जाईजुई रातराणीच्या सुगंधी गप्पा
By admin | Published: October 27, 2016 04:09 PM2016-10-27T16:09:46+5:302016-10-27T16:09:46+5:30
जगणं.. ही एक भेट आहे. आपल्या धडधडत्या हृदयानं आपल्याला दिलेली.. येत्या-जात्या श्वासाच्या लयीनं सजवलेली.. ती लय सुंदर आहे.. त्या लयीवर झुलायला लागलं मन की, स्वप्नं पडतात.. ती स्वप्नं सजवा.. त्या स्वप्नांना मेहनतीचे पंख देताना जगा मात्र ‘आज’! भरभरून. आनंदानं. मनसोक्त.
जगणं.. ही एक भेट आहे. आपल्या धडधडत्या हृदयानं आपल्याला दिलेली.. येत्या-जात्या श्वासाच्या लयीनं सजवलेली.. ती लय सुंदर आहे.. त्या लयीवर झुलायला लागलं मन की, स्वप्नं पडतात..
ती स्वप्नं सजवा.. त्या स्वप्नांना मेहनतीचे पंख देताना जगा मात्र ‘आज’! भरभरून. आनंदानं.
मनसोक्त.
स्वप्नांना ‘उद्या’ असतो,
आणि श्वासांना फक्त आज..
मात्र तो ‘आज’ दिसतो तेवढा छोटा नसतो..
त्यासाठी मोजावी लागते प्रेमाच्या कैक क्षणांची किंमत..
ती मोजली की, प्रेम बदलून टाकतं जगणं..
सामान्य क्षणांना ‘असामान्य’ रूप देतं..
तो असामान्य होण्याचा प्रवास
आपल्या साऱ्यांचा असतो..
आपल्या जगण्यात,
वार-तारखांच्या कोरड्या वाटांत
असंख्य दिवे उजळवू लागतो..
पण ते दिवे आपल्याला दिसतात का?
दिसले तर त्या इटुकल्या चमचमत्या दिव्यांचा
चिमुकला पण लख्ख प्रकाश पहा..
सावल्या मोजत राहू नका...
किरणं मोजा....
त्या किरणातली सुंदर चमक पहा..
आणि आत दडलेला अंगारही जोखा..
कुठं वाटेत दिसली गुलाबाची फुलं..
तर काटेच आहेत म्हणून बिचकू नका..
गुलाबाच्या स्पर्शासाठी
काट्यांचा स्वीकारही
मनापासून करा..
मग कुठं मोगरा भेटेल,
कुठं रात्री उमललेल्या जाईजुईरातराणी
गप्पा मारत बसलेल्या दिसतील..
निशिगंधाची सुंदर झुळूक सुखाची सय सांगेल..
रात्रीचा काळोख पाहत बसायचा की,
या सुगंधी वाऱ्याचा हात धरायचा..
हा प्रश्नही मग उरत नाही..
अंधाराला आपण डरत नाही..
उलट त्या अंधारात लहान मुलं
कशा मोजतात चांदण्या..
तशा आपण मोजू..
ग्रहताऱ्यांपलीकडे जाणाऱ्या वाटा आपण शोधू
हे सारं करताना,
जगणं साजरं होतं..
आणि साजरं करता करता
जगणं फुलून येतं..
फुलायचं की झुरायचं हा प्रश्नही मग उरत नाही
कारण सुख आणि आपण
दोन वेगळे उरत नाही..