भारतीय टेनिसचा ‘आखाडा’
By admin | Published: April 8, 2017 06:46 PM2017-04-08T18:46:43+5:302017-04-08T18:46:43+5:30
लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं.
लिएंडर पेस आणि महेश भूपती या दोन महान खेळाडूंनी टेनिसला नुसता सुवर्णकाळच मिळवून दिला नाही, तर देशाची पताका सातासमुद्रापार फडकवताना देशाचंही नाव रोशन केलं.
या दोघांच्या जोडीनं अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांत, ग्रॅँड स्लॅम स्पर्धांत विजेतेपद मिळवून टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला.
कालांतरानं दोघांमध्ये मतभेद झाले. दोघंही वेगळे झाले, तेव्हापासून टेनिसच्या क्षीतिजावरचा भारतीय सूर्यही आपलं तेजोवलय गमावून बसला. जोपर्यंत हे दोघं एकत्रित खेळत होते, त्यांच्यातला समन्वय कायम होता, तोपर्यंत ते मैदानावर खेळत असताना त्यांच्याकडून पदकांची अपेक्षा कायम केली जायची, पण हे एक आता स्वप्नच राहिलं आहे.
हे दोघं खेळाडू नुसते विभक्तच झाले नाहीत, तर आपापला आपापला अहंकार कायम ठेवून दुसऱ्याला कायम खाली पाहायला लावण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. त्याचंच एक मूर्तिमंत रुप म्हणजे आताच्या डेव्हिस कपदरम्यान पेस आणि भूपती यांच्यात पुन्हा नव्यानं उफाळून आलेला वाद.
उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेसाठी न खेळणारा भारतीय कर्णधार महेश भूपतीनं लिएंडर पेसला संघातून डच्चू दिल्यानंतर आणखी एका नव्याला वादाला फोडणी मिळाली आहे आणि त्यांच्यातली खडाजंगी पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे. डेव्हिस चषकात गेल्या सलग २७ वर्षांपासून पेस खेळत आहे. हा एक विक्रम आहे. या विक्रमाला पहिल्यांदाच ब्रेक लागला.
खरं तर या दोघाही खेळाडूंनी भारतीय टेनिसला केवळ एका नव्या उंचीवरच नेऊन पोहोचवलं नाही, तर अनेक नव्या खेळाडूंसमोर आदर्श ठेवताना त्यांना टेनिस कोर्टवर आणण्यासाठी प्रेरितही केलं, पण दिवसेंदिवस ‘शाळकरी’ होत जाणाऱ्या त्यांच्यातील वादालाही आता ब्रेक लागायला हवा.
या दोघांनी एकत्र यावं, एकत्रितपणे खेळावं यासाठी गेल्या काही वर्षांत खूप प्रयत्न झाले. बऱ्याच मनधरणीनंतर ्रकाही वेळा ते यशस्वीही झाले, पण दुभंगलेल्या मनांनी खेळताना मैदानावरची त्यांची कामगिरी फारशी उंचावली नाही हेही खरं.
आतापर्यंत दोन्हीही खेळाडूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली आहे, पण हे करीत असताना आपण आपल्या देशाचंही नाव बदनाम करीत आहोत, नव्या खेळाडूंसमोर चुकीचा पायंडा पाडत आहोत, याचंही भान त्यांना राहिलं नाही. दोघांनीही वारंवार अश्लाघ्य भाषेत एकमेकांवर वार करताना एकमेकांना पाण्यात पाहण्याचाच प्रकार केला. हे कधी थांबणार?
हे दोन्हीही खेळाडू अजूनही मैदानावर खेळत असले तरी, त्यांचं वय पाहता त्यांचा सुवर्णकाळ आता संपलेला आहे यात काहीच शंका नाही.
यात कोण बरोबर, कोण चूक.. याच्या मुळात जाऊ नये आणि तसा प्रयत्न करण्यातही आता काही अर्थ नाही, पण ज्या खेळाडूंनी भारतीय टेनिसला सुवर्णयुग दाखवलं, तेच आज आपापल्या अहंकारापायी स्वत:ची उंची कमी करताहेत. आपल्या वागणुकीतून एक नकारात्मक उदाहरण तरुणांसमोर ठेवताहेत. यातून खेळाचीही प्रतिमा मलीन होत आहे, निदान याची तरी काळजी या दिग्गजांनी घ्यावी आणि रस्त्यावरचं घोडामैदान आता तरी बंद करायला हवं.तेवढी सूज्ञता ते आता तरी दाखवतील का?- प्रश्नच आहे..
- प्रतिनिधी