अमेरिकेत प्रवेशासाठी भारतीय तरुणांना शोधावे लागेल ‘नवे कौशल्य’
By admin | Published: April 5, 2017 06:29 PM2017-04-05T18:29:05+5:302017-04-05T18:29:05+5:30
ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हिसाचे नियम कडक केले आणि अमेरिकावारीसाठी इच्छुक असणऱ्या तरुण-तरुणींबरोबरच अनेक भारतीय आयटी कंपन्यांच्याही पोटात गोळा आला आहे.
ट्रम्प प्रशासनानं एच वन बी व्हिसाचे नियम कडक केले आणि अमेरिकावारीसाठी इच्छुक असणऱ्या तरुण-तरुणींबरोबरच अनेक भारतीय आयटी कंपन्यांच्याही पोटात गोळा आला आहे. नवीन नियमांतली एक प्रमुख अट आहे ती म्हणजे आता कोणत्याही कॉम्प्यटर प्रोग्रामरला एच वन बी व्हिसा मिळणार नाही. मुख्यत: आपापल्या क्षेत्रात ‘स्पेशलिस्ट’ असणाऱ्यांना आणि ज्या स्पेशालिस्ट्सची अमेरिकेत कमतरता आहे, अशांना मुख्यत: एच वन बी व्हिसा दिला जातो. त्यात कॉम्प्युटर प्रोग्रामर्सचाही समावेश होता. गेल्या १७ वर्षापासून याच नियमानुसार अमेरिकेत हजारो तरुणांनी एच वन बी व्हिसावर प्रवेश मिळवला. मात्र आता अमेरिकेत जायचं असेल तर नुसतं कॉम्युटर प्रोग्रामर असून भागणार नाही. त्यासाठी काहीतरी नवं स्किल तरुणांना शोधावं लागणार आहे. अमेरिकेत एच वन बी व्हिसाचा सर्वसाधारण कोटा आहे ६५ हजार. त्यातील जवळपास ७० टक्के कोटा भारतीय तरुण वापरतात. एच वन बी व्हिसा मिळाल्यानंतर सहा वर्षे अमेरिकेत राहता येतं. त्यानंतर त्याला मुदतवाढही दिली जाते. अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्याचा परवाना म्हणूनही एच वन बी व्हिसाकडे मुख्यत: पाहिलं जातं. अमेरिकन नागरिक बनण्याच्या भारतीय तरुणांच्या या स्वप्नावर त्यामुळे पाणी पडणार आहे. भारताच्या तुलनेत इतर देशातील तरुणांचा एच वन बी व्हिसावरील अमेरिकन प्रवेश मात्र अगदीच नगण्य आहे. * एच वन बी व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्यांची टक्केवारी - २०१४च्या आकडेवारीनुसार चीन ८.४ टक्के, कॅनडा २.२, फिलिपाईन्स १.६, दक्षिण कोरिया १.४, इंग्लंड १, मेक्सिको ०.९, तैवान ०.८, फ्रान्स ०.७ आणि जपान ०.६ टक्के इतकं हे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे सर्वाधिक फटका बसणार आहे तो भारतीयांना. एच वन बी व्हिसाच्या संदर्भात काही महत्त्वपूर्ण माहिती- * एच वन बी व्हिसाचा खर्च किती? - एच वन बी व्हिसा मुख्यत: त्या त्या कंपन्यांतर्फे फाईल केला जातो. त्यासाठीचा खर्च आहे साधारणपणे १५७० ते ३०७५ डॉलर्स. * दरवर्षी किती एच वन बी व्हिसा दिले जातात? - साधारणपणे दरवर्षी ६५ हजार एच वन बी व्हिसा दिले जातात. २०१५ मध्ये ज्या कंपन्यांनी सर्वाधिक कर्मचाऱ्यांना एच वन बी व्हिसावर अमेरिकेत प्रवेश मिळवून दिला होता त्यात कॉग्निझन्ट, इन्फोसिस, टीसीएस, अॅक्सेन्च्युअर, एचसीएल, मार्इंड ट्री आणि विप्रो या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. * भारतीय आयटी कंपन्यांना सर्वाधिक फटका का बसेल? - एका अंदाजानुसार दरवर्षी भारतीय आयटी कंपन्या जवळपास १६० अब्ज डॉलर्स कमाई निव्वळ एच वन बी व्हिसावर अमेरिकेत पाठवलेल्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करतात. त्यांच्या कमाईतील ६५ टक्के हिस्सा हा अमेरिकन क्लायंट्सच्या माध्यमातून मिळतो. * एच वन बी व्हिसावर अमेरिकेत गेलेल्यांच्या जोडीदारांवर नव्या नियमांचा काय परिणाम होईल? - एच वन बी व्हिसावर अमेरिकेत काम करीत असलेल्यांचे जोडीदार एच फोर व्हिसावर अमेरिकेत राहू शकतील. मात्र या व्हिसाची मुख्य अट होती, ती म्हणजे, तुम्ही अमेरिकेत राहू तर शकता, पण तिथे काम करू शकत नाही. २०१५ पर्यंत ही अट कायम होती. त्यामुळे या व्हिसाला ‘प्रिझनर व्हिसा’ असंही संबोधलं जायचं. एच वन बी व्हिसा असलेल्यांच्या जोडीदारांसाठीच एच फोर व्हिसा दिला जात असल्याने जोपर्यंत एच वन बी व्हिसा वैध आहे, तोपर्यंतच एच फोर व्हिसावर अमेरिकेत काम करणं शक्य होतं. अमेरिकेन संसदेत मांडल्या गेलेल्या नव्या विधेयकानुसार आता एच फोर व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्यांच्या हक्कावरही गदा येण्याची शक्यता आहे. * अमेरिकेत प्रवेश करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी नव्या नियमांचा काय परिणाम होईल? - जर तुम्ही अमेरिकेच्या बाहेरुन कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली असेल तर आता अशा तरुणांना अमेरिकेत कामासाठी प्रवेश करणं अवघड जाणार आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी जर अमेरिकन विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतली असेल तर त्यांना मात्र एच वन बी व्हिसा मिळणं तुलनेंन सोपं असेल. ज्यांनी सॉफ्टवेअरचा केवळ डिप्लोमा घेतला आहे अशांसाठी आता यापुढे अमेरिकेत काम करण्याचे दरवाजे बंद होण्याचीच शक्यता जास्त आहे. - प्रतिनिधी