मै मलाला..!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 09:18 AM2018-04-12T09:18:32+5:302018-04-12T09:18:32+5:30
नोबेल पुरस्कार मिळाला, घरी परत येता आलं म्हणून संघर्ष संपला असं कुठं आहे..?
- प्रज्ञा शिदोरे
मी मलाला...!
२७ नोव्हेंबर २०१२ रोजी पाकिस्तानमधली १७ वर्षांची आयेशा मीर शाळेत गेली नाही. ती दिवसभर पलंगावर एका कोपऱ्यात बसून होती. काय करावं, कोणावर विश्वास ठेवावा तिला काहीच समजत नव्हतं. झालं असं होतं, त्या दिवशी सकाळी सुरक्षारक्षकांना तिच्या स्कूलबसच्या खाली बॉम्ब सापडला होता. तो बॉम्ब तिच्यासाठी नसून तिचे वडील हमीद मीर यांच्यासाठी होता. हमीद मीर दूरचित्रवाणीवर अँकर होते आणि बºयाच वेळा ते त्यांच्या कार्यक्र मातून तालिबानच्या विरोधात भाष्य करायचे. आयेशाला या सगळ्याच प्रकारचा प्रचंड राग येत होता. दिवसभर ती कोणाशीही बोलली नव्हती. रात्री साडेदहाच्या सुमारास वडील घरी आल्यावर त्यांनी तिला तिच्यासाठी एक फोन असल्याचं सांगितलं. फोनवरचा तो आवाज आयेशाच्या ओळखीचा होता. अनेक भाषणांमधून तिनं हा आवाज पूर्वी ऐकला होता. आयेशासारख्याच अनेक पाकिस्तानी मुलींना आशा दाखवणारा, धीर देणारा, बळ देणारा असा हा आवाज होता. मै मलाला. - पलीकडची मुलगी म्हणाली. मलाला युसूफझाई इंग्लंडमधील बर्मिंगहॅममधल्या एका इस्पितळातून बोलत होती. तिच्यावर उपचार सुरू होते. ‘आज जे झालं ते व्हायला नको होतं, मला माहीत आहे आजच्या या प्रकरणाचा तुला त्रास झाला असणार. पण, तू असा धीर सोडू नको.’ ती सांगत होती.
मलाला युसूफझाई अशा अनेक लढाया स्वत: लढली आहे. झैउद्दीन युसूफझाई यांनी १७ वर्षांपूर्वी मुलींच्या शिक्षणाला बढावा देण्यासाठी आणि मुलींमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावेत म्हणून ‘खुशहाल’ नावाची मुलींसाठी शाळा सुरू केली. २००८ मध्ये स्वात प्रांतामध्ये तालिबानचा अंमल वाढू लागला होता. तेव्हा या सगळ्यांविरु द्ध आवाज उठवण्यासाठी झैउद्दीन आपल्या ११ वर्षीय मुलीला पेशावरमध्ये राष्ट्रीय प्रसारमाध्यमांसमोर घेऊन गेले. तिथे तिने ‘हाऊ डेयर तालिबान टेक्स अवे माय राइट टू एज्युकेशन?’ या नावाचं भाषण दिलं. हे भाषण अनेकांना आवडलं-भावलं.
अर्थात, ९ आॅक्टोबर २०१२ रोजी मलालावर हल्ला झाला. मेंदूला मोठी इजा झाली होती. २०१३ साली मलालाने क्रिस्टिना लॅम्ब या लेखिकेच्या मदतीने तिच्या अनुभवांवर ‘आय एम मलाला’ हे पुस्तक लिहिले. अर्थात लगेचच पाकिस्तानमध्ये हे पुस्तक बॅन करण्यात आलं. तिथल्या अनेकांना तिच्या कामाची कदर वाटत असली तरी, या पुस्तकामुळे ती पाश्चिमात्य देशांची हस्तक वाटायला लागली आहे, असं त्याचं म्हणणं होतं. हा विषय मुळातून कळण्यासाठी आपण हे पुस्तक वाचणं महत्त्वाचं आहे. आणि तिनं नोबेल पारितोषिक स्वीकारताना दिलेलं भाषणही यूट्युबवर पाहण्यासारखं आहे..
https://www.youtube.com/watch?v=MOqIotJrFVM
pradnya.shidore@gmail.com