इस्त्रायलचा एलियाझ दांडेकर
By admin | Published: September 22, 2016 06:09 PM2016-09-22T18:09:29+5:302016-09-22T18:09:29+5:30
१९४८ साली इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर जगभरातून ज्यू इस्रायलकडे जाऊ लागले. भारतातील बेने इस्रायली, बगदादी, सिरियन ज्यूंनीही त्यांचीच वाट धरली.
Next
- ओंकार करंबेळकर
इस्त्रायलची निर्मिती झाल्यावर
महाराष्ट्रातूनही काही ज्यू तिकडे गेले.
आणि आता त्याच ज्यूंचा एक
वारसदार भारतात आपली मूळं
शोधत फिरतो,
मराठी शिकून
आपल्या पूर्वजांनी केलेल्या
पराक्रमांच्या नोंदी शोधतो.
त्याच्या वर्तमानात
त्याचा इतिहास हीच त्याची एक
नवीन ओळख ठरते आहे..
१९४८ साली इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर जगभरातून ज्यू इस्रायलकडे जाऊ लागले. भारतातील बेने इस्रायली, बगदादी, सिरियन ज्यूंनीही त्यांचीच वाट धरली. अगदी अलीकडे ईशान्य भारतातील बेने मनाशे जमातीने तिकडे स्थलांतर केले. महाराष्ट्रातून आणि भारतातून गेलेले ज्यू आता काय करतात, ते मराठी बोलतात का, ते कोणते पदार्थ खात असावेत, असे प्रश्न सतत पडत होतेच.
पण एलियाझ दांडेकरची भेट झाली आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. एलियाझ हा एकदम तरुण तुर्क इतिहासकार, लेखक आणि फोटोग्राफर आहे. बेने इस्रायली लोकांनी आपली मूळ संस्कृती, इतिहास विसरू नये यासाठी तो गेली दहा वर्षे धडपडत आहे. त्याच्याशी आधी इंटरनेटवरून मैत्री झाली होती; पण तो भारतात भेटीवर आल्यावर प्रत्यक्ष भेटलोच आम्ही.
इस्रायलमध्ये गेल्यापासून भारतीय ज्यू तिथल्या नव्याने निर्माण झालेल्या समाजात मिसळून गेले. नव्या रितीभातींबरोबर जुन्या भारतीय आठवणींना घेऊन त्यांचा प्रवास सुरू झाला. पण काळ बदलत गेला तसे मराठी बोलणारे लोक कमी होत गेले. सध्याच्या दोन पिढय़ा तर तिकडेच जन्मलेल्या आहेत, त्यामुळे तरुण पिढीला आपलं मूळ भारतात होतं इतकंच आठवतं पण आपल्या कामधामात ते इतके व्यग्र की, वर्तमानापलीकडे इतिहासाचा शोध कोण घेणार? आपल्या इतिहासाचं डॉक्युमेंटेशन व्हायला हवं असं अनेकांना वाटतं. चर्चा होतात. पण ते करायला फारसा कुणाला वेळ नसतोच. एलियाझने मात्र ही कोंडी फोडली. भारताबद्दल त्याला आकर्षण वाटत होतंच; त्याहून आपल्या पूर्वजांची भूमी पाहणं, त्याबद्दल माहिती गोळा करणं अत्यावश्यक आहे असं त्याला वाटू लागलं. त्यामुळे २0१0 साली त्यानं घरी सरळ जाहीर करून टाकलं, मी या वर्षी भारतात जाणार! त्याच्या निर्णयावर लगेच काय बोलायचं हे कोणालाच कळेना. शेवटी त्याची एक आत्या त्याच्याबरोबर यायला तयार झाली. आत्या जातेय म्हणून त्याची आईही तयार झाली. यासर्वांची तयारी पाहून निघण्यापूर्वी केवळ एक आठवडाभर आधी त्याच्या भावानंही आपण सोबत असल्याचे सांगून टाकलं. २0१0 साली त्याने सुरू केलेला हा भारत आणि इतिहासाचा प्रवास. त्याच्या कुटुंबातील अनेक पूर्वजांना युद्धात हौतात्म्य आल्याचे, त्यांची थडगी भारतात अनेक ठिकाणी पसरली आहेत, त्याच्या पूर्वजांनी ठाण्यात आणि मुंबईत सिनेगॉग्ज स्थापन केल्याची भन्नाट माहिती त्याच्या हाती लागली.
