आयुष्याची इस्त्री मोडणारी भन्नाट जादू

By admin | Published: October 13, 2016 08:55 PM2016-10-13T20:55:04+5:302016-10-14T12:56:53+5:30

या रोडट्रिपने माझ्या डोक्यातला कचरा झाडून काढला आणि माझी नजर बदलली. माझ्या टेबलावर रोज येणाऱ्या बातम्यांपलीकडची, बातमीतली माणसं प्रत्यक्षात कशी जगतात हे शिकवलं मला या प्रवासाने !!

Irony magic that breaks life's iron | आयुष्याची इस्त्री मोडणारी भन्नाट जादू

आयुष्याची इस्त्री मोडणारी भन्नाट जादू

Next

- ओंकार करंबेळकर


बिझवादा विल्सन. हे नाव मी वाचलेलं होतं. मैला वाहून नेणाऱ्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात केलेल्या कामासाठी त्यांना मॅगसेसे पुरस्कार मिळाला हे रोजच्या धबडग्यातल्या बातमीनं मला सांगितलं होतं..
आमच्या प्रवासात मदुराईत मुक्कामी होतो. स्थानिक इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी वाचली की, एका सफाई कामगाराचा गटारीत श्वास गुदमरून मृत्यू झाला. त्यावेळी त्याची पत्नी गरोदर होती..
या दोन बातम्या; एरवी त्या बातम्यातलं वास्तव, त्यांचं गांभीर्य मला जाणवलंही नसतं. बातम्यांसारख्या बातम्या. शहरी आयुष्यात आपल्याला या प्रश्नांची कल्पनाही नसते, त्याची धग बसत नाही किंवा अशा गोष्टींकडे पाहताना आपले डोळे आपोआप झाकले गेलेले असतात.
मात्र मदुराईहून पुढे होसूर-बेंगळुरूच्या दिशेनं निघालो आणि त्या वाटेवर थोडंसं आता ‘केजीएफ’ अर्थात कोलार गोल्ड फार्म्स हे गाव आहे असं कळलं. एकेकाळी सोन्याच्या खाणी होत्या. त्या आता बंद झालेल्या आहेत. पण त्या गावचेच आहेत बिझवादा विल्सन हे कळलं. आणि आम्ही त्या गावात पोहचलो. त्या गावात ना त्यांच्या संस्थेचं कार्यालय होतं, ना कुठल्या स्वयंसेवी संस्थेचे फलक, ना कार्यकर्ते. एक बाबूलाल म्हणून गृहस्थ भेटले ते आम्हाला विल्सन यांच्या घरी घेऊन गेले..
तिथं भेटले त्यांचे भाऊ, वहिनी, पुतण्या, सून. त्यांना हिंदी, इंग्रजी येत नव्हतं. पण त्यांच्या घरची सून विदर्भातल्या वाशीमची होती. राणी नाव तिचं. विल्सन यांचे भाऊ जे सांगत होते ते राणीनं आम्हाला मराठीत रूपांतर करून सांगितलं. पण सांगताना त्या मुलीच्या डोळ्यात पाणी होतं. हे विल्सनकाकाही स्वत: हातानं मैला वाहण्याचं काम करत होते. केजीएफमधल्या मैलावाहू जगातलं सत्य ते सांगत होते, मैला वाहणं हेच आपलं काम असं वाटणाऱ्या माणसांना त्यातून बाहेर काढणं किती अवघड होतं हे जे सांगत होते ते ऐकताना आमचाही श्वास कोंडत होता. पोटात तुटत होतं इतकं ते असह्य होतं..
सफाई कामगारांचं जग, त्यांचे प्रश्न, त्यांनी उचललेली लोकांची घाण, वाट्याला आलेली कुचंबणा आणि गरिबी हे सारं यानिमित्तानं मला प्रत्यक्ष कळलं..
माझी नजर बदलली आणि बातमीपलीकडची, बातमीतली माणसं कशी जगतात हे समजून घेण्याचा एक मोठा धडाच मी इथं शिकलो..
