IL ML हे प्रकरण नेमकं आहे काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2017 06:11 PM2017-07-28T18:11:19+5:302017-07-28T18:38:14+5:30
आहे ती नोकरी टिकेल की नाही, पगारवाढ मिळेल की नाही, सध्याची नोकरी सोडली तर नवीन मिळेल की नाही याविषयी जगभरातल्या कर्मचा-यांमध्ये अस्वस्थता आहे.
- मयुर पाठाडे
आहे ती नोकरी टिकेल की नाही,
पगारवाढ मिळेल की नाही,
सध्याची नोकरी सोडली तर
नवीन मिळेल की नाही
याविषयी जगभरातल्या
कर्मचा-यांमध्ये अस्वस्थता आहे.
आणि दुसरीकडे कंपन्या म्हणतात की,
नोक-या आहेत, पण ‘लायक’
मनुष्यबळच मिळत नाही.
या कंपन्यांना नेमकं
हवंय काय?
नोक-या नाहीत, असल्या तर धड नाहीत, चांगली पगारवाढ नाही, काहींना तर कित्येक वर्षांत पगारवाढच मिळालेली नाही. नोकरी सोडून दुसरीकडेही जाता येत नाही. कारण आहे ती नोकरी टिकवली नाही, तर पुन्हा कमी पगाराची का होईना, दुसरी नोकरी मिळेलच याची काहीच गॅरन्टी नाही. आपण नोकरीवर राहू की नाही, याची कायम डोक्यावर टांगती तलवार. कंपनीतली अगोदरची माणसं झपाट्यानं कमी होताहेत, त्यांच्या जागेवर दुसरा कोणी तर येत नाहीच, पण त्याचं कामही आपल्याच बोडक्यावर येऊन पडतंय. पूर्वीच्या तुलनेत कामाचे तास आणि टेन्शन किती तरी वाढलंय, तरी हाती मात्र काहीच पडत नाही...
खासगी क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचाºयांची सध्या हीच स्थिती आहे. फक्त आपल्याकडे भारतातच नव्हे, अख्ख्या जगभर. नोकरीवरची माणसं झपाट्यानं कमी होताहेत. कमी केली जाताहेत. त्यामुळे सगळीकडे बहुसंख्य कर्मचाºयांची अशीच रडारड सुरू आहे. बेरोजगारांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेच आहे आणि त्यांना नोकरीसाठी दारात उभं करायलाही कोणीच तयार नाही..
पण याच्या उलट कंपन्यांचं मात्र म्हणणं आहे की, आमच्याकडे भरपूर जागा खाली आहेत, पण योग्य उमेदवारच आम्हाला मिळत नाहीत. आपल्याकडे आहेत ते चांगलं मनुष्यबळ टिकावं म्हणून काही व्यवस्थापनं प्रयत्न करताहेत. त्यांना साºया सुविधा देताहेत. तरीही हे कर्मचारी त्यांच्याकडे टिकायला तयार नाहीत. दुसरी कंपनी तर त्यांना घेण्यासाठी टपूनच बसलेली असते. या त्यांच्यांसाठी ते पायघड्याच टाकून बसलेले असतात.
हो, पण कोणत्या उमेदवारांसाठी?
तुम्ही जर तुमचं तेच घिसंपिटं, पारंपरिक शिक्षण घेतलेलं असेल, जे आता आउटडेटेड झालेलं आहे, ज्याची आता काही गरजच राहिलेली नाही, तोच बायोडाटा घेऊन जर तुम्ही कंपन्यांच्या दारात उभं राहिलात तर ते तुमच्या स्वागताला का आणि कसे उभे राहतील? तंत्रज्ञानानं जे काम खूपच झटपट आणि अत्यंत अचूकपणे होणार असेल तर वर्षानुवर्षं तुम्हाला पोसण्यात कोणत्या कंपनीला रस असणार? ते बळजबरीनं तुमच्या हातात पिंक स्लिप कोंबून तुम्हाला घरी पाठवणारच.
कंपन्यांना आता कोणते, कशा प्रकारचे कर्मचारी हवे आहेत, यासंदर्भातली एक खूप मोठ्ठी पाहणी नुकतीच करण्यात आली. (ढअरअ) केलेल्या या पाहणीचे निष्कर्ष अत्यंत रंजक आहेत.
