जपान मोबाईलच्या कचऱ्यातून बनवतोय सोन्या -चांदीचे ऑलिम्पिक मेडल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 02:37 PM2019-02-28T14:37:06+5:302019-02-28T14:39:07+5:30
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मेडल्स ई-कचर्यापासून बनवण्यात येणार आहेत. त्यासाठी आपला ई-कचरा जमा करण्यासाठी लोकांनी रांगा लावल्या आणि 47 हजार 488 टन ई-कचरा जमा केला !
- प्रगती जाधव-पाटील
‘ई-वेस्ट’ अर्थात इलेक्ट्रॉनिक कचरा हा शब्द सध्या जगभराला समस्या म्हणून छळत आहे. आणि त्याचाच विचार करत येत्या टोक्यो ऑलिम्पिक 2020साठी जपाननं ठरवलंय की, या इलेक्ट्रॉनिक कचर्याचाच वापर करायचा. त्यापासूनच पदकं बनविण्याचा संकल्प जपानने केलाय. त्यासोबतच शाश्वत ऊर्जेकडेही जगाचं लक्ष वेधलं आहे.
ई-वेस्टपासून तयार होणारी पदकं, पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज असणारे रोबोट वा मानवरहित टॅक्सी अशा अनेक गोष्टींचा अनुभव आता सार्याला जगाला टोक्यो ऑलिम्पिकच्या निमित्तानं घेता येणार आहे.
मात्र सध्या चर्चा आहे ती ई-वेस्टपासून पदक बनवण्याची आणि त्यासाठी लोकांना करण्यात आलेल्या आवाहनांची. तुमचा ई-कचरा आम्हाला द्या, असं आवाहन करण्यात आलं आणि तुडुंब कचरा जमा झाला.
रियो ऑलिम्पिक 2016मध्ये पहिल्यांदा ई-वेस्टचा वापर करून 30 टक्के रजत आणि कांस्य पदकं बनविण्यात आली होती. त्यानंतर जपानकडे ऑलिम्पिकचे यजमानपद आले. जगाला आवश्यक असणारी शाश्वत ऊर्जा निर्माण करणं आणि त्याच मुख्य आधारावर या स्पर्धा भरवण्याचा संकल्प जपानने केला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर विविध क्षेत्रात अव्वल राहणार्या जपानी तंत्रज्ञानांनी ऑलिम्पिक स्पर्धा सोहळा अवघ्या जगाच्या स्मरणात राहील, अशा पद्धतीनेच डिझाईन केला आहे.
पवन आणि सौरऊज्रेचा वापर करून खेळाडूंचं गाव आणि स्टेडियम प्रकाशमान करण्याचा संकल्प आहे.
परदेशी पाहुण्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मानवरहित टॅक्सीची सोय करण्यात आली आहे. पाहुण्यांना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे दार उघड, बंद करणं आणि पेमेंट करणं सहज शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या गाडय़ांची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी एक हजार 500 नागरिकांनी अर्ज केले आहेत.
जपानमध्ये दाखल होणार्या विविध देशांतील पाहुण्यांना जापनीज भाषा ट्रान्सलेट करण्यासाठी खास रोबो तयार करण्यात आले आहेत. या रोबोटना जगातील सर्व भाषांचे ज्ञान असल्याने कोणत्याही प्रांतातील नागरिक त्यांच्याशी संवाद साधू शकेल.
ऑलिम्पिकसाठी येणार्यांमध्ये वयस्क आणि दिव्यांग पाहुण्यांचाही विचार जपानने केला आहे. वयस्कांची बॅग घेण्याबरोबरच त्यांना चालण्यासाठी मदत करण्यासाठी हे रोबोट सज्ज आहेत. दिव्यांग व्यक्तींनाही ते मदत करणार आहेत.
आणि यासोबतच सुवर्ण, रजत आणि ताम्र पदकंही ई-कचर्यातून धातून काढून बनवण्यात येणार आहेत.
सुपीक जपानी डोक्यांचं सध्या जगभर कौतुक होतं आहे.
ई-कचरा किती जमा झाला?
47 हजार 488 टन
1.आत्तार्पयत सुमारे 80 हजार फोन पदक निर्मितीसाठी वापरण्यात आले आहेत.
2. आत्तार्पयत सुमारे 50 हजार फोन डिस्कार्ड करण्यात आले आहेत, तर सुमारे 50 लाख बिघडलेले फोन या प्रक्रियेसाठी नागरिकांनी दिले आहेत.
3. सुमारे 47 हजार 488 टन ई-कचरा जमा झाला आहे.
धातू काढतात कसा?
* 3 मोबाइलमधून मिळतेय 1 ग्रॅम चांदी
* 1 टन मोबाइलमधून मिळतेय 300 ग्रॅम सोने
* जून 2018 मध्ये कांस्यपदकं तयार करण्याइतपत धातू ई-वेस्टपासून जपानला मिळाला आहे.
* डिसेंबर 2018 अखेर सुमारे 85 टक्के रजत पदकांसाठी चांदी मोबाइलमधून जमा करण्यात आली.
* नोव्हेंबर 2018 अखेर 90 टक्के सुवर्णपदकांसाठी आवश्यक सोने मोबाइल आणि लॅपटॉपमधून जमा झाले आहे.
* मार्च 2019 र्पयत पदकांसाठी आवश्यक असलेले सर्व धातू उपलब्ध होण्याचा विश्वास येथील तज्ज्ञांना आहे. यासाठी सुमारे 5 दक्षलक्ष मोबाइल जपानकडे प्राप्त झाले आहेत.
पदक निर्मितीसाठी
किती धातू लागेल?
* 30.3 किलो सोने
* 4 हजार 100 किलो चांदी
* 2 हजार 700 किलो कांस्य
जपानी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
जपानच्या विविध प्रांतातील शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ई-वेस्ट जमा करण्यासाठी स्वतंत्र दालन उभं करण्यात आलं होतं. अनेक जपानी नागरिकांनी तिथं रांगेत उभं राहून आपला ई-कचरा जमा केला. सर्वाधिक जमा झाले ते मोबाइल. ऑलिम्पिकचे यजमानपद मिळाल्या दिवसापासून ई-वेस्ट गोळा करण्याची जणू चळवळच जपानी माणसांमध्ये सुरू झाली.