घुसमट... शिक्षणासाठी वणवण करताना आलेला एक अस्वस्थ अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 02:38 PM2018-01-24T14:38:57+5:302018-01-25T09:05:09+5:30
शिक्षणासाठी वणवण करताना आलेला एक अस्वस्थ अनुभव
- माधुरी पेठकर
मुलाखत आणि शब्दांकन
शिकायचं तर पैसा नाही, आपली गुणवत्ता हीच आपली ताकद याची जाणीव अगदी लहानपणीच झालेला भारतभूषण पंडित. सध्याही दिवसातला निम्मावेळ तो विद्यार्थी असतो आणि निम्मावेळ शिक्षक. जेनेटिक्स विषयात त्यानं एमएससी केलंय आणि गेल्या पाच वर्षांपासून तो ‘डाळिंब पिकावरील तेल्या रोग्यावर नियंत्रण’ या विषयावर संशोधन करतोय. त्याला यूजीसीनं पीएच.डी.साठी दिलेला सहा वर्षांचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. त्यामुळे किमान यावर्षी तरी पीएच.डी.चं काम पूर्ण झालं तर नोकरीत कायम व्हायला मदत होईल या अपेक्षेनं तो धडपड करतो आहे.
गुणवत्ता आणि इच्छा असूनही केवळ आर्थिक सहाय्य नाही या कारणानं संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात नाउमेद होण्याचा, मागे राहण्याचा अनुभव आपल्यासारख्या हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना नाउमेद करतो याची त्याला खंत आहे. तो म्हणतो, समाजाच्या लेखी शिक्षणातली अडचण ही प्राथमिक शिक्षणापर्यंतच सीमित राहिली आहे. शाळाप्रवेश, शालेय साहित्य खरेदी, येण्या-जाण्याच्या समस्या, वाचनलेखन अडथळे म्हणजे फक्त शैक्षणिक अडचणी नसतात. उच्चशिक्षण घेतानाही विद्यार्थ्यांपुढे अनंत अडचणी असतात. केवळ पुरेशा अर्थपुरवठ्याअभावी गुणवंत विद्यार्थ्यांना जे ठरवलं त्यापेक्षा वेगळं करावं लागतं किंवा जे ठरवलं आहे ते करण्यासाठी खस्ता खाव्या लागतात. हे बदललं पाहिजे.!’
भाजीपाला आणि फळं विकून कमावलेल्या पैशातून त्यानं आजवर शिक्षण सावरलं. अर्धवेळ नोकरी सुरू केली. अवघ्या काही गुणांनी त्याची फेलोशिप हुकली. तो सांगतो, ‘आडनावाच्या, जातीच्या विशिष्ट चष्म्यातूनच समाज प्रत्येकाकडे पाहतो. यामुळेही गरजवंताची गरजच कोणाला लक्षात येत नाही. दुसरं कारण म्हणजे शिष्यवृत्ती मिळण्यातल्या, योग्यवेळी मिळण्यातल्या अडचणी. त्याचे नियम. त्यामुळे पोटाला चिमटा देत, हजारो खटाटोपी करत अभ्यासासाठी तडफड करावी लागते. अनेकदा तर ज्यांना शिष्यवृत्ती मिळते ते त्याचा वापर भलत्याच गोष्टींसाठी करतात, हे पाहून जीव अजून तळमळतो. व्यवस्थेत चालणाºया चिरीमिरी व्यवहारांचे फटकेही बसतात. हे सारं मला समाजासमोर मांडायचं होतं.’
ते त्यानं मांडलं एका शॉर्ट फिल्मद्वारे. तिचं नाव घुसमट. एकट्यानं ओरडून, पोटतिडकीनं मांडून समाज, व्यवस्था बदलत नाही हे माहीत असूनही मनातलं पोहचविण्याची जिद्द मला शांत बसू देत नव्हती. म्हणून हे माध्यम मला फार महत्त्वाचं वाटतं असं भारतभूषण सांगतो. आर्थिक चणचण होतीच; पण औरंगाबादमधल्य त्याच्या चार- दोन मित्रांनी साथ दिली. कलाकारांसकट कॅमेरा चालवणाºयांपर्यंत सगळ्यांनी फुकट कामं केली. फक्त कॅमेरा भाड्याचा असल्यानं त्याचे पैसे द्यावे लागले. पण कॅमेरा चार्जेसही कमी व्हावेत म्हणून ४२ तासात सगळं शूट संपवलं.
त्यातून साडेपंधरा मिनिटांची ही फिल्म तयार झाली. अनेक स्थानिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये ही शॉर्ट फिल्म दाखवली गेली. तिचं कौतुक होत आहे. भारतभूषण म्हणतो, ‘प्रत्येक कॉलेज कॅम्पसमध्ये या घुसमटीत जगणारे अनेकजण असतात. त्यांची कथा मी मांडली याचं समाधान आहे.’
ही फिल्म पाहा, आपलंच जगणं जेव्हा कुणी सांगतं तेव्हा ते कसं भिडतं याचा हा अनुभव आहे.
घुसमट फिल्म पाहण्यासाठी ही लिंक..
https://drive.google.com/file/d/0B7Az28kp4349WjNSNERLSEI2Wjg/view