मुंबईतील सर्वात जुने सिनेगॉग गेट ऑफ मर्सी बांधणारे सामाजी हासाजी दिवेकर (सॅम्युएल इझिकेल दिवेकर १७३0-१७९७) हे एलियाझचे पूर्वज होते. त्यांनी बांधलेले सिनेगॉग मुंबईत जुनी मशीद म्हणून ओळखली जाते. सामाजी सुभेदार कमांडंट पदावर सैन्यात होते. त्यामुळे त्यांना कमांडंट मुकादम म्हटले जाई, त्याचा अपभ्रंश आता कमोडेन मोकादम असा झाला. एलियाझच्या सुभेदार मेजर सॅम्युएल मोझेस नागावकर (१८१६-१९0४) या पूर्वजांनी १८७९ साली ठाण्यामध्ये गेट ऑफ हेवन हे सिनेगॉग बांधल्याचेही त्याला भारत भेटीमध्ये समजले. सॅम्युएल नागावकर यांचा बेंगळुरूमध्ये मृत्यू झाला आणि म्हैसूरमध्ये ज्यू धर्मीयांना दिलेल्या जागेत त्यांना दफन करण्यात आले. एलियाझच्या एका पूर्वजांनी ईस्ट इंडिया कंपनीविरोधात १८५७ साली झालेल्या बंडामध्ये सहभाग घेतला होता. सुभेदार शामाजी (सॅम्युएल) दांडेकर हे त्यांचे नाव. बंडात सहभाग घेतल्याबद्दल त्यांना जबलपूरमध्ये फासावर चढविण्यात आले. त्यांना तेथील ज्यू स्मशानभूमीच्या बाहेर पुरण्यात आलं. या स्मशानाची व सॅम्युएल यांच्या थडग्याची आज वाताहत झाली आहे. या सर्व दफनभूमींनाही एलियाझने भेटी दिल्या. इस्रायलमधील तसेच अहमदाबाद, जयपूर, अबू रोड, दिल्ली, इंदोर, जबलपूर, मुंबई, कोकणातील गावं, ठाणे, कर्नाटक-केरळातील गावांमधील सर्व ज्यू स्मशानांना भेटी देऊन त्यानं छायाचित्रे काढली आणि नोंदीही केल्या आहेत. आपल्या कुटुंबाच्या इतिहासावर त्यानं एक पुस्तकही प्रसिद्ध केलं आहे.
एलियाझने त्याच्या २0१0, २0१५ आणि २0१६ या तिन्ही भारतप्रवासांमध्ये ५0 सिनेगॉग्जना भेटी दिल्या आहेत. १00हून अधिक ज्यू स्मशानभूमी आणि ५000 थडगी पाहून त्यांचा अभ्यास केला आहे. पण सध्या या स्मशानभूमींची असणारी अवस्था त्याला फारच चिंताजनक वाटते. जबलपूरमध्ये १८५७च्या बंडात इंग्रजांविरुद्ध लढणार्या त्याच्या पूर्वजांना सुळावर चढवले त्यांच्या समाध्यांची तोडफोड झाली आहे. काही थडग्यांना शेळ्या, मेंढय़ाही बांधल्या जातात. आवासमध्ये स्मशानभूमी पाहण्याचा थरारक अनुभव सांगताना तो म्हणाला, तेथे झाडे, वेलींचे गचपण आहे. काट्या-कुट्यांमधून जाताना शर्ट फाटला आणि पायालाही भरपूर लागलं. ठेचकाळत पुढे जात असतानाच अचानक एक नाग समोर येऊन थांबला. मी श्वास रोखून काहीवेळ तसाच स्थिर राहिलो. काही क्षणांनंतर तो निघून गेला. एवढी धडपड केल्यावर मला पुढे झाडांच्या मुळांखाली, मातीत गाडली गेलेली दहा थडगी दिसली. एलियाझने १७व्या व १८व्या शतकातील थडग्यांवर कोरलेली हिब्रू अक्षरे शोधून काढली आहेत, भारतीय ज्यू समाज गेल्या शतकात हिब्रू शिकला हे चूक असल्याचे त्याचे मत आहे.
इस्रायलमध्ये आज बेने इस्रायली लोकांच्या आठवणींना, साहित्याला एकत्र करण्याची गरज आहे, असे एलियाझला वाटते. त्यासाठी तो लोकांना आवर्जून भेटतो. त्यांच्याकडील छायाचित्रे डिजिटाईज करतो. त्याच्या पुस्तकाचे लेखनही जोमात सुरू आहे. कामोदेन मोकादम नावाने स्वत:चे प्रकाशनगृह स्थापन करून त्याने स्वत:चे पुस्तक प्रकाशित केले. त्याचे दुसरे व तिसरे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. ‘भारतीय ज्यू’ या विषयावरची त्याच्याकडे हिंदी, मराठी, इंग्रजीतील जवळपास २00 पुस्तके आहेत, त्यात एका फ्रेंच पुस्तकाचाही समावेश आहे. या अभ्यासाच्या निमित्ताने तो मराठी, हिब्रू, इंग्रजीसह उर्दू आणि थोडे अरेबिकही शिकला आहे.
