World Internet Day: 'नेट' सेट गो... चार्ली अन् बिल यांनी नव्या युगात केलेल्या 'LOGIN'ची गोष्ट
By अमेय गोगटे | Published: October 29, 2020 07:58 AM2020-10-29T07:58:43+5:302020-10-29T10:54:32+5:30
इंटरनेट नसेल तर? इंटरनेट गेलं तर? कल्पना करा, आपण इंटरनेट नसेल तर जगू कसे? अन्न, वस्र, निवारा नेट या चार गोष्टींपर्यंत आपण कसे पोहोचलो?
- अमेय गोगटे
अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असं आपण म्हणतो. पहिल्या प्रयत्नात अपयशी झालेली; पण नंतर यशाची शिखरं सर करणारी अनेक व्यक्तिमत्त्वंही आपण पाहतो, त्यांच्याबद्दल ऐकतो-वाचतो. आज अख्खं जग ज्या गोष्टीनं व्यापून टाकलंय किंवा जोडलं गेलंय, आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालंय, त्या इंटरनेटची सुरुवातही काहीशा अपयशानंच झाली होती, असं सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही.
जगातील लाखो तरु णांना यशाचा मार्ग दाखवणारं इंटरनेट अपयशी कसं ठरू शकतं, हा प्रश्न स्वाभाविकच आहे. परंतु, आज लांबलचक ई-मेल किंवा भले मोठे मेसेज क्षणार्धात जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवणार्या इंटरनेटद्वारे पहिला संदेश पाठवताना कॉम्प्युटरच क्रॅश झाला होता, हे वास्तव आहे. तो मेसेज होता L O G I N. कॅलिफोर्नियाहून स्टॅनफोर्डला ही पाच अक्षरं पोहोचवताना काही काळ यंत्नणाच ठप्प झाली होती. अर्थात, आज हेच LOGIN केल्याशिवाय आपला दिवस पूर्ण होत नाही. यालाच म्हणतात जग जिंकणं !
हे सगळं आज सांगायचं कारण म्हणजे, 1969 साली आजच्याच दिवशी - म्हणजेच 29 ऑक्टोबरला इंटरनेटचा वापर करून पहिला संदेश पाठवण्यात आला होता. म्हणूनच 29 ऑक्टोबर हा दिवस 2005 पासून जागतिक इंटरनेट दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनेट, वायफाय, डेटा, फोरजी, फायबर हे सगळे आज परवलीचे शब्द झालेत.
इंटरनेट नसेल तर? इंटरनेट गेलं तर? या प्रश्नांची कल्पनाही करवत नाही. लॉकडाऊनच्या काळात तर जग ऑनलाइन गेलं आणि इंटरनेट जीवनावश्यक यादीत गेलं. त्यासाठी तरी यावर्षी आपण चार्ली क्लाइन आणि बिल डुवाल या जोडीसह इंटरनेटचा शोध लावणार्या प्रत्येकाचेच मन:पूर्वक आभार मानायला हवेत.
कोण आहेत चार्ली आणि बिल?
खरं तर, इंटरनेटचं संशोधन सुरू झालं ते अमेरिकन सैन्यामुळे. गुप्त संदेश पाठवण्यासाठी त्यांना एक यंत्नणा विकसित करायची होती. अमेरिकेतील काही विद्यापीठांकडे त्यांनी हे आव्हानात्मक काम सोपवलं होतं. त्या अंतर्गतच चार विद्यापीठांमध्ये चार संगणक जोडण्यात आले होते. सगळी जुळवाजुळव पूर्ण झाल्यानंतर, 29 ऑक्टोबर 1969 रोजी कॅलिफोर्निया विद्यापीठातील 21 वर्षांच्या चार्ली क्लाइननं स्टॅनफोर्ड विद्यापीठात फोन केला. बिल डुवाल या तरुणानं फोन उचलला. ठरल्याप्रमाणे LOGIN या शब्दातील पहिलं अक्षर टाइप करून पाठवत असल्याचं चार्लीनं सांगितलं. काही सेकंदात L हे अक्षर बिलच्या कॉम्प्युटरवर प्रकटलं. त्यापाठोपाठ O नेसुद्धा कॅलिफोर्निया ते स्टॅनफोर्ड प्रवास झटक्यात पूर्ण केला. पुढची दोन अक्षरं चार्ली टाइप करणार इतक्यात बिलचा कॉम्प्युटर क्रॅश झाला. सगळे तज्ज्ञ पुन्हा कामाला लागले. काय चुकलंय, कुठे गडबड होतेय, हे शोधून त्यांनी तासाभरात संगणक दुरु स्त केलं आणि त्यानंतर त्यांनी एका नव्या युगातच लॉगइन केलं, असं म्हणायला हरकत नाही.