या कंपन्यांना कुठलंही पारंपरिक ज्ञान आता नकोय. त्यासाठी तुमच्यापेक्षा लाख पटीनं चांगलं काम होऊ शकेल असं तंत्रज्ञान त्यांच्याकडे आहे. शिवाय ते एकदा घेतलं की झालं. आयुष्यभर त्यासाठी त्यांना मनुष्यबळाची गरज लागणार नाही. पण नोकरी नाही म्हणून किंवा हातातली नोकरी गेली म्हणून रडत बसण्यापेक्षा ज्या गोेष्टींची कंपन्यांना गरज आहे, तेच आपण त्यांना दिलं आणि काळाच्या बरोबर राहिलं तर ते आपल्यासाठीही पायघड्या टाकतील.
पण मग कंपन्यांना नेमकं हवं आहे तरी काय?
एकीकडे नोकरी नाही किंवा आहे ती नोकरी गेली म्हणून आपण रडतोय, तर दुसरीकडे हवे ते, त्यांना पाहिजे त्या कॅलिबरचे कर्मचारी मिळत नाहीत म्हणून कंपन्याही रडताहेत. त्यांना कोणी लायक उमेदवारच मिळत नाहीत. पण लायक म्हणजे काय? कसे उमेदवार या कंपन्यांना आवश्यक आहेत?
कंपन्यांना कोणते कर्मचारी हवेत?
१. बेसिक, प्रायमरी लेव्हलचं काम करण्यासाठी कंपन्यांना पायलीला पन्नास लोकं मिळतात, पण त्यांना हव्या असलेल्या स्किल्ड जॉबसाठी त्यांच्याकडे माणसंच नाहीत.
२. या स्किल्ड वर्कर्सचा त्यांच्याकडे इतका तुटवडा आहे की, त्यांच्या आवश्यकतेच्या केवळ तीस टक्केच असे कर्मचारी त्यांच्याकडे आहेत.
३. कर्मचाºयांना हवे आहेत आर्टिफिशिअल लर्निंग (आयएल) आणि मशीन लर्निंगमध्ये (एमएल) एक्स्पर्ट असणारे अनुभवी तंत्रज्ञ. पण ते त्यांना मिळतच नाहीत.
४. त्या पद्धतीचं शिक्षणही कुठल्याच विद्यापीठात दिलं जात नाही, ही त्यांची आणि विद्यार्थ्यांचीही सर्वात मोठी अडचण आहे.
५. त्या रिक्त जागांसाठी जाहिरात दिल्यानंतर जवळपास पंचवीस जणांपैकी केवळ एखादाच जण असा असतो, जो त्यांना उपयोगी पडू शकेल.
६. त्यामुळे अनेक कंपन्यांनी आता अशा व्यक्तींची परदेशातून आयात करायला सुरुवात केली आहे.
७. यासदंर्भात जो नुकताच एक मोठ्ठा सर्व्हे करण्यात आला, त्यात जवळपास दोन लाख कंपन्यांची पाहणी करण्यात आली. पण या साºयांनाच कर्मचारी हवे होते आणि त्यासाठी चांगली गलेलठ्ठ रक्कम मोजायलाही ते तयार होते.
८. ज्यांच्याकडे हे टॅलंट असलेले कर्मचारी आहेत, त्या कंपन्या अशा कर्मचाºयांना तळहातावरच्या फोडासारख्या जपताहेत. तरीही हे कर्मचारी सोडून गेल्यावर त्यांच्या कंपनी रॅँक स्कोअरवर तर परिणाम होत आहेच, पण त्यांच्या अडचणी अजूनच वाढताहेत.
९. येत्या काही काळात आर्टिफिशिअल आणि मशीन लर्निंगचं ज्ञान असलेले कर्मचारी आम्हाला मिळतील आणि आमचं गाडं पुढे सरकेल या आशेवर या कंपन्या आहेत...
१०. त्यामुळे तरुण वर्गासाठीही ही उत्तम संधी आहे, पण त्यासाठी त्यांना हवं असलेलं नॉलेज तुमच्याकडे हवं ही मुख्य अट आहे. त्यांना मायक्रो चिप हवी असताना तुम्ही भलीमोठी पिशवी घेऊन गेलात तर त्यांनी कसं तुम्हाला दारात उभं करावं?