एलियाझ उत्तम, खणखणीत मराठी बोलतो. या खेपेस त्याच्याबरोबर त्याच्या दोन चुलत बहिणी भारत भेटीवर आल्या होत्या. त्यांना भारतातील सिनेगॉग्ज, स्टार ऑफ डेव्हिड, हिब्रू प्रार्थना करणारे लोक पाहून आश्चर्याचे धक्के बसत होते असं त्यानं गमतीत सांगून टाकलं. यंदाच्या वर्षी तेल अविव विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांनी एकत्र येऊन तेल अविवमध्ये मराठीचे वर्ग घेतले, त्यातही त्याने सहभाग घेतला होता. कुतूहलापोटी अनेक लोकांनी या वर्गात प्रवेश घेतला होता. मराठीच्या वर्गामध्ये खूप नव्या गोष्टी त्याला शिकायला मिळाल्या; कारण बेने इस्रायली थोडे वेगळे शब्द आणि वेगळे हेल काढून मराठी बोलतात. प्रमाण मराठीमुळे वाचन आणि लेखन करायलाही सोपे जाईल म्हणून असे वर्ग पुन्हा इस्रायलमध्ये सुरू व्हावेत, असे तो म्हणतो.
आडनावांची गंमत..
बेने इस्रायलींचे वैशिष्ट्य समजले जाणारे म्हणजे त्यांची गावांवरून पडलेली आडनावे इस्रायलमध्ये गळून पडत आहेत. झिराडकर, दिवेकर, पेणकर, ठाणेकर, गडकर, घोलकर, आवासकर, तळकर, किहिमकर, अष्टिमकर अशी उत्तर कुलाबा (आताचा रायगड) जिल्ह्यातील गावांवरुन आलेली आडनावे वापरण्याऐवजी बेने इस्रायली पूर्वजांची नावेच आडनावे म्हणून वापरू लागली आहेत. (जसे मॉरिशसमध्ये गेलेल्या मराठी लोकांनी कुटुंबातील ज्या पहिल्या माणसाने मॉरिशसमध्ये पाऊल ठेवले त्याचेच नाव आडनाव म्हणून वापरण्यास सुरुवात केली. जसे की, बापू, म्हादू, दगडू) एलियाझ इस्रायलमध्ये कोणीही बेने इस्रायली तरुण व्यक्ती भेटली की त्यांना त्यांचे आडनाव विचारतो. तेव्हा ते एखाद्या व्यक्तीचे नाव सांगतात, त्यांना.. समथिंग कर. अशी अर्धवट, धूसर माहिती असते. तेव्हा तो त्यांना मूळ आडनावे घरी विचारून वापरण्याची विनंती करतो. एलियाझला स्वत:ला वयाच्या दहाव्या वर्षी त्याचे आडनाव दांडेकर असल्याचे समजले, त्यापूर्वी सर्व लोक रुबेन हे आडनाव वापरत. एलियाझने शाळेपासूनच स्वत:चे आडनाव दांडेकर असे वापरायला सुरु केले आणि मी तेच आडनाव लावणार असे घरी सांगून टाकले. आता त्याचे नाव एलियाझ रेमंड रुबेन दांडेकर के. एम. असे लांबलचक झाले आहे. यातील के. एम.चीही वेगळी कथा आहे. कमांडंट मुकादम या पदाचा अपभ्रंश कामोदेन मोकादेम असा होऊन ती पदवी आता आडनावाला चिकटली आहे.
बोलता बोलता आमच्या बोलण्यात रिबेका रुबेन या मुंबईतील एली कदुरी शाळेत प्रदीर्घ काळ मुख्याध्यापिका असणार्या शिक्षणतज्ज्ञांचा उल्लेख आला, तेव्हा त्यांचे आडनाव नौगांवकर असल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर बोलता बोलता मी त्याला मुंबईचे एक डॉ. एलिजाह मोझेस (कार्यकाळ- १९३७-३८) नावाचे ज्यू महापौर होते. त्यांच्या नावाने इ. मोझेस नावाने वरळीत असणार्या रस्त्यावरच माझे ऑफिस आहे असं मी त्याला सांगितलं. त्यावर तो चटकन म्हणाला, त्यांचे पूर्ण नाव डॉ. एलिजाह मोझेस राजपूरकर आहे. इस्रायलमधील बेने इस्रायली आणि भारतातील लोकांनीही मूळ आडनावे विसरू नयेत हीच माझी इच्छा आहे. मूळ आडनावे वापरण्यात अभिमान सामावला आहे, असे तो सर्वांना समजावून सांगतो.