हे झालं अमेरिकेतलं; पण भारतात इंटरनेट आलं ते 1995च्या सुमारास. अर्थातच, एक विशिष्ट वर्ग ठरावीक कामांसाठी इंटरनेट वापरत होता. ई-मेलद्वारे मेसेजची देवाणघेवाण केली जात होती. थोडं जरी बफरिंग झालं, तरी वैतागणार्या आजच्या फोरजी आणि फाइव्हजी पिढीला तेव्हाचा इंटरनेट स्पीड न सांगितलेलाच बरा. कॉम्प्युटरला जोडलेलं डायल-अप नेटवर्क, त्या कनेक्शनवेळी होणारा विशिष्ट आवाज, ही म्हणजे संयमाची परीक्षाच असायची. पण, 10-12 वर्षांपूर्वी मोबाइलमध्ये इंटरनेट आलं आणि बघता बघता सगळंच सैराट झालं, असं म्हणता येईल. आज भारतात इंटरनेट वापरणार्यांची संख्या 70 कोटींच्या घरात आहे आणि पुढच्या पाच वर्षांत ती 97 कोटींच्या घरात पोहोचेल असा अंदाज आहे. इंटरनेट गावोगावी पोहोचल्यानं आयुष्य बदलून गेलं. कनेक्टिव्हिटी वाढली. जगाशी संपर्क आला.
लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटनं जनजागृतीचं मोठं काम केलं, रोजगार गमावलेल्या तरुणांना आशेचा किरण दाखवला, शालेय विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भेट घडवली, नोकरदारांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला, आर्थिक व्यवहार सोपे केले, दूरवरच्या नातलगांची ख्याली-खुशाली कळवली, घरात बसून कंटाळलेल्यांना मनोरंजनाचा डोस दिला, व्यक्त होण्यासाठी प्लॅटफॉर्म दिला, लग्न जमवली, प्रेमं फुलवली, अडचणीत असलेल्यांपर्यंत मदत पोहोचवली, संकटाशी लढण्याची जिद्द जागवली. या सगळ्यासाठी इंटरनेटबद्दल कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी!
वरदान की शाप?
अर्थात, काही जण इंटरनेटच्या दुरुपयोगाकडे, इंटरनेटने निर्माण केलेल्या 'सायबर धोक्यां'कडे लक्ष वेधतील. त्यांचा मुद्दा अजिबातच नाकारता येत नाही. गोपनीय संदेश पोहोचवण्याच्या उद्देशाने इंटरनेट सुरू झालं होतं, पण आज याच इंटरनेटमुळे काहीच गुप्त, गोपनीय राहत नाही अशी परिस्थिती आहे. आपली प्रायव्हसीही हरवत चाललीय. अशावेळी प्रत्येकानंच सावध राहणंही आवश्यक आहे. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतातच. इंटरनेटच्या महाजालात अडकून पडण्याऐवजी किंवा कुणाला तरी त्या जाळ्यात अडकवण्याऐवजी, धागेदोरे व्यवस्थित जोडून समाज, देश आणि जग बांधण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत इंटरनेट ही काळाची गरज आहे. त्यापासून दूर राहून चालणार नाही. म्हणूनच आजच्या इंटरनेटदिनी सगळे एकसुरात म्हणूया, 'नेट सेट गो'!
( लेखक लोकमत डॉट कॉमचे डेप्युटी एडिटर आहेत.)