मुंबईत आॅफिसात बसून काम करताना, रोजच्या बातम्यांचा ढीग वाचताना माझ्या एक लक्षात येत होतं की, हा देश एकसारखा उभा-आडवा सपाट नाही. पण बातम्यांमधून समजणारा भारत आणि बातमीत न येणारा भारत यात किती अंतर असतं हे मला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरलो तेव्हाच कळलं. 
हा प्रवास करण्यापूर्वी आठवड्याकाठी येणारी नवी पुस्तकं, सिनेमे, फारसा बदल न होणारं एकसुरी रुटीन हे सारं माझ्याही एकप्रकारची स्थिरता आलेल्या जगण्याचा भाग होतं. तसंही आपण सारेच काहीच नवं न घडणारं आयुष्य शहरांमध्ये जगत असतो. ऐन तारुण्यात आयुष्याची घडी बसविण्यासाठी आणि ती घडी कायम राहण्यासाठीची धडपड आपण चालवलेली असते. वरपांगी स्थिर वाटणारी एक घडी मलाही बसवावी लागलीच होती. 
ती घडीच नाही तर त्या घडीवरची इस्त्री मोडली ती या प्रवासात ! प्लॅनिंग करून, ठरल्या गोष्टी ठरल्या वेळेत आपल्या अपेक्षेप्रमाणेच घडण्याची, होण्याची सवय झालेल्या मनाला अनिश्चिततेतली गंमत कळली. अनिश्चिततेत किती थ्रिल असतं हे प्रवासात पहिल्याच दिवसापासून कळत गेलं. रोजचा कोरा दिवस वाट्याला येणं आणि संध्याकाळ होता होता आपल्याला माहितीही नसलेले रंग त्या कोऱ्या दिवसात भरून हसणं हे किती सुखावह असू शकतं, हे शब्दात सांगणं जरा अवघड आहे.
एक नक्की, ऐकीव माहिती, वाचलेली माहिती आणि वस्तुस्थिती यातलं खरंखोटं प्रवासात रोज लक्षात यायला लागलं. विकास म्हणजे पसरत चाललेली शहरं, रस्ते, गाड्या, खर्च करायला भरपूर पैसा किंवा आराम करण्याची साधनं असा विचार बहुतेक वेळेस केला जातो, तो किती वरवरचा आहे हे रस्त्यावरच्या माणसांशी बोलताना जाणवत राहिलं.
आणि त्यातूनच उमगलं, की आताशा आपली खेडी जास्त वेगानं बदलू लागली आहेत. बदलांकडे, नव्या विचारांकडे, तंत्रज्ञानाकडे तरुण पिढी कशी पाहते याची उत्तरं जागोजागी भेटलेल्या, हातात स्मार्टफोन आणि सदैव आॅनलाइन असणाऱ्या अनेकांनी दिली. काहींनी तर मलाच बसल्याबसल्या यू ट्यूबवरचे व्हिडीओ दाखवण्यापासून जीपीएस कसं काम करतं हे जरा समजावून सांगितलं. अनोळखी माणसालाही सांगावं समजावून इतकी तंत्रज्ञानाची क्रेझ मोठी दिसते. 
तंत्राची भाषा अशी बोलते पण दक्षिण भारतात खरी समस्या येते ती म्हणजे भाषेची. इंग्रजी शिक्षण आणि हिंदी सिनेमामुळे आताशा थोडी स्थिती बदलली असली, तरी सामान्य माणसांशी संवाद साधताना अडचणी आल्याच. एकाच देशात राहून दुसरी प्रादेशिक भाषा शिकण्याचा प्रयत्न आपल्याकडून होत नाही. हिंदीबरोबर एखादी प्रादेशिक भाषा आपण शिकलो तर कदाचित आपण आपला देश अधिक चांगला समजून घेऊ असं परत आल्यावर मला जाणवत राहिलं.
भारत प्रवास नावाच्या या रस्त्यावरच्या शाळेत मला शेकडो गुरू भेटले. प्रवास आणि अनुभव यांनी खरंतर आपल्याला काय येत नाही, काय माहिती नाही याचीच जाणीव करून दिली. 
आपलीच माणसं, आपला देश समजून घेण्यासाठी ही जाणीव यापुढे मदत करत राहील, अशी आता खात्री वाटते..


( लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

onkark2@gmail.com 

 

Web Title: Irony magic that breaks life's iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.