इश्काबिश्काचं डेटिंगसेटिंग
By Admin | Published: February 11, 2016 08:33 PM2016-02-11T20:33:51+5:302016-02-11T20:34:20+5:30
प्रेम, अफेअर, लफडं, भानगड हे शब्द पूर्वी खुसफुसत म्हटले जात. आता शहरी तारुण्यासह खेडय़ापाडय़ातही ‘डेट’चं वारं शिरतं आणि फिरतं आहे, त्यानं नेमकं काय बदलतं आहे?
>- ऑक्सिजन टीम
प्यार किया नही जाता,
हो जाता है असं मानणारी
रोमॅण्टिक तरुण मनं असतील एकेकाळी.
आता मात्र प्यार किया भी जाता है,
ठरवून किया जाता है !
नीट तपासून, डेट करून
मग कमिट करणं आणि
त्यापुढे अतीच सिरीयस्ली प्रेमबिम वाटलं तर
लग्न करणं या टप्प्यात प्रेमात पडणं पोहचलं आहे.
आणि प्यारवाले भेटण्याबिटण्याचे सिलसिलेच बदलून गेलेत.
मात्र खरंच त्यातून सच्चं प्रेम सापडतं आहे,
की गोष्टी जास्तच कॉम्प्लेक्स होत आहेत?
प्रेम, अफेअर, लफडं, भानगड हे शब्द पूर्वी खुसफुसत म्हटले जात. आता शहरी तारुण्यासह खेडय़ापाडय़ातही ‘डेट’चं वारं शिरतं आणि फिरतं आहे, त्यानं नेमकं काय बदलतं आहे?
‘डेट’ आणि ‘तारीख’ यातला फरक काय?
श्रीमंत, हायफाय, शिकलीसवरली मुलं डेटला जातात.
आणि वस्तीतली, अर्धशिक्षित, राडेबाज मुलं ‘तारखेला’ हजर होतात.
असं सांगणारा आणि आपापल्या शहरातले हायफाय एरिया आणि बदनाम इलाख्याची नावं टाकून फॉरवर्ड होत शहरदरशहर फिरलेला हा अलीकडचा व्हॉट्सअॅप मेसेज !
भेदाभेदचं भयंकर सामाजिक वास्तव सांगत विनोद म्हणवणारा हा मेसेज, पण ‘डेट’ला जाणं, ‘डेटिंग सुरू असणं’ हे शब्द आता तरुण मुलामुलींच्या आयुष्यात चांगलेच सरावले आणि स्थिरावले आहेत याची एक झलक या फॉरवर्डमधून मिळते. प्रेमाबिमात पडलेले किंवा ठरवून पडू पाहणारे तर सोडाच पण पाहून-ठरवून लग्न करणारेही ‘आम्हाला डेटिंग पिरीअडच मिळाला नाही’ असं चारचौघात बेलाशक-बिंधास्त सांगतात.
हा इथवरचा बदल कसा झाला? निदान मोठय़ा शहरासह छोटय़ा शहरातल्या तरुण मानसिकतेत? खेडय़ापाडय़ातली मुलं खुलेआम ‘डेट’ हा शब्द वापरत नसली तरीही त्यांना तो माहिती नाही असं नाही. आज काय मग डेट का? असे डायलॉग खुर्द-बुद्रुक गावातल्या कॉलेजातही ऐकायला येऊ लागलेत.
हे सारं इतक्या वेगानं कधी बदललं? कसं बदललं?
छुपछुपके प्रेम करण्याचा एक काळ होता, तो कधीच मागे पडला. व्हॅलेण्टाईन डेच्या दिवशी त्याला/तिला प्रपोज करणं नी विकतचं ग्रीटिंग देण्यात बंडखोरी मानण्याचा काळही अगदी अलीकडे पंधरा-सतरा वर्षापूर्वीच्या तरुण पिढीनं जगला ! त्यापायी व्हॅलेण्टाईन डेला पोलिसांच्या लाठय़ाकाठय़ा खात शहरातली पार खबदाडातली रोमॅण्टिक ठिकाणं शोधून काढली.
