जे. वाय. ब्रदर्स- भेटा या दोन निसर्गवेडय़ा मित्रांना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 05:26 PM2018-07-19T17:26:43+5:302018-07-19T17:27:46+5:30

महेश यादव आणि भूषण जाधव, दोघांना निसर्गाचा लळा. मग त्यांनी ठरवलं आपला छंदच आपलं काम आणि छंदाच्या भागीदारीतून एक नवीन काम सुरू केलं.

J. Y Brothers- Meet these two nature friends. | जे. वाय. ब्रदर्स- भेटा या दोन निसर्गवेडय़ा मित्रांना.

जे. वाय. ब्रदर्स- भेटा या दोन निसर्गवेडय़ा मित्रांना.

Next
ठळक मुद्देआपल्या निसर्गाचं यापुढे जे काही चांगलं-वाईट होणार आहे ते सगळं नव्या पिढीच्या हातातच आहे असं या दोघांना वाटतं.

- ओंकार करंबेळकर

आजवर मोठमोठय़ा कंपन्यांनी एकत्र येऊन भागीदारीत नवी कंपनी स्थापन केल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण अशी भागीदारी केवळ आर्थिक क्षेत्रातच करता येते असं नाही. एखाद्या छंदाबाबत समान आवडीचे लोक एकत्र येऊन संशोधनाचं, लोकशिक्षणाचं काम करू शकतात. मुंबईमध्ये राहणार्‍या दोन निसर्गवेडय़ा मुलांची अशीच एक जोडी तयार झाली. जे. वाय. ब्रदर्स हे त्यांचं नावं. एकाचं नाव महेश यादव आणि दुसर्‍याचं नाव भूषण जाधव. या दोघांच्या आडनावाच्या अद्याक्षराने जे. वाय. ब्रदर्स असं नाव तयार झालं आहे.
    या जोडीतील महेश आहे सिव्हिल इंजिनिअर तर भूषण आहे वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. दोघांनी वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेतलेलं असलं तरी त्यांना निसर्ग या समान धाग्यानं जवळ आणलं. मुंबईच्या मधोमध असलेल्या आरे जंगलाच्या जवळच राहत असल्यामुळं त्याचं आरेमध्ये सतत जाणं व्हायचं. लहानपणापासून आरेमधील झाडं, प्राणी, पक्षी, साप-सरडय़ासारखे सरपटणारे प्राणी यांचं निरीक्षण केल्यामुळे त्यांना आपल्याला इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा निसर्गज्ञानाची आवड जास्त असल्याचं जाणवलं. महेश यादवला संकटात सापडलेल्या प्राणी-पक्ष्यांची सुटका करणं किंवा घराच्या आवारात आलेल्या सापाला पकडून त्याची सुटका करणं याची विशेष आवड होती.

 

आरे आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये मनुष्य आणि प्राणी समोरासमोर आल्यामुळे अनेकदा लोकांची, प्राण्यांची आणि प्रशासनाचीही तारांबळ उडते. एखाद्या घरामध्ये साप निघणं, एखाद्या पहाटे रहिवासी सोसायटीत बिबटय़ा लपलेला असणं, एखाद्या सोसायटीत रात्री बिबटय़ा आल्याचं सीसीटीव्हीत दिसणं असले प्रकार वारंवार घडतात. त्यामुळे या दोघांनी आरे वसाहतीच्या आजूबाजूच्या लोकांना प्राणी व निसर्ग यांच्याबाबत माहिती द्यायला सुरुवात केली. आरे जंगल हे मुंबईचं फुप्फुस आहे अशी जागृती करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आरेमधील झाडं विकासकामांमुळं धोक्यात येऊ लागल्यावर मुंबईतील अनेक पर्यावरण संस्था विरोधासाठी उभ्या राहिल्यावर हे रहिवासीही जंगल वाचविण्यासाठी सरसावले.


महेश आणि भूषण या दोघांचा आणखी एक महत्त्वाचा आणि त्या दोघांना सर्वाधिक आवडणारा छंद म्हणजे वाइल्ड लाइफ फोटोग्राफी. या छायाचित्रणामुळे त्याचं विविध जंगलांमध्ये फिरणं झालं. त्यांच्या फोटोंना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ इमेजेस अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स, वाइल्ड लाइफ ऑफ इंडिया, वाइल्ड लाइफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट अशा विविध संस्थांसाठी त्यांनी फोटोग्राफी केली आहे. त्यांच्या फोटोंचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे. संजय गांधी नॅशनल पार्क, कोयना अभयारण्य, दाजीपूर अभयारण्य, सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य, तुंगारेश्वर अशा अनेक जंगलांमधील निसर्गवाटा दाखवणारे तसेच माहिती सांगणारे फलक त्यांच्या मदतीमुळे तयार झाले आहेत.
जे. वाय. ब्रदर्समधील भूषणला किटकांचा अभ्यास करायला जास्त आवडतो. त्याने कोळ्यांच्या सहा नव्या प्रजाती शोधणार्‍या वेगवेगळ्या टीममध्ये काम केलं आहे. आज हे जे. वाय. ब्रदर्स अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतात. वन्यजीवांचं छायाचित्रण, दृक्श्राव्य माहितीपर कार्यक्रम, निसर्गभ्रमंती असे विविध कार्यक्रम ते दोघं आयोजित करतात. शालेय विद्याथ्र्यापासून मोठय़ा लोकांर्पयत सगळेच त्यांच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. आपल्या निसर्गाचं यापुढे जे काही चांगलं-वाईट होणार आहे ते सगळं नव्या पिढीच्या हातातच आहे असं या दोघांना वाटतं. त्यामुळे लहानपणापासूनच विद्याथ्र्याना निसर्गाची ओळख करून द्यायला हवी असं ते म्हणतात. आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा त्या दोघांनी निर्णय घेतला. निसर्ग आस्वादाबरोबर संशोधन, फोटोग्राफी, निसर्गभ्रमंती, माहितीपर कार्यक्रमांची त्या आवडीला जोड दिली आणि त्यांचा प्रवास आता वेगात सुरू आहे.

 

Web Title: J. Y Brothers- Meet these two nature friends.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.