वर्च्या इंड्याच्या खालचा भारत

By admin | Published: April 26, 2017 01:32 PM2017-04-26T13:32:11+5:302017-04-26T13:32:11+5:30

कितीही हिम्मतवान तरुण जोडपं असलं तरी पैशापुढं हात टेकतंयच हल्ली! ... परवडते कुटं आधुनिक्ता?

India's lower house of India | वर्च्या इंड्याच्या खालचा भारत

वर्च्या इंड्याच्या खालचा भारत

Next
>श्रेणिक नरदे
 
खेड्यापाड्यात तरुण मुलांच्या जगात कसा दिसतो हुंडा याचं एका दोस्तानं सांगितलेलं हे एक चित्र.
 
रितीरिवाजाप्रमाणं दोन्ही घर एकेक दोनदा जाऊन झालं, रितीरिवाज म्हणजे पहिले पुरु षआणि मग महिला मंडळ घरदार बघून आलं, दोन्हीकडंनं पसंती पडली. 
पुढचं रितीरिवाज म्हणजे देण्याघेण्याचं बोला ! पोरगं पुढारलेलं हुतं, टीव्ही शिनमाच्या पलिकडं जाऊन चार बुकं, असतील नसतील ती महापुरषं वाचून काढलेली. साधारण एमपीएस्सी करणारा गडी... अभ्यास चालू केला कि सणावळ्या आणि महापुरु ष ही काय पाठ सोडत नाहीत. त्यात ह्यो गडी महापुरषांला शेंड्यापास्नं बुडख्यापर्यंत वाचलेला. नही म्हणटलं तरी वाचून येडी झालेली जन्ता पुस्तकाच्या प्रभावाखाली येत्याच. ह्यो गडी त्यातला प्रकार. घरात आईबापावण्यारावळ्याला सांगिटलं मी हुंडा घेणार नही! आणि जर का तुम्हाला हुंडा घ्यायचाच असला तर मी लग्न करणार नही ! 
घरच्यांची पंचाईत झाली, हे बिघडलंय तर म्हणतंय तसं करु म्हणून पोरी बघायला लागले. आता पोरीचा बाप म्हणटला द्यायचं-घ्यायचं बोला. पोराच्या बापानं सांगिटलं आम्हाला हुंडा नको. इंप्रेशन मारायला ह्यो गडी म्हणटला, ‘आम्ही दोघं कमवूआणि आमचं आम्ही बघू’
- त्या दिवशीची बैठक उठली. 
दोन तीन दिवसं गेली. पोरीकडंनं काहीच निरोप येईना. त्यामुळं पोराकडची मंडळी कच खाल्ली. त्यात गावं बारकी असल्यानं कुणाचं कुत्रं मेलं तरी लगेच कळतंय. तिथं ह्यांचं जुळलेलं कळायला किती वेळ लागतोय..? गावभर बोभाटा झालता. 
गावातंनं कुणकुण लागली. तिकडची चारदोन लोकं येवुन चौकशी करून गेली. पोरगं चांगलं हाय का ? काय प्रॉब्लेम हाय का ? कुठं काय भानगड केलती काय म्हणून चौकशी केली. 
गावातली माणसं गाववाल्याला सगळं सांगिटली, पोराच्या बापाचं हे सगळं ऐकल्यावर डोकं फिरलं. मुलीकडं फोन करून शिव्या हासडल्या, लग्न मोडलं.
***
हे एक उदाहरण, हुंडा न घेता लग्न करतो म्हणटल्यावर पोरीच्या घरच्यांकडून मुलावर शंका घेतली गेली. ठरलेल्या लग्नाला बट्टा लागला. यात कुठतरी हुंडा नाकारुन नवीन दृष्टीनं जगाकडं बघायचा विचार करणार्या तरु णाच्या हेतुवरच शंका घेतली गेली. हुंडा नाकारला म्हणून त्याच्यात काहीतरी कमी असणार हा समज चौकशी करायला भाग पाडला. ह्यावरून हुंडा घेणार्यापेक्षा देणार्याची मानसिकता दिसते.
लग्न झाल्यावर हातात अंगठी दिसली कि सहजच विचारला जाणारा प्रश्न म्हणजे सासरा खुश हाय म्हण तुझ्याावर ?
कुठल्याही जुळवलेल्या लग्नात (अरेंज म्यारेज) रुखवतात कॉट, गादी, भांडीकुंडी, फ्रीज, ओव्हन, खायची पदार्थ, रूखवत, त्यावरच्या नवरा नवरी मुलीच्या नावाची अक्षरं जुळवून केलेल्या कलर प्रिंटेड कविता हे सगळं असतंच. गावाकडच्या महिलामंडळी तर लग्नाला कमी आणि या रु खवताचं परिक्षण करायलाच लग्नाला आलेल्या असत्यात कि काय असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. 
ही एक बाजू. 
दुसरी बाजु अशी कि 1990 नंतर गर्भपाताचं प्रमाण वाढलं. यात लिंगनिदान होवून मोठ्या प्रमाणात स्त्रीभ्रुणहत्या झाल्या. परिणामी लिंगगुणोत्तराचा प्रश्न निर्माण झाला. दरहजारी मुलांमागं सातशेपर्यंत मुलींचं प्रमाण कमी झालं. ही पिढी आता लग्नाळु वयात आली. चंगळवादी समाज तयार झाल्यामुळं सगळ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. यात मध्यमवर्गीय श्रीमंत यांना त्या त्या पद्धतीने मुली मिळाल्या. गरीब वर्गातील लग्न करायचं म्हणजे मोठी समस्या वाटु लागली. कर्नाटक आणि सीमाभागात पन्नास हजार ते दीडदोन लाख रु पये घेवून लग्न करून देणारी एजंट मंडळी सक्रीय झाली. कमिशन घेवून लग्न लावून द्यायचं काम चालू झालं. म्हणजेच लग्नाचा बाजार करून, आता पोरगं निबार व्हायलं, अब नही तो कब नही ! अशा प्रकारची भीती दाटून लोकंही ह्या बाजारात सामील झाली. गोरगरिबांच्या लग्नाचा व्यापार करणारे लोक मात्र श्रीमंत झाले. 
***
पुरोगामी किंवा प्रागतिक विचार करून आंतरधर्मीय, आंतरजातीय लग्न करणारे आजही दिसतील पण त्या लग्नाचं प्रमाण आता गावखेड्यात तरी घटत चाललंय. ह्या मागचं कारण असं की, आर्थिक असुरिक्षतता. कितीही हिम्मतवान जोडपं असलं तरी पैशापुढं हात टेकलं जातात. काही वर्षापूर्वी महागाई कमी होती, तेव्हा समाजाला फाट्यावर मारत स्वत:चं अस्तित्व टिकवून स्थैर्य मिळवता यायचं, सेटल होता यायचं. याच असुरक्षिततेपायी आता या प्रकारच्या लग्नांचं प्रमाण घटतंय. 
एक व्हिडिओ महिन्यामागे व्हायरल झाला. त्यात मुलीने आंतरजातीय लग्न केलं म्हणून मुलीच्या बापाने तिचा खून केला. अंगावर काटा आणणारं ते दृश्य बघून कुणाची टाप व्हायची अशी लग्न करायची ? 
बहिष्कार टाकणं, वाळीत टाकणं, तोंड न बघणं इथपर्यंत ठिक असतं पण थेट हत्या करण्याइतपत क्रूरता फक्त समाजातील बेगड्या प्रतिष्ठेपायी यावी ही समाजाची शोकांतिका. शेतकरी नवरा नको ग बाई ऐकलंतं, पण शीतल वायाळ हिच्या आत्महत्येनंतर तिने लिहून ठेवलेल्या सुसाईड नोट नंतर शेतकरी कुटुंबातील मुलींची अवस्था किती भयानक आहे ह्याची कल्पना येते. 
उच्च शिक्षण घेणे, सुशिक्षीत होवून मोठ्या आकड्यातला पगार घेणे ह्या पलिकडं शिक्षणापासून आपल्याला मिळालं तरी काय ? किंवा आपण मिळवलं तरी काय ? ह्याचा विचार तरूण तरूणी पर्यायाने समाजाने करून लग्नातील व्यापार नावाची गोष्ट सोडून द्यावी. फुकट्या प्रतिष्ठा गुंडाळल्या तरच अनेक शीतल सारख्या मुली, आत्महत्या करणारी जोडपी, हत्या करणारे बाप कुठतरी थांबतील. 
विकास, डिजिटल युग, महासत्तेच्या वेष्टनाखालचा समाज अजून किती खालच्या थराची मानसिकता बाळगून राहिलाय ? यावरची पापुद्रं उडली तरच वरच्या इंडियाला खालचा भारत शोभेल.
 