आणि आता?
ते सारं जसं कधी इथं घडलंच नसावं तसं अनेक तरुण मुलंमुली घरच्यांनाही सांगू लागलेत की, आम्ही डेट करतोय एकमेकांना, पण म्हणजे प्रेमात पडलोय असं नाही, लगेच लग्नबिग्न ठरवू नका. पाहू जरा, आमचं जमतंय का?
प्यार किया नही जाता, हो जाता है असं मानणारी रोमॅण्टिक तरुण मनं असतील एकेकाळी. आता मात्र प्यार किया भी जाता है, ठरवून किया जाता है, नीट तपासून, डेट करून मग कमिट करणं आणि त्यापुढे अतीच सिरीयस्ली प्रेमबिम वाटलं तर लग्न करणं या टप्प्यात प्रेमात पडणं पोहचलं आहे.
त्यामुळेच ज्याला पूर्वी इतर लोक प्रेम, अफेअर, लफडं, भानगड असं खुसफुसत म्हणायचे तिथं आता तरुण मुलंमुलीच आम्ही जीएफ/बीएफ आहोत, वी आर टुगेदर असं म्हणत भेटण्याबिटण्याच्या आणि भेट राहण्याच्या सिलसिल्याला ‘डेटिंग’ म्हणू लागलेत.
इथवर ठीकच होतं तसं. दुटप्पी जगत, लपूनछपून गोष्टी करणं नाकारणा:या तरुण पिढीचा हा एक वेगळा चेहरा होता.
आता मात्र त्यापलीकडच्या एका क्रॉसरोडवर प्रकरण पोहचलंय.
भारतात डेटिंग अॅप्स दाखल झालेत आणि शहरी मुलंमुली हे ‘अॅप्स’ ट्राय करत, डेटिंगला जाऊन पाहत आहेत. या अॅप्समुळे या देशातल्या तरुणांची प्रेम-रोमान्स यांची परिभाषाच बदलेल की काय अशा शंका घेतल्या जात आहेत. आणि प्रेमापलीकडे फक्त शरीरसंबंधांपुरतं हे भेटणं असेल आणि त्यातून कमिटमेण्टची वाटच सापडणार नाही की काय असे भयही जाणकार व्यक्त करत आहेत.
हे सारं एकीकडे सुरू असताना, प्रॅक्टिकली स्वत:च्या प्रेमविषयक आयुष्याचा विचार करणारेही आहेत. मात्र प्रेमात पडलेले असताना, या डेटिंग पिरिअडमध्येही ते कामाच्या ताणामुळे एकमेकांना वेळ देऊ शकत नाहीत. अपेक्षांची चळत उभीच राहते आणि मग जीव मेटाकुटीला येऊन नाती तुटायला येतात. डेटिंग पिरिअडमध्येच समुपदेशनासाठी येणा:या जोडप्यांची संख्या वाढते आहे असं मानस शास्त्रज्ञ सांगत आहेत.
प्रेमात पडण्याच्या रोमॅण्टिक भावनेपासून डेटिंगच्या प्रॅक्टिकल टप्प्यार्पयत पोहचलेला हा प्रवास.
या व्हॅलेण्टाईन डे स्पेशल अंकात.
परवा, रविवारी प्रेमाचा उत्सव साजरा करताना प्रेमात पडतानाची सच्ची भावना आणि ते निभावण्याची, त्यापायी मीपण विसरून काही क्षण तरी दुस:याचं मन जपण्याची आणि अपेक्षांच्या चेकलिस्ट बाजूला ठेवून ‘देण्या’च्या लिस्टमध्ये भर घालण्याची आपली तयारी आहे का?
हे विचारावं ज्यानं-त्यानं स्वत:ला.
कदाचित या प्रश्नांची खरी उत्तरंच आपल्याला उत्सवी, शोऑफ नात्यापलीकडे नेत सच्च्या प्रेमाच्या ख:याखु:या भावनेर्पयत घेऊन जातील.
- जातीलही कदाचित!
त्यासाठी आणि येत्या व्हॅलेण्टाईन डेसाठी मनापासून शुभेच्छा !