इन्स्टा फूड : खाऊच्या दुनियेतला एक नवा रसरशीत ट्रेण्ड जो आपल्यालाही सेलिब्रिटी बनवू शकतो.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:47 PM2018-06-28T13:47:45+5:302018-06-28T13:47:51+5:30
आपल्याला पदार्थ करायला आवडतात, त्याविषयी बोलायला आवडतं, मग या नव्या इन्स्टा फूड दुनियेचं दार ढकलून पाहा.
- भक्ती सोमण
घरात आई एखादा उत्तम पदार्थ करते, घरभर त्याचा दरवळ असतो. आता पानं घेतली, पदार्थ पानात वाढलाही आणि पहिला घास घेणार तेवढय़ात वडील म्हणतात, थांबा, एक काम तर आपण केलंच नाही. हातातला घास खाली पडतो. आणि मग वडील, आई किंवा घरातली तरुण मुलं पटापट त्या पदार्थाचे फोटो काढतात. इन्स्टाग्राम, फेसबुकवर टाकतात. त्याचं वर्णन लिहितात. मग वदनी कवळ घेतात.
-तसा हा विनोद व्हायरल असला तरी ते निव्वळ विनोद नाही, वास्तव आहे. आपल्या घरात शिजणार्या अन्नपदार्थाचे एरव्ही आपण फोटो काढत होतो का? ममाज रेसिपी, ट्रॅडिशनल फूड, होम कूक फूड, लव्ह फॉर फूड असे हॅशटॅग लावून ते सोशल मीडियात टाकण्याचा विचार तरी केला होता का?
पण आता सोशल मीडिया आपला श्वास झाल्यापासून आपण आपल्या घरात शिजणारे पदार्थही आपल्या इन्स्टाग्रामवर टाकू लागलोय. इन्स्टा फूड हा शब्दही बरीच मोठी संकल्पना. त्यात हौशी मंडळी तर आहेतच, पण फूड प्रोफेशनल्सही आपले प्रयोग पोस्ट करत आहेत. इतकंच काय पॅकेज फूड विकणार्या काही कंपन्याही आपले इन्स्टा हॅण्डल्स वापरून आपल्या पदार्थाविषयी बोलतात. त्यावरून अनेकदा वादही होतात.
खरं तर हे इन्स्टाग्राम आलं तेव्हा इन्स्टाग्रामवर काय फोटोच तर टाकायचे असतात, त्यात असं काही खास नसतं, असा सूर ऐकायला येत होता. पण, फोटोंची एक दुनिया जशी तिथं उभी राहिली तशी देशोदेशीच्या खाद्यजगताचीही एक वेगळी, रंगतदार दुनिया खुली झाली. अनेक पदार्थ, त्यांचे व्हिडीओ, त्यावर बोलणारी माणसं हे सारं जग म्हणता म्हणता खवय्यांच्या दुनियेशी सहज जोडलं गेलं.
ते इतकं लोकप्रिय झालं की, आपल्याला टीव्हीवर दिसणार्या अनेक लोकप्रिय शेफ्सनाही इन्स्टाग्रामचा मोह आवरता आला नाही. त्यांच्या पर्सनल अकाउण्टवरून ते त्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थाचे फोटो टाकून त्याविषयीची माहिती नियमित देत असतात. त्यातून अगदी रोज नव्या रेसिपी कळतात. तसेच अगदी 1 मिनिटाचा व्हिडीओतून पटकन होणारे पदार्थही दाखवले जातात. अकाउण्ट पब्लिक असल्यानं (सगळ्यांना बघता येईल असं असल्यानं) असे कित्येक व्हिडीओ अगदी रोज बघता येतात. शेफ संजीव कपूर रमजाननिमित्त होणारे शीक कबाब, बिर्याणी अशा पदार्थाबरोबर कैरी राइस, मसाला दूध, मूंगडाळ इडली असे पदार्थ करतानाचे एक मिनिटाचे व्हिडीओ शेअर करतात. कुणाल कपूर, वरुण इनामदार, रणवीर ब्रार, शेफ भसीन, विकी रत्नानी, सारांश गोलिआ, राकेश रघुनाथन असे अनेक शेफ यात आघाडीवर आहेत. त्यातून पटकन होणार्या पौष्टिक पदार्थाची माहिती मिळते. वेगवेगळ्या प्रांताच्या खाद्यपदार्थाचे अभ्यासक, फूड ब्लॉगर हेही नियमित इथे फोटोंद्वारे व्यक्त होत असतात. त्यामुळे पदार्थाची अगदी छान माहिती आयती मिळते. कुणाल विजयकर, कुरुष दलाल, कल्याण करमकर, रुशीना मन्शॉ घडियाल, सई कोरान्न-खांडेकर, स्मिता देव, कल्पना तळपदे, सौमित्र वेलकर, शुभा-प्रभू साटम अशा अनेक तज्ज्ञांकडून महाराष्ट्रीयन पदार्थापासून ते अगदी भारतातील सर्व पदार्थाची अगदी नियमित माहिती मिळत जाते. वेगवेगळे खाद्य दिवस हे तज्ज्ञ उत्साहाने साजरे करतात.
त्यामुळे खाद्यप्रेमींसाठी इन्स्टाग्राम ही अलिबाबाची गुहाच आहे. याशिवाय आता तर सर्वच हॉटेल्सनेही इन्स्टाग्राम हा उत्तम प्रसिद्धीचा मार्ग म्हणून अवलंबला आहे. तिथे मिळणारे पदार्थ, ते देण्याची पद्धत हेही फोटो, व्हिडीओद्वारे दाखवले जाते. काही हॉटेलांमधून नियमित खाद्यगप्पा, वर्कशॉप्स आयोजित केले जातात. त्यांचीही माहिती लाइव्ह दाखवली जाते. त्यामुळे अनेक नव्या गोष्टी समजतात.
इतकेच नव्हे, तर उत्तम खाद्यपदार्थ तयार करता येणारे अनेकजण इथे फोटो, माहिती टाक त असतात. त्यांच्याशी संवाद साधता येतो.
इन्स्टाग्रामवर जाऊन हे खाऊचं जग पाहण्यात मजा आहे. आणि संधीही आपली पाककला दाखवण्याची.
**
साधं केकचं घ्या. योलांडा गॅम्प नावाच्या परदेशातली तरूणी केक कसे करायचे, त्याचे आइसिंग कसे करायचे. याचे उत्तम प्रशिक्षण या माध्यमातून देते. थीम बेस केकचे अनेक पर्याय ती देते.
**
माय हॅपी एॅप्रोन या नावाचे अकाऊण्ट असणारी अमृता रानडे म्हणते, मला सुरवातीपासून पदार्थ करायला आवडतात. त्यात मी विविध प्रयोग करते. ते करून त्याचे फोटो काढून मी इन्स्टाग्रामवर गेल्या काही वर्षापासून टाकते आहे. सुरूवातीला मला लाइक्स मिळत होते. जसे जसे पदार्थ आणखी वाढले तसे लाइक्सबरोबर कमेण्टही यायला लागल्या. काहींनी ते पदार्थ करुनही बघितले. आता तर जगभरातले अनेक जण पोस्ट लाईक करतात. आणि रेसिपी मागणार्यांची संख्या तर खूप आहे. ही इन्स्टाग्रामची किमया आहे. मी केलेला उत्तम पदार्थ चांगल्या फोटोमुळे सगळ्य़ांना आवडतोय ही भावना अतिशय समाधान देणारी आहे.
(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे.)