 
हुंडा.
दोन अक्षरी हा शब्द. पण मुलींच्या जगण्याचा हुंड्याचा फास नक्की कधीपासून लागतो? जन्मापासून?  हुंड्यापोटी देण्यासाठी पैसा नाही वडिलांकडे म्हणून चिठ्ठी लिहून स्वत:ला संपवणारी एक शितल. ज्या स्वत:ला संपवूही शकत नाहीत, अशा मुलींचं काय होतं? काय सोसावं लागतं?
‘आॅक्सिजन’कडे नियमित येणारी पत्रं, त्या पत्रातून आपली व्यथा मांडणाऱ्या मुली हुंड्याच्या या काचाविषयी बोलतात.. गेली अनेक वर्षे..पण म्हणजे बदललं काहीच नाही? आणि बदललं असेल तर नेमकं काय? काय येतं खेड्यापाड्यात मुलींच्या वाट्याला? जातीपातीच्या घट्ट नियमांत आणि चौकटीत बांधलेल्या लग्नव्यवस्थेत आपली मुलगी कशी ‘उजवावी’ अशा चिंतेत असलेल्या बापाच्या वाट्याला? जमीनीचा तुकडा विकावा लागतोच त्याला अजून? हुंड्याशिवाय मुलीचं लग्न होत नाही असं वाटतंच त्याला अजून? किती खर्च येतो मध्यमवर्गीय बापालाही एका मुलीच्या लग्नात, तो ही कमीतकमी? कुठून येतो तो पैसा? मुलींशी बोलतात वडील कधी हुंड्याच्या या छातीवर पेटलेल्या, लादलेल्या निखाऱ्याविषयी? की हुंडा द्यावाच लागेल आपल्या वडिलांना अशी तयारी असतेच मुलींची? असे अनेक प्रश्न आहेत.. ज्यांची उत्तरं शोधायला हवीत?
 
