थांबला तो संपला..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 09:02 AM2018-05-17T09:02:48+5:302018-05-17T09:02:48+5:30
गाव सोडलं, शिकत गेलो त्यानं मला घडवलं
- प्रा. डॉ. सतीश मस्के, मराठी विभागप्रमुख, कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर, ता. साक्री, जि. धुळे
स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं. पण हा म्हटलं तर लहानसा बदल माणसाच्या जीवनात भली मोठी क्र ांती करत असतो. जीवन घडवतही असतो. थांबला तो संपला असं म्हणतात ते खरं आहे. अनेकजण शिक्षणासाठी, कामासाठी, नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडतात आणि मग त्यांचं जीवनमान बदललेलं दिसून येतं. बीड जिल्ह्यातल्या भाटुंबा गावात माझं नववीपर्यंतचं शिक्षण झाले. गावातील काही मुलं होळ केज या तालुक्याच्या गावी शिक्षणासाठी होते. ते सणाच्या निमित्तानं किंवा सुटीच्या निमित्तानं गावाकडे यायचे. आम्ही समवयस्क गप्पा मारत बसायचो. गप्पात ते त्यांच्या शाळेविषयी, शिस्तीविषयी खूप काही सांगायचे, बोलायचे. मलाही त्या शाळेचं आकर्षण वाटू लागलं. पण दहावीला प्रवेश मिळू शकत नव्हता. मग माझे चुलते दासू मस्के व संस्थाचालक इस्थळकर दादा यांची ओळख होती. त्यांनी चिठ्ठी दिली; ती चिठ्ठी घेऊन वडील गेले. त्यांनी मला वसतिगृहातही राहण्याची परवानगी दिली. मी आलो, सुरुवातीला करमलं नाही. हळूहळू जीव रमायला लागला. तिथली शिस्त पाहून जीवनात बदल होऊ लागले. सकाळी लवकर उठणं, प्रार्थनेला उपस्थित राहणं, व्यायाम करणं, स्वत:च स्वत:चे कपडे धुणं, मित्रांबरोबर मिळून-मिसळून राहणं, एकमेकांच्या सुख, दु:खात सहभागी होणं, वेळच्या वेळी अभ्यास करणं अशा कितीतरी गोष्टी शिकायला मिळाल्या.
नंतर कॉलेजचं शिक्षण घ्यायला अंबाजोगाईला स्वामी रामानंदतीर्थ महाविद्यालयात गेलो. प्राचार्य भ. की. सबणीस, प्रा. एम झेड. इंगोले व विजय भटकर यांचं सहकार्य मिळालं. लिहण्या, वाचण्यात आणि राहणीमानात बदल होऊ लागला. वेगवेगळ्या कार्यक्र मात आणि स्पर्धेत सहभागी होऊ लागलो. ओळखी होऊ लागल्या. चळवळीशी जोडलो गेल्यानेही सामाजिक जाणीव निर्माण होऊ लागली. मराठी विषयाची गोडी प्राचार्य डॉ. शैला लोहिया यांच्यामुळे लागली. हळूहळू साहित्य चळवळीकडेही वळलो जाऊ लागलो. एम.ए.चं शिक्षण घेण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात प्रवेश घेतला. विभागात सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. बाळकृष्ण कवठेकर, डॉ. एस. एस. भोसले, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. सतीश बडवे, डॉ. उमेश बगाडे, डॉ. सुधीर गव्हाणे, डॉ. सुरेश पैठणकर अशा अनेक माणसांच्या सहवासात राहता आलं. ऐकता आलं, शिकता आलं. नंतर मिलिंद कला व विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्त्वावर सेवा करण्याची संधी मिळाली. एम. ए. वाहूळ, प्राचार्य डॉ. बी. सी. घोबले, प्रा. अविनाश डोळस, डॉ. रमेश जाधव अशा अनेकांचं सहकार्य लाभलं. हळूहळू स्वत:मध्ये बदल होऊ लागला. नंतर याच विद्यापीठात पीएच.डी. पदवी मिळवली आणि सध्या कर्म. आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालय, पिंपळनेर ता. साक्री, जि. धुळे येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. स्थलांतरांनं माझं जीवन घडवलं, जीवनाला एक आकार आणि अर्थ प्राप्त करून दिला.