होते, ज्याच्या विचारांची चर्चा होते, प्रसंगी प्रचंड टीकाही होते, आणि गांधीविचाराला पर्याय नाही म्हणत तो विचार वंदनीय होतो असा हा माणूस. गांधीजी स्वत: आयुष्यभर विचार तपासून पाहत आले. काही ना काही प्रयोग करत गेले. त्या प्रयोगांमधून शिकत गेले. आणि त्यांना तेव्हा जी गोष्ट जाणवली, भावली ती त्यांनी लिहून ठेवली. त्यांचं आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ यामध्ये ते सुरुवातीलाच म्हणतात, ‘की जर माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला तफावत वाटली तर नंतर केलेलं विधान कायम खरं माना!’ कारण त्यांनाही हे माहीत होतं की माणूस जसजसा मोठा होतो तसतसा त्याच्या विचारांमध्ये फरक होत असतो, नव्हे तो व्हायलाच हवा. नाहीतर माणूस कधीच शिकणार नाही.
गांधीजींनी त्यांच्या आयुष्यात प्रचंड लिहिलं. मूलभूत विषयांवर त्यांची पुस्तकं तर आहेतच; पण त्यांनी अनेक वर्षं हरिजन, इंडियन ओपिनियन आणि यंग इंडिया या वृत्तपत्र आणि मासिकांचं संपादनही केलं. त्याबरोबरच ते अनेकांना सतत पत्र लिहित असत. त्यांनी हिटलर, चर्चिल आणि आईनस्टाईन यांना लिहिलेली पत्रं खूपच गाजली आहेत. ही सर्व पत्रं आपण ‘कलेक्टेड वर्क्स आॅफ महात्मा गांधी’ म्हणजेच ‘महात्मा गांधी यांचे समग्र साहित्य’ या खंडांमध्ये पाहू शकता. ही एकूण ९७ खंडांची मालिका म्हणजे गांधीजींच्या संपूर्ण साहित्याचं एकत्रित स्वरूप आहे. यामध्ये पत्र, लेख आणि त्यांनी दिलेली भाषणं हे सर्व काही आहे. भारत सरकारने प्रकाशित केलेले हे ग्रंथ आपण गांधी सर्व्ह फाउंडेशनच्या संकेतस्थळावर पाहू शकतो. कोणताही एक खंड उघडा, तेव्हाच्या इतिहासाने तुम्हाला खिळवून ठेवलं नाही तर सांगा!
या समग्र साहित्याबरोबर आणखी एक महत्त्वाचं संकेतस्थळ म्हणजे सर्वोदय मंडळ आणि गांधी रिसर्च फाउंडेशनने गांधीविचारांवर काम करणाºया अनेक संस्थांच्या साहाय्याने तयार केलेलं संकेतस्थळ. या संकेतस्थळावर गांधीजींवर लिहिल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाचा संदर्भ आपल्याला सापडेल असा दावा या संकेतस्थळाचे संपादक करतात. गांधीजींनी आत्मचरित्र तर लिहिलंच पण त्याचबरोबर ‘हिंद स्वराज्य’ नावाचं एक पुस्तकही लिहिलं. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर अनेक वर्षं ब्रिटिश सरकारने त्यावर बंदी घातली होती. पुस्तकामध्ये गांधीजींचा ब्रिटिश संस्कृतीला का विरोध आहे हे सांगितलेलं आहे. इथं गांधींजींचं आत्मचरित्र, त्याबरोबरच गांधीजींनी लिहिलेली सर्व पुस्तकं आपल्याला इथं वाचायला मिळतील. त्यांचं ग्रामस्वराज्याबद्दलचे विचार, अहिंसेची कल्पना, शिक्षणाबद्दलचे विचार, शाकाहार आणि एकूणच खाद्यसंस्कृतीबद्दलचे विचार आपल्याला इथे वाचायला मिळतील. या पुस्तकांबरोबरच गांधीजींवर लिहिली गेलेली पुस्तकेही आपल्याला इथे बघायला मिळतील. जर एखाद्याला गांधीजींच्या आयुष्यातल्या कोणत्याही संदर्भाबद्दल अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे संकेतस्थळ बघायला हवं.
नुकतीच आपण गांधी जयंती साजरी केली. निदान त्यानिमित्त त्यांनी लिहिलेलं किमान एकतरी पुस्तक नक्की वाचायला, त्यांच्यावरची ही फिल्म बघायला हवी.
एक महत्त्वाचा विचार आपल्याला त्यातून कळेल.
त्यासाठी वाचा-

गांधीजींची पुस्तकं- http://www.mkgandhi.org/

गांधीजींचं समग्र साहित्य-http://gandhiserve.org/e/cwmg/cwmg.htm

अ‍ॅटनबरोंचा गांधी
जे चित्रपट रसिक असतील किंवा ज्यांना गांधीजींच्या आयुष्याबद्दल किंवा एकूणच इतिहासाबद्दल वाचत बसायला कंटाळा येतो त्यांनी रिचर्ड अ‍ॅटेनबरो यांचा ‘गांधी’ हा चित्रपट नक्की म्हणजे पाहा. १९८२ साली प्रकाशित झालेल्या चित्रपटाला तब्बल आठ आॅस्कर पारितोषिके आणि तीन नामांकने मिळाली आहेत. बेन किंग्जले यांनी ‘गांधी’ म्हणून चोख भूमिका बजावली आहे. यामध्ये भारतीय कलाकारांनीही उत्तम कामे केली आहेत. रोशन सेठ यांनी नेहरूंची, त्याचबरोबर अमरीश पुरी, ओम पुरी, श्रीराम लागू आणि रोहिणी हट्टंगडी यांनी अप्रतिम भूमिका बजावल्या आहेत. या दिग्गजांबरोबर सुप्रिया पाठक आणि नीना गुप्ता यांच्या छोट्या भूमिकाही यात आहेत. या चित्रपटात आपल्याला ठळकपणे पाहायला मिळतं की गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेतलं काम हे गांधीजींच्या पुढील आयुष्याचा पाया आहे. तेव्हा टॉल्स्टॉय या विचारवंताने गांधींना कसे भारावले होते आणि त्यातून निर्माण झालेले ‘टॉल्स्टॉय फार्म’ याचंही सुंदर चित्रीकरण इथं पाहायला मिळेल.
नक्की पाहा यूट्यूबवर
  https://www.youtube.com/watch?v=XyWRx_2MFbk

Web Title: If you want to read Gandhi ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.