पण ती उत्तरं कुणी शोधायची?
कुणा सामाजिक संस्थेनं की सरकारनं?
पत्रकारांनी की समाजसेवकांनी?
इतरांनी काय म्हणून?
प्रश्न आपल्या जगण्याचा आहे तर या प्रश्नाची उत्तरं आपण साऱ्या मिळून शोधू..
प्रश्न आपल्या लग्नाचा, आपल्या हुंड्याचा, आपल्या जीवाला जो काच लागतो, मनात ज्या अपमानाच्या ठिणग्या उडतात त्यांचा आहे..
प्रश्न आपला आहे..
मग उत्तरं आपण शोधू...
 
आपण कोण?
आपण म्हणजे आॅक्सिजनच्या शहरांतच नाही तर खेड्यापाड्यात, छोट्या पाड्यांत राहणाऱ्या साऱ्या मैत्रिणी..
ज्यांचं लग्न ठरायचं आहे त्या..
ज्यांचं लग्न हुंड्यापायी अडलं आहे त्या..
ज्यांचं लग्न नुकतंच झालं आणि हुंडा द्यावा लागला त्या..
हुंडा देवूनही लग्नात छळच सहन करावा लागतोय त्या..
आणि त्या ही ज्यांच्याकडे हुंड्याची मागणी लग्नानंतर होतेय..
 
मनमोकळं करा.. बोला..
कुठं बोलता येत नाही ते,
कुणाला सांगता येत नाही ते
हुंड्याच्या भस्मासुराचं खरंखुरं
तुम्ही भोगत असलेलं चित्र लिहा..
जगणं लिहा..
आणि सांगा की, नेमका आपल्या राज्यात हुंड्याचा प्रश्नही आजही आहे काय?
 
मदत म्हणून..
 
मदत म्हणून हे आमचे प्रश्न..
१) हुंड्यासंदर्भात मुलगी म्हणून तुमचा अनुभव सांगा. काय असतं घरात वातावरण मुलगी वयात येताना..
२) कशी करतात वडिल हुंड्यांची तरतूद?
एकापेक्षा जास्त मुली असतील तर वडिल कसे जमवतात पैसे?
 
३) तुमच्या घरात, नातेवार्इंकात, समाजात काय चर्चा असते हुंड्याविषयी? मुलीच्या रंगरुपाविषयी?
४) रंगाचा, दिसण्याचा हुंडा कमी अधिक होण्याशी संबंध आहे का?
५) ज्याला लग्न करायचं तो मुलगा मागतो का हुंडा? काय म्हणतात तो आणि त्याचे आईबाबा? त्याचे काकामामा?
६) हुंडा नको असं म्हणणारे दुसरं काय मागतात? गाड्या घरंदारं आणखी काही?
 
७) साधेपणानं लग्न करावं असं तुम्हाला वाटतं का? की वडिलांनी द्यायलाच पाहिजे भरपूर आपल्याला, सोनंनाणं, संसार असं वाटतं?
 
८) शिक्षणामुळे हुंड्याचा प्रश्न वाढला की कमी झाला? मुलांच्या आणि मुलींच्याही?
 
९) हुंडा नको म्हणणारी मुलं खरंच असतात का?
 
१०) हुंड्यापायी तुम्ही जे भोगताय ते लिहा..
 
 
कुणाला का घाबरायचं?
 
मनमोकळं, बिन्धास्त लिहा..
नाव लिहा, अगर लिहू नका..
नाव छापू नये असं वाटत असेल तर तसं कळवा..
तुमचं नाव, गाव गुप्त राहील याची पूर्ण खात्री बाळगा..
कारण नावापलिकडे आपण शोधतोय हुंडा समस्येचा चेहरा..
आणि त्यावर उपाय काय करता येतील याची एक वाट..
तेव्हा जरुर लिहा..
 
आमचा पत्ता- 
ऑक्सिजन, एमआयडीसी अंबड, नाशिक
इमेलही करता येईल
oxygen@lokmat.com
पाकिटावर हुंडा असा उल्लेख करायला विसरु नका..

Web Title: India's lower house of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.