इन्स्टा : सोशल मीडियाचा एक फोटोजेनिक चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 11:44 AM2017-08-31T11:44:53+5:302017-08-31T11:44:59+5:30

फेसबुक-व्हॉट्सअ‍ॅप तसं जुनं झालं, सध्या जगभरातल्या तरुण जोडप्यांत क्रेझ आहे ती इन्स्टाग्रामची. आपल्या प्रवासाचे सुंदर फोटो ते तिथं शेअर करताहेत. भटकंतीचा अनुभव सांगणारं हे नवं तंत्र तुम्ही पाहिलंय का?

Insta: A photogenic face of social media | इन्स्टा : सोशल मीडियाचा एक फोटोजेनिक चेहरा

इन्स्टा : सोशल मीडियाचा एक फोटोजेनिक चेहरा

Next

- अमृता कदम
वॉलपेपरसारखी भासणारी सुंदर निसर्गचित्रं, आकर्षक लॅण्डस्केप्स आणि प्रेमात आकंठ बुडालेलं जोडपं. त्यांचे फोटो आणि निसर्गाचे त्यांनी काढलेले फोटो..
व्हायरल होणारच होतं इन्स्टाग्राम ट्रॅव्हल अकाउण्ट. अर्थात, आजच्या सारखी ज्यानं- त्यानं इन्स्टाग्राम अकाउण्ट उघडून फोटो टाकत सुटण्याची क्रेझ नव्हती त्याकाळी. पण वळण मात्र इन्स्टाचंच होतं. २०१४ ची ही गोष्ट. मुराद आणि नताली ओस्मान या रशियन फोटोग्राफर-मॉडेल जोडप्याला एक भारी गंमत गवसली. त्यांनी ‘फॉलो मी टू’ नावानं एक इन्स्टाग्राम अकाउण्ट सुरू केलं. त्या दोघांना फिरण्याचं, एकत्र प्रवासाचं वेड. आपल्या प्रवासातल्या खास क्षणांचे फोटो सर्वांसोबत शेअर करावेत म्हणून त्यांनी हे अकाउण्ट सुरू केलं. अल्पावधीतच ५ लाख फॉलोअर्स मिळवणा-या followmetoनं सोशल मीडियामध्ये ट्रॅव्हल फोटोंचा एक नवा ट्रेण्ड सेट केला.

त्यानंतर त्यांची नक्कल करणाºया अशा ट्रॅव्हल फोटोंचं पीकच इन्स्टाग्रामवर आलं. पण जी लोकप्रियता आणि दाद मुराद आणि नतालींच्या फोटोंना मिळत होती, त्याची बरोबरी करणं कोणालाच जमलं नाही. मुराद आणि नताली ओस्मानच्या फोटोंना पहिल्यांदा खºया अर्थानं टक्कर दिली ती व्हिक्टोरिया योर आणि टेरेन्स ड्रिस्डेल या अमेरिकन जोडप्यानं. फिरण्याचं भन्नाट वेड असलेल्या या जोडप्यानंही निसर्गदृश्यांच्या अद्भुत, सुंदर फोटोंबरोबरच त्यांच्या प्रवासाबद्दलची वस्तुनिष्ठ माहितीही शेअर केली.
या जोडीच्या followmeaway  इन्स्टाग्राम अकाउण्टवर जवळपास ५० हजार फॉलोअर्स आहेत. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यावर कोणत्या ठिकाणांना भेटी द्याव्यात, खाण्यासाठीची प्रसिद्ध ठिकाणं, राहण्यासाठीच्या जागा आणि इतर गोष्टीही ते आपल्या जगभरातील फॉलोअर्सना सांगतात. त्यांचे हे ट्रॅव्हल लॉगही तितकेच लोकप्रिय आहे. तुम्हाला जर व्हिक्टोरिया आणि टेरेन्सच्या प्रवासातला रोमांच अनुभवायचा असेल तर तुम्ही त्यांच्या अकाउण्टला भेट देऊन त्यांनी नुकत्याच केलेल्या पेरू ट्रीपचे फोटो पाहू शकता. हे फोटो पाहिल्यानंतर आपली बॅग पॅक करून प्रवासाला निघण्याचा मोह तुम्हालाही आवरणार नाही.
अ‍ॅडव्हेंचर, रोमान्स आणि वेगळेपणाची आवड असणाºया अनेक जोडप्यांची अशी इन्स्टाग्राम अकाउण्ट्स आता दिसतात. सध्याचा तो एक नवा ट्रेण्डच आहे. ही तरुण जोडपी त्यांच्या प्रवासाची कहाणी फोटोंतून सांगतात. काही यादगार क्षण, स्थानिक जगण्याची खासियत मांडतात. सगळ्यांचेच फोटो काही नताली-मुराद किंवा व्हिक्टोरिया आणि टेरेन्सच्या फोटोंइतके सुंदर नसतात; पण प्रवासाची, मस्त फिरण्याची, जग पाहण्याची ओढ या फोटोंतही दिसतेच.
जगभरातलं तारुण्य आता आपल्या फिरस्तीचे असे फोटो इन्स्टावर टाकताना दिसतं आहे. त्यातून दिसतं एकच की, आपल्याला फिरायची हौस असेल, फोटोग्राफरची नजर असेल तर जगभर पोहचण्यासाठी आता भाषेची गरज उरलेली नाही. फोटो हीच भाषा, इन्स्टावर तीच भाषा दिसते. आणि शब्दांपलीकडचं जग ती भाषा दाखवते.
तुम्हालाही फिरायची, काही नवीन करायची आवड असेल तर तुमचे प्रवासाचे अनुभव शेअर करण्यासाठी इन्स्टाग्राम ट्रॅव्हल अकाउण्टचा प्रयोग करता येईल. त्यासाठी दूर देशीच जायला हवं असं नाही. आपल्या अवतीभोवती फिरतानाही काही खास दिसेल आणि जगभरात ती माहिती पोहचलेही..
नव्या सोशल मीडियाचा हा चेहराही माहिती करून घेणं उत्तम. त्यासाठी व्हिक्टोरिया-टेरेन्सच्या इन्स्टाग्रामवरच्या फोटोंची झलक आवर्जून पाहा.

(amritar1285@gmail.com)


 

Web Title: Insta: A photogenic face of social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.