पेपर टाकले, पण शिकलोच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 05:00 AM2017-08-17T05:00:00+5:302017-08-17T05:00:00+5:30

गाव सोडून शहरात आलो, कुठं प्रवेश मिळेना. वणवण संपेना, पण हरायचं नाही हे इथंच शिकलो..

Inserted paper, but learn it! | पेपर टाकले, पण शिकलोच!

पेपर टाकले, पण शिकलोच!

Next

- विक्रमसिंह बायस,

गाव सोडून शहरात आलो,
कुठं प्रवेश मिळेना.
वणवण संपेना,
पण हरायचं
नाही हे इथंच शिकलो...
मार्डी. तालुका उत्तर सोलापुरातल्या प्रसिद्ध यमाई मंदिर गावचा मी. दहावीपर्यंतचं शिक्षण सोलापूर शहरात येऊन-जाऊन केलं. गावापासून शहर फक्त वीस किलोमीटरवर होतं. गावाकडे मोठा वाडा होता. त्यामुळे शहरात रहायला गेलो नाही. अप-डाउन केलं. वडिलांना वाटे मी अभियंता व्हावं. आठवीपासूनच तयारी सुरू केली. दहावीत मार्क अपेक्षेपेक्षा कमी होते. मला डिप्लोमाला तरी प्रवेश मिळेल अशी आशा होती; पण ते मिळालं नाही. परिस्थिती नव्हती की डोनेशन भरून प्रवेश घेता येईल. मग सायन्स घेतलं. इच्छेविरुद्ध फिजिक्स, केमिस्ट्रिी शिकावं लागल्यानं बारावीला मार्क्स कमी पडले. दहावीनंतर वडिलांनी सोलापूर शहरात ३०० स्क्वे. फूट जागा घेतली. साधारण पत्र्याची, परंतु राहण्यायोग्य. वडिलांना नोकरी सोडावी लागली. पर्यायाने वृत्तपत्र विक्री सुरू केली. सुदैवाने तेव्हाच दहावीच्या गुणांवर एसपीएम पॉलिटेक्निक कुमठे गाव इथं प्रवेश मिळाला. गावातून शहरात आणि पुन: शिक्षणासाठी गावात असं चक्र फिरलं.
पेपर विक्री चालू होती. सोलापूर येथे दत्त चौक प्रसिद्ध असं ठिकाण. पहाटे ४.३० वाजता गाड्या यायच्या. तिथून पेपर घेऊन, ते टाकून घरी यायचो. कॉलेज माझ्या घरापासून १२ किलोमीटर. सायकलवर जायचो. अशी डिप्लोमाची ३ वर्षे काढली. क्षेत्र आवडीचं असल्या कारणाने मार्क्सही चांगले मिळत गेले. अव्वल ठरलो. ३ कॅम्पसमध्ये निवड झाली. पुण्याच्या एका नामवंत कंपनीत सुपरवायझर पोस्ट मिळाली. मन ऐकत नव्हते शिक्षण अर्धवट झाले वाटत होते. इतकी वर्षं वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय केला. त्यात दोन मुलं जे शाळा शिकून माझ्यासोबत उदरनिर्वाहासाठी करायचे, त्यांचं काम सुटलं. पुढच्या शिक्षणाच्या हेतूने पुन: पेपर विक्री करत प्रवेशाच्या उद्देशाने महाविद्यालये फिरू लागलो. प्रवेशाच्या फेºया संपल्या होत्या. नाइलाज म्हणून अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षी प्रवेश घेतला. शेवटी एकदा अभियंता होण्याचं स्वप्न पूर्ण झालं असं वाटत होतं... मुंबईच्या एका कंपनीमध्ये नोकरी मिळाली; परंतु काम मनासारखं नव्हतं. मी पुन्हा सोलापूर गाठलं.
त्या काळात सर्व क्षेत्रात जागतिक मंदीच्या लाटेमुळे नोकरीप्रश्न अवघड झाले. एका वृत्तपत्रात जाहिरात पाहिली आणि मग एक तंत्रशिक्षण देणाºया महाविद्यालयात मुलाखतीच्या निमित्ताने गेलो. अतिशय कठीण अशा ३ फेºयामधून माझी निवड प्राध्यापक म्हणून झाली. आज त्याच महाविद्यालयात काम करतोय. ज्या महाविद्यालयात डिप्लोमा प्रवेशासाठी नाकारण्यात आलं होतं तिथंच शिकवतोय. शहरानं बरंच काही शिकवलं. जगण्याची जिद्द, जिंकण्याची उमेद दिली. गावाकडची माणसे शहरात आल्यावर बदललेली मी पाहिली. धावपळीच्या युगात आपलं कोण हेही कळालं. आज एक प्राध्यापक म्हणून जगत असताना वृत्तपत्र विक्रेता म्हणूनदेखील ओळख आहे. कारण वृत्तपत्रांनी मला जगवलं..

सोलापूर

Web Title: Inserted paper, but learn it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.